Saturday, 9 April 2016

देव प्राप्त करायला पुरोहिताची गरज आहे का?

हा मोठा कळीचा प्रश्न आहे. बऱ्याच पुरोहितांचे पोटपाणी देवळे, पूजा-अर्चा, होमहवन ह्यावर अवलंबून आहे त्यामुळे ह्या प्रश्नावर जोरदार चर्चा होत आलेली आहे. आपण ह्या प्रश्नाचा आज उहापोह करूयात. 
मला विचारले तर देव प्राप्त करण्यासाठी पुरोहिताची गरज नाही. तुम्ही खऱ्या मनाने काहीही अर्पण केले तर ते देवापर्यंत पोचते, व तो संतुष्ट होतो. शबरीने उष्टी केलेली बोरे रामाला वाहिली व त्याने ती आवडीने खाल्ली हे उदाहरण तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत.  
पण थांबा थांबा, थोडे थांबा. आता तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन असे उष्टे देवाला वाहायला गेलात तर लोक म्हणजे आपला समाज तुम्हाला वेड्यात काढेल. तरीही विचित्र नवस बोलणाऱ्या लोकांची कमी नाही. एकाने १०८ नारळाचे तोरण देवाला वाहायचा संकल्प केला. ते १०८ नारळाचे तोरण त्याने घरी बनवून नेले आणि त्या ऐन गर्दीत देवाला वाहिले तेव्हा खरेच नवस फेडणे किती अवघड असते हे त्या गृहस्थाला कळले. असो. 
तर हे ईश्वर-देव प्राप्ती इतकी सोपी असताना हा पुरोहित वर्ग आला कुठून? शिवाय ह्या पुरोहितांचा मोठा रुबाब असतो. देवाचे नारळ, वाहिलेले साहित्य, साड्या, वस्त्रे इकडची तिकडे फिरवून तो फक्त पैसे मिळवत असतो. तेही विकलेल्या मालावर १०-२०% नफा असे नाही तर १००% त्याच्याच मालकीचे असते. हे कुणाही भक्ताला खरे तर अजिबात आवडत नाही. आत्ता कुठे लोक ह्या विषयावर मोकळेपणाने बोलू लागले आहेत. बर पुरोहीतही का गप्प बसावेत? ते म्हणतात कि लोक सिनेमाला हजार-दोन हजार असे खर्च करतात मग देवासाठी खर्च करताना का इतके ओरडतात?
तर हि पुरोहितशाही कशी जन्माला आली हे आपण आधी पाहूयात, मग सगळी उत्तरे आपोआप मिळतील. पुरोहित वर्ग आपल्याच काही चुका, निराशावाद आणि अज्ञानामुळे निर्माण झाला आहे असे मला वाटते. कसे ते पाहू.
१) प्रथांचे पालन:   वर आपण शबरीचे उदाहरण पहिलेच. देवाच्या पूजेच्या काही प्रथा आहेत. त्यापेक्षा वेगळे काही केले कि लोक मूर्ख म्हणतात हेही आपण पहिले. प्रत्येक कुळाच्या काही प्रथा व कुलधर्म कुलाचार आहेत. ते माहित होणे याविषयी प्रत्येकाची जिज्ञासा असते. पण बऱ्याचदा घरातील कर्ते पुरुष काय स्त्रियासुद्धा चांगला व भरभराटीचा काळ असताना त्यांच्या कुलदैवताकडे ढुंकूनही बघत नाहीत. एकदा अडचणी सुरु झाल्या कि नाही नाही ते उपाय करतात. ग्रहांच्या दशेप्रमाणे हा काळ बदलत असतो. तो किती आणि कसा असतो ते पहा. 
ग्रह महादशा वर्ष
सूर्य 6 वर्ष
चन्द्र 10 वर्ष
मंगल 07 वर्ष
राहू 18 वर्ष
गुरु 16 वर्ष
शनि 19 वर्ष
बुध 17 वर्ष
केतु 07 वर्ष
शुक्र 20 वर्ष
 ग्रहांच्या दशांचे दुष्परिणाम त्यांच्या कुंडलीतील स्थितीप्रमाणे मिळतात. दशेच्या ह्या तत्वाप्रमाणे प्रत्येक मानवाचे जेजे काही घडणार आहे ते नियत (म्हणजे नियतीप्रमाणे) घडत असते असे शास्त्र ह्यामागे आहे. वयक्तिकरित्या मी ते मान्य करत नाही कारण एकाच वेळी जन्माला आलेले दोन मानव एक चोर व एक सज्जन असे असतात. ते असे असतात कारण त्यांचे संस्कार तसे असतात.  व त्याप्रमाणे त्यांची नियती बदलत असते. हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे म्हणून याविषयी नंतर आपण चर्चा करू. पण मूळ मुद्दा तोच राहतो, जो संस्काराप्रमाणे कुलधर्म कुलाचार करतो तो पुढे जातो. जो भक्ती करतो तो ह्या कठीण किवा चांगल्या वेळेत तारून जातो. जो चांगली वेळ आली म्हणून सगळे विसरून जातो, उततो, माततो आणि नंतर वाईट वेळ आली कि आणाभाका घेतो असे करोडो लोक आहेत, तेव्हा नेमके पुरोहित लोकांचे फावते. 
२) जुन्या प्रथांचे संदर्भ:अनेक जुन्या प्रथा ज्यांची आज आपल्याला अजिबात गरज वाटत नाही त्या आज करायला लागतात. तळी कशी भरायची? बोडण (कुलदेवीला जाऊन आल्यानंतर ती आपल्याबरोबर येते व तिचा वास आपल्या घरी असतो. बहुतेक कुलदेवी ह्या भयंकर व उग्र आहेत त्यामुळे जर त्यांचे बोडण अथवा बोळवण केले नाही तर घरात भयंकर वाद, संकटे हि होतात. तेव्हा त्या देवीला परत पाठविण्यासाठी एक सवाष्ण व एक कुमारिका ह्यांना जेऊ घालून व सवाष्ण स्त्रीची ओटी भरून व कुमारिकेला वस्त्रे देवून बोळवण केली जाते) हे बोडण हा अतिशय सामान्य विधी आहे पण बऱ्याच महिला आर्थिक कारणांसाठी तो करीत नाहीत व नंतर नसते प्रश्न उपस्थित होतात. तसेच कुठले नवस कधी बोलावेत, भाग बांधणे म्हणजे काय? हेही बऱ्याच जणांना माहित नसते. नवसांचे विस्मरण हे आपले चौथीला पुजलेले प्रश्न आहेत. 
काही स्त्रिया-पुरुष हे मला लाखाचे कंत्राट मिळू देत मी सव्वा किलो पेढे वाहील हा नवस बोलतात. किवा वंशाचा दिवा मिळू देत ११ नारळाचे तोरण वाहील असे बोलतात. अगदी हसू येते अशावेळी. म्हणजे तुम्ही लाखो कमावणार आणि देवाला फक्त सव्वाशे रुपयाचे पेढे वाहणार! वाह रे वाह. अति-आजारपणात, किवा लग्न जुळू देत, नोकरी टिकू देत, अगर मिळू देत म्हणून माउली सव्वा किलो पेढ्याचा नवस बोलते आणि नोकरी लागली कि पोरग तिला सव्वा रुपयाला महाग करून टाकत. ही आपली मातृपुजक संस्कृती. 
आता भाग बांधणे म्हणजे काय? तर पूर्वी स्त्रिया बिचार्या संकट काळात मी संकट दूर झाल्यावर देवाला अमुक अमुक करील म्हणून एका कागदाच्या किवा कापडाच्या तुकड्यात सव्वा रुपया, सव्वा अकरा रुपये किवा घरातील अन्नधान्य बांधून ठेवीत असत, जेणेकरून ह्या नवसाचे विस्मरण होऊ नये हा यामागे उद्देश असे. नंतर जेव्हा कुलदैवत वरिला त्या जात तेव्हा हा नवस किवा संकल्प त्या पूर्ण करीत. 
पण माणूस हा मोठा लबाड प्राणी आहे. जेव्हा तो संकटात असतो तेव्हा नाही नाही ते वचन द्यायला तयार होतो आणि संकट गेले कि मस्त होतो हे देवालाही माहित असते. म्हणूनच देवाने त्याचे नवस असे सव्वा किलो पेढ्याचे सोपे ठेवले नाहीत. "अग बाई वा बुवा तुला मुलगा मुलगी हवीये ना? मग ती सव्वा किलो पेढ्याने मिळत नाही." तिला देशकार्यासाठी सोड. समाजकार्यासाठी सोड, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सोड हि प्रांजळ मागणी आपली कुलदैवते करीत आली आहेत, आणि खरे आईवडील ते देत आले आहेत. त्या आईवडिलांनी असे त्यांचे लाडके लपवून ठेवले तर ते संसार करू शकत नाहीत किवा बंडाळी करून समाजसेवेत घुसतात किवा त्यांना त्यांच्या मनासारखे करू दिले नाही तर ते वाया जातात, हा अनुभव आहे. त्यामुळे कुलदैवताचा नाद ज्यांना त्याचे महत्व कळते त्यांनीच करावा अन्यथा त्याला विसर्जित करावे व आपल्याला जे जे वाटते ते देव घरात आणून टाळ कुटत बसावे.
एक गम्मत बघा: ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरानी आपल्या कुलदैवतेसमोर स्वातंत्र्याची शपथ घेतली त्याच कुलदैवतेच्या मूर्तीला त्यांच्या घरचे मंदिरात ठेऊन आले. कारण काय तर ह्या कुलदेवता ह्या उग्र असतात, व संसाराला आग लावतात. सावरकरांची कुलदेवी अष्टभुजा ही सध्या एका खंडोबा मंदिरात आहे असे ऐकण्यात आले. म्हणजे ज्या देवीने तुम्हाला परधर्म आक्रमणातून वाचवले तिला तुम्ही सोडले. असे हे आपल्या समाजातले स्थित्यंतर असते. 
३) काशीयात्रा: हिंदू समाजात काशीयात्रा जन्माचे पूर्णत्व समजली जाते. काशीयात्रा करताना धनाची व जीवाची पर्वा करायची नसते. जन्मात हि यात्रा एकदातरी करावीच हा दंडक पूर्वी होता. जसे हज यात्रा तशीच हि आपली काशी! काशीला गेल्याचे फायदे काय? फायदे काहीच नाहीत तोटेच जास्त. एकतर तिथे लुबाडतात, शिवाय गलिच्छ अनुभव! 
पण असे नाही, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजींना त्यांची वंशावळ काशीला ज्ञात झाली असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपण कोण आहोत, आपले वंशज कोण, आपली दैवते कुठली, हि शंका असते. तर अशाप्रकारे प्रत्येक कुटुंबातील एक एक व्यक्ती पूर्वी काशीला जाऊन येत असे. आपण तिथे गेल्याची नोंद तिथले पंडे करून ठेवीत असत. नाव, आडनाव, गोत्र, दैवत, कुलदैवत, कुलधर्म कुलाचार ह्यांचे ते पुरातन डाटा सेंटर होते. आणि तिथे जाऊन यायला पाहिजे हा दंडक होता, म्हणजे आपण कोण आहोत आपले कर्म काय याची आपोआप माहिती मिळायची व्यवस्था आपल्या धर्माने करून ठेवली होती. हीच माहिती आपले पूर्वज जर साक्षर आणि जुना इतिहास जपणारे असले असते तर त्यांनी त्यांचे सगळे लिहून ठेवले असते व काशीला जायची गरजच पडली नसती. आपली आडनावे त्यांचे वर्ग, प्रवर्ग, गोत्र ह्यातही मोठे गूढ दडलेले आहे. जे ब्राम्हण आणि मराठा जातीच्या लोकांचे आहे तेच मातंग समाजाचे नाव, आडनाव आहे. त्यामुळे देवाप्रती भेदभाव नाही.
४) मंत्र-तंत्र यातील क्लिष्टता: अमुक पूजा अशीच केली पाहिजे, अमुक शांती अशीच केली पाहिजे नाहीतर फळ मिळणार नाही असा एक समज आपल्या सर्वांत पसरलेला असतो. त्यावर उत्तर म्हणून शबरीचे उदाहरण तर आहेच, एखाद्याला अमुक नक्षत्र दोष आहे, एखाद्याला साडेसाती आहे किवा गुरुबळ नाही, एखाद्याला चुकलेल्या नवसाचा त्रास होतो आहे, कुणाचे बोडण राहिले आहे. असे असंख्य प्रश्न कुंडलीच्या अभ्यासाने किवा अनुभवाने समोर येतात. तेव्हा माणूस पुरोहिताकडे धाव घेतो, आणि खिसे मोकळे करून घेऊन आणखी एक संकट ओढवून घेतो. असे करायची खरेच गरज आहे का? तुम्ही ज्यांना मानता अशी पक्की १-२ दैवते तर बहुतेकांची असतात. त्या दैवतांशी संवाद साधायचा आपण प्रयत्न करतो का? तर करीत नाही. कारण देवांना मंत्राची भाषा कळते. आपली साधी भाषा कळत नाही असा आपला समज असतो. खरेच जो परमेश्वर कर्ता- नियंता आहे त्याला फक्त एक २००० वर्षापूर्वी जन्माला आलेली संस्कृत भाषाच कळते का? मग गणपतीची आरती मराठीत का? तर असे काही नाही. भाषा हे तुमची देवाप्रती व्यक्त करायच्या श्रद्धेचे एक माध्यम आहे. भाषा कुठलीही असू शकते. मग पुढचा प्रश्न मनात उभा राहतो कि देवाला नक्की काय म्हणायचे. त्यासाठी मात्र थोडे डोके चालवणे गरजेचे आहे. शरीर बलवान करण्यासाठी व स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनेक मंत्र आहेत ते मंत्र अपुरा राहिलेला नवस पूर्ण करण्यासाठी म्हणून उपयोगी आहेत का? किवा एखाद्या नक्षत्राचा दोष, साडेसाती, गुरुबळ नाही अशी स्थिती असताना एखादे भावपूर्ण भजन म्हणून उपयोग आहे का? उत्तर नाहीच-नाही असे आहे. पुढे येते मंत्राची संख्या!
म्हणजे एकीकडे लोक लाखोंचा फायदा पदरात पाडून घेऊ इच्छितात आणि त्यासाठी एखादा मंत्र सहज पुट-पुटतात. मोठा गुन्हा करून एका मंत्राने त्याला क्षमस्व मिळावे हि अपेक्षा असते. तर थोडक्यात सांगायचे हेच कि केलेल्या कर्माचे किवा अज्ञानाचे इतक्या वेळा क्षमस्व मागायला हवे कि आपण ते परत करणार नाही हे चांगले लक्षात राहिले पाहिजे म्हणून मंत्र हजारो-लाखो अशा संख्येने म्हणावे लागतात. पण असे हजारो वेळा मंत्र म्हणायचे तर ते सूत्रबद्ध व तालबद्ध असतील तरच कमीत कमी चुका करता म्हणता येऊ शकतात. १५ व्या शतकात तुकोबांनी अनेक ओव्या रचल्या त्या अशाच प्रकारे! त्यांचेच पुढे मंत्र व अभंग झाले. आपण जर साधी साधी वाक्ये अशी सूत्रबद्धपणे तयार करून हजारो नाही पण किमान शंभर वेळा म्हणून शकलो तर तो आपल्या बोली भाषेतील एक मंत्रच बनून जातो. आता साधे उदाहरण पहा गुरूच्या मंत्राचे, "देवांच्या आणि ऋषींच्या गुरु असलेल्या बृहस्पती तुझे शरीर सोन्याने झळाळलेले आहे, तुला माझा नमस्कार असो. माझ्या राशीला असलेल्या तुझ्या प्रतिकूल स्थितीपासून तू माझे रक्षण कर, असे अगदी सध्या मराठीत आपण म्हटलो तर ते गुरूला ऐकू जाणार नाही का? कि गुरूला फक्त संस्कृतच समजते?
देवाधर्माचे गूढ म्हणजे यज्ञ करणे, शांती करणे, कर्मकांड ह्यामुळे पुरोहित वर्गाला पैसा मिळू लागला पण बहुजन समाजाने ह्या कर्मकांडाचे महत्व वाढू दिलेले नाही हेही तितकेच खरे आहे व कर्मकांडाचा मार्ग समाजाने फारसा स्वीकारला नाही. पण अजूनही बहुजन समाजाच्या कुलदेव-देवीच्या मंदिरातून पुरोहित वर्ग हद्दपार होत नाही हेही विचारात घेणे महत्वाचे आहे. आपले स्वतःचे प्रबोधन जोवर आपण करून घेऊ शकत नाही तोवर हा पुरोहित वर्ग आपल्याला लुटतच राहणार व त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणार. गम्मत आहे ना.




Thursday, 7 April 2016

हस्तरेषा, ज्योतिष्य हे शास्त्र नाही का?

एखादे तत्व शास्त्रीय आहे असे आपण केव्हा म्हणतो? जेव्हा त्याची शास्त्रीय सिद्धता होते तेव्हा. जसे एखादा विषारी पदार्थ खाल्ल्यावर माणूस मरतो, किवा एखादे रक्तदाब कमी करणारे औषध खाल्ल्याने रक्तदाब खरेच  कमी होतो. तेव्हा ते औषध सिद्ध झाले असे म्हणता येते. त्याला क्लिनिकल ट्रायल असे म्हणतात. तसेच इतर शास्त्रात देखील असे सिद्ध होणे गरजेचे असते. जसे सोनोग्राफी करताना फक्त काही कंपने शरीरात सोडली जातात व परत मिळवली जातात व त्यावरून शरीरातील अवयवांचे चित्र तयार होते. शरीर कुठेही कापावे लागत नाही. एक्स-रे, दूरध्वनी इत्यादी तंत्र अशाच प्रकारे चालतात. हे वैज्ञानिक चमत्कार आहेत. ते कसे साध्य केले जातात त्याचे शास्त्र आहे. शास्त्राची सिद्धता करताना निरीक्षणे व परिणाम हे नोंदवून ठेवावे लागतात. नंतर अमुक एक शास्त्र हे सिद्ध झाले असे आपण म्हणतो तेव्हा एका ठराविक टक्क्यांपेक्षा अधिक टक्के जर परिणाम अचूक आले तर ते शास्त्र सिद्ध झाले असे म्हणतात. 
दुर्दैवाने ज्योतिष्य किवा हस्तरेषा विषयक शास्त्र ह्याबाबत असे निरीक्षण नोंदवणे किवा परिणाम ह्यांची नोंदणी झालेली नाही. साधारणतः नऊ महिन्यात मुल जन्माला येते हे आपल्याला अनुभवाने माहित आहे म्हणून त्याची नोंद कोणी ठेवत नाही तशातलाच हा प्रकार आहे. ज्योतिष्यशास्त्र, किवा हस्तरेषा ह्यांचा अभ्यास हजारो वर्षे चालत आलेला आहे. फार पूर्वी अशी निरीक्षणे नोंदवणे किवा त्यांना आव्हान देणे हा प्रकार घडलेला असू शकतो. पण नंतर एकदा का तो नियम सिद्ध झाला कि कोणी नवीन निरीक्षण करायच्या भानगडीत पडत नाही किवा आव्हानही देत नाही. चार्वाक, आयतक इत्यादींच्या काळात निरीश्वर व भोगवादी विचारसरणी वाढीस लागली त्यावेळी बहुदा ज्योतिष्य, दैव ह्यांना आव्हान दिले गेले असावे. नियती असते का? कि सगळे जीव अनियत जगत असतात असाही प्रश्न विचारला गेला असावा व आजही विचारला जातो. 
ह्या प्रश्नांची उत्तरे देणास एकही समर्थ ज्योतिषी समोर उभा राहत नाही कारण कोणीही कसलीही निरीक्षणे नोंदवून ठेवत नाही. अमुक एक ग्रह खराब आहे, गुरुबळ नाही, साडेसाती आहे, अमुक नक्षत्र शांती आहे असे साचेबद्ध उत्तर सगळे ज्योतिषी देतात. हा आपल्या भारतीय लोकांचा एक दुर्गुण म्हणावा लागेल, कारण एकतर आपण जे रोज काही करतो, अनुभवतो त्याची निरीक्षणे कुठेही नोंदवून ठेवत नाही. त्यांची तुलना/अभ्यास करत नाही. आपली निरीक्षणे एकत्रित करीत नाही. एकमेकांना वाटून त्याचे ज्ञान वाढवत नाही. असे असेल तर आपण कुठलेच नवीन शोध लावू शकत नाही. आपण फक्त पाश्चिमात्य लोकांनी शोधलेले शोध वापरतो आणि त्यांची वाहवा करत राहतो. आपण जे शोधले आहे ते विसरून जातो. 
आता गम्मत बघा, जो धडधाकट असतो तो डॉक्टरकडे कधी जात नाही. जो अशक्त, वयोवृद्ध असतो तोच जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्रात जेव्हा एखादा माणूस काही अडचणी नसतात तेव्हा तिकडे ढुंकूनही पाहत नाही पण जेव्हा प्रतिकूल ग्रहस्थिती निर्माण झाल्यावर नाही नाही ते उपाय करत फिरतो. ज्योतिष्यशास्त्रीय अभ्यासक लोकांनी असे धडधाकट आणि आजारी अश्या दोनही प्रकारच्या लोकांना कायम नजरेखाली ठेवायला हवे, आणि योग्य वेळी "अब आया उंट पहाड के नीचे" ह्या तत्वाप्रमाणे त्यांचाही अभ्यास व सर्वांगीण निरीक्षणे करायला हवीत. 
औषधे खाऊन जिवंत राहणे आणि ज्योतिष्य पाहून जीवन जगणे ह्यात फार मोठा फरक आहे. जो ज्योतिष्य बघून जीवन जगतो त्याला औषधे खायची गरज नसते. त्याचे ध्येय निश्चित असेल तर तो अधेमधे ज्योतिष्यविषयक सल्ला विचारायला येऊ शकतो. एखादा अट्टल चोर, खुनी गुंड हा कधी ज्योतिष्याला विचारून चोरी करायला जात नाही. त्याची चोरी करायची एक मानसिकता (वेड) असते. शिवाजींना स्वराज्याचे वेड होते, अनेक मोठमोठे क्रांतिकारी ह्यांना अशीच अनेक वेडे होती. त्यांनी ज्योतिष्यांना विचारून त्यांचे कर्म केले नाही, उलट नंतर ज्योतिष्यांनी त्यांचा अभ्यास करायचा प्रयत्न केलाय. सलमान खान ह्या महाभागाने आजच कोर्टात "मी फक्त पाणी पिउन गाडी चालवत होतो" असे लेखी दिले आहे, त्यावरून मी त्याची जन्मकुंडली सहज तपासली. फारच भयंकर!! एकाला खलास केले, अनेकांना जखमी केले, तरीही हा माणूस अजुनही पैश्याच्या गुर्मीत जगतोय आणि आपली सिस्टीम त्याला सहन करतीय. तो मस्त गावभर फिरतोय. कोणी त्याची कुंडली उघडली नाही. असे चोरांचे दिवस किती सहन करणार आपण? आपणच त्याला पैसे मिळवून दिले आणि तोच आपल्याला रस्त्यावर चिरडतो. थोडीही माणुसकी त्याच्यात नाही. हा जसा सलमान तसेच आपले राजकारणी लोक !!. ज्या छगन भुजबळला लोकांनी आपला आपला म्हणून मोठा केला त्यानेच जनतेचा केसाने गळा कापला. कोणीही ह्या लोकांच्या कुंडल्या का खोलत नाहीत. अरे तरुणानो पुढे या, शिका निरीक्षणे करा, ती नोंदवा. सिद्ध करा ज्योतिष्य. बरेच काम आहे इकडे. नाहीतरी तुमचे आईवडील कष्टात जगले आणि तुम्हाला शिकवत आले आहेत. तुम्ही शिकता ते परदेशी विद्या. पण त्यातून काही होत नसेल तर इकडे या आणि संशोधन करा. अवघड वेळ आली कि ज्योतिष्यासमोर हात करून बसण्यापेक्षा स्वतः शिका आणि मोठे व्हा. असे मोठे झालात तर नक्कीच तुम्ही सर्वश्रेष्ठ असाल.

Thursday, 3 March 2016

ग्रह-तारे आणि आर्थिक नियोजन.

एका "क्ष" व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा आणि राशीकुंडलीचा अभ्यास करून धन कसे कमवायचे ह्याचा सल्ला इथे उदाहरणासहीत देत आहे. तर ह्या व्यक्तीची रास आहे धनु. शिवाय राशीस्वामी गुरु हा धनु ह्या स्वराशीला आहे. लाभात सूर्य उच्चीचा (मेषेचा) अशी पत्रिका असलेली हि व्यक्ती आहे. धनु हि रास जशी गुरुबळानुसार बलवान बनते तसेच रवीची गतीही ह्या राशीला फार महत्वाची असते. सध्या ह्या राशीला पाचवा (२-५-७-९-११ यापैकी एक) गुरु आहे, म्हणजे राशीला उत्तम गुरुबळ आहे. ह्या काळात उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. 
दुसरे म्हणजे ह्या राशीला साडेसाती चालू झालेली आहे. आता आपण गुरु शनि आणि रवि ह्यांचा एकत्र विचार ह्या पत्रिकेच्या बाबत करू. 
१) गुरुबळ उत्तम म्हणून उत्तम आर्थिक लाभ,
२) रवी हा ह्या राशीला मकर संक्रांतीला धनस्थानात (म्हणजेच मकर राशीला) गेला. रवी हा पापग्रह असल्याने तो ३-६-१०-११ ह्याच स्थानात अनुकूल असतो म्हणून ह्या पत्रिकेला (तो दुसऱ्या स्थानात आल्याने) तो प्रतिकूल होता. नंतर तो कुंभ राशीला १५ फेब्रुवारीला गेला. म्हणजे तो राशीला तिसरा व अनुकूल झाला. 
३) शनीची साडेसाती हि अडीच वर्षे एका टप्प्यात याप्रमाणे तीन टप्पे म्हणजे साडेसात वर्षे चालणार आहे. 
४) ह्या व्यक्तीला राहू दशा चालू आहे. राहू अष्टमात असल्याने २०२० पर्यंत त्याची फळे म्हणजे आप्तस्वकीय ह्यांच्यापासून दूर जाणे, मित्र, जवळची माणसे नसणे, पैशासाठी लोक वाईट वागणे हि आहेत. हि दीर्घकालीन फळे आहेत.

तर ह्या व्यक्तीने काही आर्थिक गुंतवणूक केलेली होती. मकर राशीला रवी येणार म्हटल्यावर धनु राशीच्या लोकांनी सावध व्हायला हवे. नेमके तेच ह्या व्यक्तीने केले. त्याने जानेवारीच्या सुरुवातीला सगळी गुंतवणूक काढून घेतली. वरील चित्रात व्होटसअप मासेज (७ जानेवारीचा) दिलेला आहे. त्यात बँकेचा एजंट पुन्हा कधी गुंतवणूक करणार म्हणून विचारात आहे. तेव्हा ह्या व्यक्तीने फेब्रुवारीच्या मध्याला गुंतवणूक करणार म्हणून सांगितलेले दिसते. 


ती गुंतवणूक वर दिलेल्या चित्राततल्या योजनेत केलेली होती. ह्या योजनेत दरमहा एका लाखाला ६५८ रुपये इतका करमुक्त लाभांश (डिव्हिडंड) मिळत होता. इतका लाभ बँकेत रक्कम दीर्घकालीन ठेव करूनही मिळत नाही. नेमका जानेवारी महिन्यात तो फक्त ०.०२ प्रती युनिट म्हणजे १६५ रुपये इतकाच मिळाला. त्यानंतरच्या महिन्यात (१५ जाने -१५ फेब्रु.) तो मिळालाच नाही. कारण मार्केट अगदीच कोसळले होते. आणि नेमका रवी मेष राशीला (म्हणजे ह्या व्यक्तीच्या राशीला ३रा) पूर्ण अंशात १३ फेब्रुवारीला आला तेव्हा मार्केट परत तेजीत आले. ह्या व्यक्तीने ह्याचा नेमका फायदा घेत फेब्रुवारीच्या शेवटी परत ह्याच योजनेत गुंतवणूक केली.
आता मार्केटने ७७७+४६०+३०० = अशी १५३७ अंशाची उडी घेतली आहे. जेव्ह्या ह्या व्यक्तीने योजनेचे युनिट्स  विकत घेतले तेव्हा त्याची किंमत १२. १६ प्रती युनिट होती तीच आज १२.६० प्रती युनिट झाली आहे. म्हणजे एका लाखाची त्याला ८२२३ इतकी युनिट मिळाली, आणि प्रत्येकी १२. ६-१२.१६ = ०.४४ रुपये इतका आज रोजी फायदा झाला. म्हणजे लाखाला ३६१८ रुपये इतका फायदा झाला. शिवाय लाभांश मिळणार तो वेगळाच.
तर अशा प्रकारचे गुरुबळ, रवी शनीची चक्रे चालू असतात त्यातून आपला नेमका लाभ साधून घेण्यासाठी सावध असणे गरजेचे असते. मार्केट मध्ये मध्यम जोखीम असलेले व्यवहार करण्यास काहीच हरकत नसते. इतकेच कि अतिजोखीम असलेला सट्टा खेळू नये.
(टीप: वरील लेख हा उदाहरणासाठी दिलेला आहे, त्याच्या अनुषंगाने कोणी कुठे आणि कशी गुंतवणूक करावी व होणाऱ्या फायदा तोट्याला लेखक जबाबदार नाही)

Saturday, 20 February 2016

जोगत्या-जोगतीण, वाघ्या-मुरळी

जोगत्या-जोगतीण, वाघ्या-मुरळी  ह्यांचे सामाजिक स्थान हा विषय तसा किचकट आहे, बहुजन समाजाच्या नाजूक भावना इथे गुंतलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रथा चाललेल्या आहेत त्या आपला समाज एका भीतीपोटी सोडायला तयार नसतो. देवाचा किवा देवीचा कोप होईल अशी भावना यामागे असते. तर हे नक्की काय समाजशास्त्र आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. ह्या प्रथांमागील समज गैरसमज ह्यांचा अभ्यास करणार आहोत. 
प्रामुख्याने तीन प्रकारचे पंथ आपल्या महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आढळतात.

१) वाघ्या-मुरळी:
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे:
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे:

१) वाघ्या-मुरळी: हे खंडोबा देवाचे भक्त होत. पूर्वी बरेच प्रयत्न करून ज्यांना संतान सुख मिळत नाही असे लोक खंडोबाला नवस बोलत आणि नवसाच्या पूर्ततेसाठी होणारे पहिले मुल, वाघ्या किवा मुरळी हे देवाला अर्पण करीत. देवाची कृपाच म्हणा कि ह्या मार्गाने अनेकांना मुले झालेली आहेत आणि ही प्रथा टिकून आहे. ह्या वाघ्या-मुरळीने आयुष्यभर ब्रम्हचारी राहून देवाची सेवा करणे अपेक्षित होते. देवाची स्तुतीपर गाणी गाऊन, तसेच जागरण गोंधळाचे कार्यक्रम करून आपला चरितार्थ चालवले आणि देवाच्या कार्याचा इतिहास लोकगीतांच्या माध्यमातून प्रवाहित ठेवणे असे दोन उद्देश ह्यामागे आहेत. 
खंडोबा जरी लगेच प्रसन्न होणारा देव असला तरी त्याचे नवस फार कडक आहेत, त्याचे प्रकार म्हणजे पायी वारी करणे (दर सोमवती अमावस्या, खंडोबाचे घट यांच्यावेळी आपल्या घरापासून पायी खंडोबाला जाणे), पाठीला लंगर (एक हुक) अडकवून देवाची प्रदक्षिणा करणे, अगीवरून चालणे, किवा वाघ्या-मुरळी सोडणे असे नवसाचे प्रकार आहेत. आत्ताच्या वैज्ञानिक युगात हे प्रकार अतिशय भयानक वाटतात पण आपल्या पूर्वजांना हे करण्याशिवाय पर्याय नव्हते हेही तितकेच खरे आहे. सर्वात जास्त सामाजिक परिणाम वाघ्या-मुरळी प्रथेचे आहेत. बळजबरीने ब्रम्हचारी व्हायला लागल्याने वाघ्याच्या जीवनातील अर्थ नष्ट झाल्यासारखा वाटतो, तर अविवाहित राहिलेली मुरळी म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असा एक समज एकेकाळी झालेला होता. त्यात दोन्ही बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. एकतर एकटी स्त्री म्हणजे आपली भोगवस्तू अशी समाजातील सबळ घटकांची प्रवृत्ती असते. तसेच स्त्रीलाही काही शारीरिक गरजा असतात हा दुसरा भाग. 
त्यातील पहिला भाग जो आहे तो आपणच सामाजिक प्रबोधनाने टाळू शकतो. आधी आपण हे समजून घ्यायला हवे कि ती स्त्री एक स्वतंत्र नागरिक आहे, ती एकटी आहे आणि आपण आर्थिक, सामाजिक दृष्ट्या बलवान आहोत म्हणून तिला उपभोगुन सोडून देणे कितपत योग्य आहे. 
दुसरे असे कि वाघ्याचा घरवाघ्या नावाचा प्रकार असतो, तो घरात राहून संसारी जीवन जगतो, विवाह करू शकतो पण एकदा वारीस जाणे देवाची स्तुती करणे ही कामे करणे गरजेचे असते. तसेच मुरळीला का असू नये?
मुळात वाघ्या-मुरळी ह्यांचा उद्देश देवाची स्तुती करण्यासाठी आहे हे समजून घेतले तर पुढचे प्रश्न आपोआपच सुटतात. मुरळीही घरात राहून देवाची सेवा करू शकते. स्तुती गाऊ शकते. एका पुरुषास किवा स्त्रीस आपल्या देवाचा कोप न ओढवून घेता, सामाजिक अवहेलानेच्या दरीत लोटण्यापेक्षा हा मार्ग योग्य आणि समर्पक आहे. 
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे: बर्याच घरात वंशपरंपरेने माळ परडी, पोत इत्यादी चालत आलेले असते. ते टाकून कसे द्यायचे असा प्रश्न पुढे उभा राहतो. तसेच घरात माळ परडी असणे म्हणजे ते कडक नियम पाळायचे हे आलेच. 
छत्रपति शिवाजी महाराज हे कुलदैवत तुळजाभवानीचे परम भक्त होते. ते स्वतः गळ्यात कवड्यांची माळ घालून हातात परडी घेऊन देवीचा जोगवा मागत असत असे सांगितले जाते. जोगवा शब्द हा जोग-योग म्हणजेच योगी (वैराग्य) ह्या शब्दावरून साधला आहे. वैराग्याशिवाय योग साधणे अवघड आहे. योगी जे मागतो तो योगवा अर्थात जोगवा. ह्यामागे शिवाजींच्या व्यक्तिमत्वाची दोन वैशिष्ठ्ये स्पष्ट होतात.
१) संसारी जीवनात राहूनही ते योगीत्वात (वैराग्य) गेले होते.
२) जोगवा अर्थात भिक्षा मागणे ह्यामागे स्वतःला गर्व न होऊ देणे हा उद्देश आहे. 
तर सांगायचा उद्देश हाच कि तुळजाभवानी देवीचा जोगवा मागणे म्हणजे लाजिरवाणे असे काही नाही. त्यासाठी अराधीच असायला हवे असेही काही नाही. जोगवा मागणारे सगळेच भिकारी आहेत असा दृष्टीकोन ठेवणे हेही चुकीचे आहे. माळ परडी असणारे लाखो भक्त तुळजापूरला आढळतात, ते त्यांचे संसारी जीवन व्यवस्थित जगतात. नियम पाळायचे म्हणाल तर थोडा संयम व हट्टीपणा सोडला तर सगळे सुरळीत होते. 
पुढे बर्याचदा ज्यांच्या घरात माळ परडी आहे त्यांचा अंगात येते असाही समज आहे. हे थोडेफार खरे आहे असे म्हणावे लागेल. माझा असा अनुभव आहे कि माळ परडी असलेल्या घरात एक किवा अधिक संततीला मंगळ असतो, डोके तापट असते. संसारात अडचणी उत्पन्न होतात. पटत नाही. अशावेळी एक साधा उपाय करावा. आपल्याला अंगात आल्यासारखे वाटत असेल तर तुळजापूर देवीच्या मंदिरात जाऊन सरळ देवीला निवेदन करावे कि मला प्रापंचिक कारणांमुळे हे देवी तुझा हा संचार करवून घेणे सध्या शक्य नाही तेव्हा मला क्षमा कर. मी तुझी नित्यनेमाने सेवा करील. विशेष म्हणजे हे मला एका जेष्ठ पुजार्याच्या ८१ वर्षीय आईने सांगितले आणि हा खरेच परिणामकारक उपाय आहे.  
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे: इथे मात्र गंभीर प्रश्न आहेत, स्त्रीची जट (म्हणजे केसांचा गुंता) झाला कि तिला जोगतीण म्हणून सोडून द्यायचे, तसेच लैंगिकदृष्ट्या असमर्थ, लघवीतून रक्त जाणे इत्यादी कारणास्तव पुरुषास सोडून द्यायचे अशी ही प्रथा आहे.नवसाचा हि प्रकार इथे असतोच. आत्ता झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या काळात वरील कारणे उपाय करून दूर करता येतात. पण आपल्या समाजात अजून दूर खेड्यात प्रगती पोचलेली नाही. गरिबीमुळे मुले सोडून देणार लोकही आहेत. तर असो. 
मूळ उद्देश इथेही देवीचे भक्त बनून तिची स्तुती करणे हेच आहे. एखाद्या जोगत्याचा अनैसर्गिक लैंगिक छळ करणे हे चुकीचे आहे. आपल्या धर्माला समलिंगी संबंध मान्य नाहीत म्हणून आपण हिरहिरीने सांगतो पण आपल्याच समाजात ह्या आराधी लोकांबरोबर बीभत्स वागणारे लोक आहेत त्यावर आपण मुग गिळून गप्प बसतो हे चुकीचेच आहे. तसेच जोगतीण हिलाही देवीची सेवा करत असताना संसारी जीवन जगण्यात काहीच गैर नाही. कारण तसेही तिचा उपभोग समाज घेतो तो स्वार्थी उद्देशाने घेत असतो. तिथे जी शरीर क्रिया होणार आहे तीच संसारी जीवनात तिची नवऱ्याबरोबर होणार आहे. तसेच असा विचार करा की योगायोगाने समजा मोकळ्या समाजात फक्त एकच पुरुष तिला भेटला आणि त्याच्याबरोबरच संभोगाची क्रिया घडली तर ती वाईट का? आणि अनेकांबरोबर घडली तर चांगली? म्हणून जोगतीनीने संसारच करू नये हे म्हणणे चुकीचेच आहे.
एखादा आराधी ज्या हिडीसपणे वागत असतो त्याला समाजाने दिलेल्या अवहेलनेचे कारण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे, तोही एक माणूस आहे त्यालाही जगण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे. शारीरिक सुख हे थोडा काळ अस्तित्वात असते नंतर सामाजिक प्रतिष्ठा गरजेची असते हे मुले मोठी करताना आपल्यासारख्या संसारी स्त्री- पुरुषांना वयाच्या चाळीशीत समजते.  

शेवटी सगळे प्रश्न पोटाकडे येउन थांबतात, एकेकाळी पोट भरण्याची साधने तुटपुंजी असताना व जन्माधारित व्यवसाय असताना वरील पंथ हे पोट भरून उपजीविका करण्यास बनवले गेले असे म्हटले तर वावगे ठरू नये. नंतर काही सामाजिक विकृती त्यात घुसल्या हेही स्पष्ट दिसते. अन्यथा ह्या संस्थेचा मूळ उद्देश पवित्र आहे, गीत  संगीताची उपासना करून एक लोककलेचा वारसा जपणारा हा पंथ आहे. तो एक संस्कृती म्हणून आपण जपणे त्यातील चुकीच्या आणि विकृत प्रथा छाटून टाकून हा वृक्ष जोपासणे नक्कीच आनंददाई आहे. 









Friday, 12 February 2016

भविष्यकथन

भविष्यकथन हा ज्योतिषशास्त्रातला सर्वांना हवाहवासा वाटणारा विषय आहे. समोर ज्योतिषी दिसला कि जन्मकुंडली पुढे टाकून किवां हात पुढे करून प्रत्येक जण भविष्य विचारतो. ज्योतिष्य सांगणारा सुद्धा अशावेळी फॉर्मात येतो आणि आपले जे काही ज्ञान आहे त्याच्या जोरावर भविष्य सांगायला सुरुवात करतो.
ज्योतिष्यशास्त्र बदनाम होण्याचे एक कारण हेही आहे कि बऱ्याच ज्योतिष्यांना भविष्यकथन या प्रकारची पूर्ण माहिती नसते. त्यात नाडीज्योतिष्य, हस्तरेषा आणि जन्मपत्रिका यावरून असे भविष्य कथनाचे प्रकार आहेत. हात पाहून भविष्य सांगणे हा तसा सोपा प्रकार आहे पण त्यात अचूक कालनिर्णय (१-२ महिन्याच्या अंतराने) करता येणे शक्य नाही. कारण हातावरच्या रेषा साधारणतः ६० ते ७० वर्षांचे आयुष्य दर्शवितात त्यात १-२ महिन्याची अचूकता शोधणे म्हणजे १ मिलीमीटर लांबीच्या रेषेचा अभ्यास करून भविष्य सांगणे असा होतो व ते फारच अवघड काम आहे. आत्ता आपण हस्तरेषा किवा नाडीभविष्य याचा विचार न करता फक्त जन्मकुंडलीप्रमाणे भविष्यकथन याविषयी माहिती करून घेऊयात. 
बहुतेक लोकांचा असा समज असतो कि जसे आकाशातील ग्रह तारे बदलतात तसे माणसाचे नशीब बदलत असते, पण हे चुकीचे आहे. माणसाचे प्राक्तन हे खरेतर ग्रहदशेप्रमाणे बदलत असते. ग्रहदशा आणि त्यातील अंतर्दशा हि साधारणतः १ ते २ वर्षे टिकते. एका ग्रहाची महादशा ५ ते २१ वर्षे असते तर त्या अंतर्गत दुसऱ्या  किवा त्याच ग्रहाची अंतर्दशा १ ते २ वर्षे अशा स्वरुपात चाललेली असते. महादशेचे फळ हे विस्तृत असते. त्या काळात माणसाच्या आयुष्याचा ठराविक टप्पा अधोरेखित होतो. जसे बालपण, शिक्षणावस्था, नोकरी-व्यवसाय व अर्थार्जन, संसार व संतती-सुख, म्हातारपण हे सगळे महादशेचे टप्पे असतात. त्यात अंतर्दशा हि शिक्षणात होणारे बदल, नोकरीत होणारे बदल, संसार सुखात /संतती सुखात होणारे बदल दर्शवित असते. एका ग्रहदशेत साधारणतः एकंदर परिस्थिती स्थिर असते. फारश्या उलाढाली होत नाहीत. इतकेच काय एखादा माणूस मृत्यू पावला तरी त्याचे बँकेतील पैसे, त्याचे कुटुंब हे एका ठराविक स्थिर अवस्थेतच राहते. फार परिवर्तन होताना दिसत नाही. ग्रहदशेचे फलित अचूकपणे सांगणे फारच कौशल्याचे काम आहे. मूळ जन्मपत्रिकेतील त्या ग्रहाचे स्थान, त्याचे उच्च-नीचत्व, त्याचे नक्षत्र यावरून दशेचे फलित कळते. तसेच जन्मापासून काही ठराविक काळापर्यंत ग्रहांच्या दशेचे फळ मिळत नाही. मुल जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा त्याला चंद्रदशा म्हटले जाते. जन्माला आल्यापासून ५ वर्षे मातृदशा, तर १२ व्या वर्षापर्यंत पितृदशा, पुढे १६ व्या वर्षापर्यंत राष्ट्रदशा असते. नंतर त्यापुढे ग्रहदशा फळे द्यायला सुरुवात करते. मातृदशा, पित्रुदशा, किवा राष्ट्रदशा याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या आई, वडील आणि ज्या प्रदेशात ती व्यक्ती राहत असते त्यांचा परिणाम. 
मग माणसाच्या आयुष्यात चोरी, अपघात, विवाह, नोकरीचा लाभ अश्या अनेक घटना अचानक घडतात त्यांचे कारक कोण असते असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. तर हा गोचरीच्या ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक गोचरीचा ग्रह व त्याची इतर ग्रहांबरोबर होणारी युती हि मानवाच्या आयुष्यात एक संधी, संकट, शुभ/अशुभ योग घेऊन येत असते. गुरु-चंद्र, गुरु-मंगळ, रवि-गुरु इत्यादी शुभ संधी असतात, तर शनि-मंगळ, शनि-रवि, शनि-राहू, राहू-मंगळ हे अशुभ योग होत. अशा संधींचा योग्य फायदा उठवणे व मिळणे हे माणसाच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या गुणधर्मानुसार ठरते. एखादे संकट प्राणावर न बेतता सुटका होते तर दुसर्याचा बळी जातो असे गोचरीच्या ग्रहांमुळे सतत चढउतार होत राहत असतात. 
म्हणून भविष्यकथन हा मोठा गुंतागुंतीचा व कौशल्याचा प्रकार आहे. तरीही आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचे अनुमान करण्यासाठी काही ठोकताळे आहेत त्यांचा आपण थोडक्यात विचार करूयात. 
पुरुषाच्या विवाहाचे वय: पुरुषाच्या विवाहाचा योग त्याच्या जन्मकुंडलीतील राहूच्या योगात ज्यावेळी गुरु येतो तेव्हा सुरु होतो. राहू-गुरु एकत्र असणे, किवा राहुपासून पासून गुरु चवथा, सातवा असणे असा हा योग असतो. ह्यावेळी जेव्हा-जेव्हा गोचरीत मुलाला गुरुबळ येते (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) तेव्हा विवाह घडून येतो. 
स्त्रीच्या विवाहाचे वय: स्त्रीच्या विवाहाचे वय हे पूर्णपणे गोचरीच्या गुरुप्रमाणे असते, गुरुबळ उत्तम असता (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) विवाह जमू शकतो. 
मूळ जन्मकुंडलीत खराब योग, करण, नक्षत्र असेल तर शांती/उपाय करून विवाह लवकर ठरतो. मंगळ असेल तर समोरचा मुलगा/मुलगी यांची पत्रिका अनुकूल असेल तरच योग येतो. तोवर विवाह जुळण्यात अडचणी व मनस्ताप सहन करावा लागतो. 
नोकरी लागण्याचा, प्रमोशन यांचा कालखंड लग्नेश-दशमेश यांच्या योगावर अवलंबून असतो. 
तर अशा प्रकारे भविष्यकथन केले जाते. आपण जे वर्तमानपत्रात भविष्य वाचतो ते खरेतर भविष्य नसून फक्त येणाऱ्या संधी किवा संकटे यांची चाहूल दिलेली असते, त्यावर कसे आपण कसे वागणार यावर खरे फळ अवलंबून असते. साडेसातीचेही तसेच असते. आपण एखाद्या संधीवर किवा संकटावर कसे व्यक्त होतो यावरच आपले खरे प्रारब्ध अवलंबून असते. याशिवाय काही ज्योतिष्यांना वाचाशक्ती वगैरे प्रकार असतो ते कदाचित अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर किवा जातकाला काही दैवी उपाय सांगून हवे ते घडवून आणू शकतात. पण मला त्याविषयी फारसे माहित नाही. 

Wednesday, 13 January 2016

प्रतिकूल ग्रह: जप, शांती व दान

बऱ्याचदा जीवनात असे प्रसंग येतात कि अचानक प्रतिकूल गोष्टी घडू लागतात, अंगात उत्साहच राहत नाही, भयंकर निराशा येते. त्यामुळे पुढे देवावरचा विश्वास उडू लागतो. अश्या वेळी थोडे तपासले तर गोचरीचे ग्रह चांगले नसतात हे अनुमान निघते. पुढे दिलेले दाते पंचांगातील गोचरीच्या ग्रहांचे वर्णन वाचा,

सर्वात आधी गुरूचा विचार करूया, गुरु ज्या राशींना (चंद्र-राशी) ४-८-१२ वा येतो तेव्हा तो त्या राशीच्या लोकांना प्रतिकूल समजला जातो. सगळ्याच स्तरांवर अपयश येत राहते. अशा व्यक्तीला कसलाच उत्साह, इर्षा नसते मग अपयश येणे साहजिक आहे. गुरूचा अशुभस्थानी एकंदर वाईट परिणाम असतो व पीडा परिहारार्थ  जप, दान, पूजा इत्यादी करावे असे सांगितले आहे. त्यातले त्यात गुरूच्या राशींना गुरुबळ नसताना (म्हणजे ४-८-१२ स्थानी गुरु असताना) जास्त त्रास होतो. धनु राशीचा सचिन तेंडूलकर कधीकधी धावांचा पाऊस पाडत होता तर दुसरीकडे सलग कित्येकदा भोपळा देखील फोडू शकत नव्हता हे आपण पहिले. १-३-६-१० व्या स्थानात असणारा गुरुही इतका चांगला नसला तरीही जप, दान, पूजा यापैकी एक केल्याने आपली सुटका होऊ शकते असेही वर दिलेले आहे. 
आपण आत्ता सर्वात प्रतिकूल (४-८-१२) गुरुचाच अभ्यास करू. सगळ्यात सोपे म्हणजे काय तर दान करायचे. आता ह्या दानाच्या वस्तूमध्ये नेमका घोडा येतो. आता हा घोडा आणायचा कोठून? म्हणून मग मार्ग असा काढला जातो की, घोड्याच्या शेपटीचा केस किवा कणकेचा घोडा दान करावा. आहे कि नाही गम्मत. आजकाल गुरूच्या सुवर्णाची प्रतिमासुद्धा दिवसेंदिवस लहान होत चालली आहे. दानाच्या इतर वस्तू सामान्य माणूस कसातरी जमवू शकतो.  पण खऱ्या घोड्यासाठी कणकेचा घोडा हे काही त्याला पटत नाही.
आता पूजा/शांतीचा विचार करू, शांती करायची म्हणजे साहित्य लागते , दान/दक्षिणा आले त्याचा सगळ्याचा एकंदरीत खर्च ७ ते १० हजाराच्या घरात जातो. म्हणजे गाडी परत तिथे येउन थांबते. 
पुढचा मार्ग म्हणजे जप करायचा. पण जपाचा आकडा बघा किती आहे ते. सुमारे १९०००!. शिवाय हे पुढचे पान वाचा. हे धर्मशास्त्रीय निर्णय भाग -१ ह्या दाते पंचागावरील स्पष्टीकरणातील त्यांच्याच पुस्तकातील एक पान आहे. 

कलियुगात कुठल्याही मंत्राचा जप चौपट करावा असे सांगितले आहे. म्हणजे गुरु ग्रहाचा मंत्र १९००० x ४ = ७६००० वेळा म्हणायला हवा. कारण पंचांगातील मंत्रसंख्या ज्या ग्रंथांतून घेतली त्यात हाच आकडा दिलेला आहे, त्यामुळे पंचांगातील आकडा चौपट करून जप करायला हवा असा अर्थ होते. गुरु ग्रहाचा मंत्र खालीलप्रमाणे आहे,

 हा मंत्र व्यवस्थित म्हणायला १७ ते २० सेकंद लागतात. म्हणजे ७६००० वेळा म्हणायला ७६००० गुणिले २० = १५२०००० सेकंद लागतात,  म्हणजे ४२२३ तास, अगदी दिवसाला ८ तास मंत्रजप केला तर ५२८ दिवस लागतात. पण खरोखर गुरुजी तुमच्यासाठी असे जप करीत राहिले तर बाकीचे उद्योग कधी करणार?
मी हा प्रश्न अनेक गुरुजींना सहजच विचारला, तेव्हा दोन उत्तरे मिळाली. एक म्हणजे अम्ही जवळपास २०-२५ गुरुजी एकत्र बसतो, एकजण मंत्र म्हणतो व बाकीचे श्रावण करतात, म्हणजे तो २०-२५ वेळा जप केल्यासारखा होतो. ते तत्व पूर्वी खरे होते कारण मोठ्या संख्येने धार्मिक कृत्ये केली जात. पण आज पाहिले तर एका माणसाच्या शांतीसाठी रोज आठ तास याप्रमाणे २०-२५ गुरुजींना २३ दिवस बसावे लागेल. शक्य वाटते का? मंत्राजपाचा हजारी दर २५० ते ४०० रुपये आहे. तरीही हे गुरुजींना आत्ताच्या महागाईत परवडणार नाही. 
दुसरे म्हणजे एका गुरुजींनी सांगितले कि आम्ही सरळ एक लक्ष गायत्री मंत्र करून मोकळे होतो. एकतर गायत्री मंत्र हा ब्राम्हनाला पापक्षालनासाठी आहे. म्हणजे एखाद्याच्या जपासाठी दक्षिणा घ्यायची आणि ते काम प्रत्यक्ष केले नाही हे पाप झाले म्हणून १ लक्ष गायत्री करायचा!! यावर दुसरा प्रतिवाद गुरुजी हा करतात कि सूर्य हा ग्रहांचा राजा, सुर्य आणि गायत्री यांचा महत्वाचा संबंध. म्हणून सूर्यालाच प्रसन्न केले तरी चालते. आता ह्याला काय म्हणायचे? असो. 
तर ह्या सगळ्या पळवाटा आहेत, आपला व्यवसायही चालवा आणि लोकांना कार्य/शांती केल्याचे समाधानही लाभावे असा दुहेरी हेतू ह्यांत दिसतो. पण जो माणूस बुद्धिवादी असतो तो हे सगळे पाहून गोंधळून जातो. त्याला सगळे थोतांड वाटू लागते. किवा जे शक्य नाही ते करण्यात अर्थ नाही असा त्याचा मनाचा समज तो करून घेतो.

इथे मला थोडे पुढे जाऊन महत्वाचे सांगायचे आहे, मंत्र-जप हा मार्ग श्रद्धेशी निगडीत आहे. त्यामुळे तूर्तास मंत्राची संख्या गौण समजली तर आपण स्वतःही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 
१) सरळ नेटवर जाऊन गुरु ग्रहाचा मंत्र डाऊनलोड करायचा, म्हणजे उच्चारात चूक व्हायला नको. 
२) हा मंत्र ज्या व्यक्तीला गुरु ग्रहासंबंधी अडचणी आहेत त्याच्या कोणत्याही नातेवाईकाने (जसे आई, वडील, भाऊ, बहिण) अथवा स्वतः संगीत माध्यमात चालू करून ऐकावा. जितके शक्य असेल तितक्या वेळा. मनात अमुक अमुक व्यक्तीचा त्रास कमी व्हावा हा संकल्प करावा. नाहीतरी गुरुजीही तसेच करून जप पूर्ण करीत असतात. उलट आपली श्रद्धा आणि भावना आपल्या नातेवाईकाशी जास्त उत्कट असते. 
शिवाय जे दान करायचे आहे त्यातील शक्य ते पदार्थ दान करावेत. गुरु ग्रहाच्यासाठी द्यावयाच्या वस्तू (घोडा सोडून) देऊन टाकावे. एखाद्या गरिबाला मंदिरात जाउन दान केले तर फारच उत्तम. (टीप १ वाचा)

हा उपाय मी आपणासर्वांबरोबर वाटतोय कारण याचा चांगला अनुभव अनेक लोकांना आलाय. बर्याचदा गरीब लोक अडचणीत असतात त्यांना काय उपाय सांगायचा, साधे साधे प्रश्न लोक घेऊन येतात, कित्येक लोकांचे घटस्फोट होण्याच्या मार्गावर असतात, पण कारणे कळत नसतात. उपाय करायला बर्याचदा येणाऱ्या खर्चामुळे आणि त्यामध्ये असलेल्या गोंधळामुळे लोक तयार होत नाहीत. पण थोड्या श्रमाने सगळे सुरळीत होते /होऊ शकते तसेच आत्ताच्या जीवनशैलीशी आपल्या प्राचीन शास्त्रांशी योग्य सांगड घातली तर त्यांची अप्रतिम फळे मिळतात, हे समजणे महत्वाचे आहे. 

 गुरु ग्रहाचे अशुभ स्थानातील दुष्परिणाम काय आहेत ते सांगतो,
१) विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होते, त्यांचे लक्ष न लागणे. आजारपण, मानसिक आजार तयार होणे. 
२) नोकरीत त्रास निर्माण होणे, नोकरी जाणे, व्यवसायात मंदी असणे. आळस निर्माण होणे. 
३) मुलींच्या बाबतीत विवाह न जुळणे, अपेक्षित किवा अजिबात स्थळे न येणे. 
४) विवाहीतांत वैवाहिक वाद, विसंवाद निर्माण होणे, संशय तयार होणे. 
शाळेत लक्ष लागत नाही म्हणून शाळा सोडून देणे, किवा पतीपत्नीत वाद झाले म्हणून घटस्फोट देणे/घेणे वाटते तितके सोपे नसते. ह्या तात्पुरत्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचे दूरगामी परिणाम फार भयंकर असतात. सगळ्यांची कारणे तितकीच गमतीची असतात.

आता थोडे शनीचे कारस्थान बघूया. शनि फक्त ३-६-१०-११ ह्या स्थानात शुभ असतो. तसेच १२-१-२ ह्या स्थानात असताना साडेसाती असते. २-४-५-७-८-९ ह्या स्थानात गोचरीचा शनि असताना फार शुभ फळे देत नाही. आपण आत्ता फक्त साडेसातीचा विचार करूया. 
१)साडेसातीत पूर्वी घडलेल्या घटनाचे परिणाम प्रकर्षाने दिसतात, जुनी, खुन्नस, मनातील आकस ह्यांनी प्रेरित होऊन इतर लोक साडेसाती असलेल्याला त्रास देतात. 
२)साडेसातीत माणसाचा चांगुलपणा, देव इत्यादींवरील विश्वास नाहीसा करणारी माणसे भेटतात, घटना घडतात. ३)माणूस खूप झटत असतो (व झटण्याची शक्तीही भरपूर असते जी विशेषतः गुरूच्या अशुभ वेळी अजिबात नसते) पण त्याला जे अपेक्षित असते ते होत नसते व दुसरेच काहीतरी घडत असते. ते चांगले किवा वाईटही असते, जरी चांगले असले तरी त्याला त्याची किंमत वाटत नाही. 
४)मनावर एक अज्ञात दडपण असते त्यामुळे तो निर्भीडपणे निर्णय घेत नाही. कोणावर सहजी विश्वास ठेवत नाही. कारण पूर्वी वाईट अनुभव त्याला आलेले असतात. एकूणच माणसाची सर्वच प्रकारची वाढ खुंटते. शनीला अनुकूल करण्यास म्हैस दान करावी लागते. तीही आजकाल कणकेची दान करतात !!. 

तर अशी असते साडेसाती, मानले तर भरपूर आणि देवावर श्रद्धा असेल तर काहीच वाईट होत नाही. 
शनीचा मंत्र देऊन हा लेख संपवतो. पुढे अशुभ जन्म-योग/करण/नक्षत्र ह्यांची शांती म्हणजे काय यावर आपण चर्चा करूया, अन्यथा दोन्हींचा एकत्रित विचार केला तर फारच मोठे बौद्धिक तयार होईल. त्यातही मोठ्या गमतीजमती आहेत ते पुढे आलेच!!
टीप-१: दान करताना ते सत्पात्री दान असावे असे म्हटले जाते. सत्पात्री म्हणजे चांगल्या माणसाला असा अर्थ होतो, भिकारी हा चांगला माणूस असतोच असे नाही. कारण भिकारी बनण्याआधी कदाचित त्याने अनेक पापे केलेली असू शकतात. म्हणून सत्पात्री दानाचा एक अर्थ विवेकाने वागणाऱ्या चांगल्या व्यक्तीला (ब्राम्हणाला) द्यावे असा होतो. दुसरा अर्थ ज्याला गरज आहे अशा माणसाच्या पात्रात दान करणे. ह्यात गरजू, भिकारी किवा ब्राम्हण हे सगळेच येतात. दुसरा अर्थ अधिक समर्पक वाटतो. 
टीप-२: कणकेची म्हैस किवा घोडा बनवून दान करणे ह्याला फक्त स्वतःचे समाधान इतकाच अर्थ आहे. नंतर ती कणकेची म्हैस किवा घोडा चक्क फेकून दिले जातात. त्याचा कोणालाही काहीही उपयोग होत नाही. 

Saturday, 9 January 2016

अंकशास्त्रीय लबाड्या आणि लूट

पुण्यात एक प्रथितयश अंकशास्त्री आहेत. शिवाय ते स्वतःला मानसोपचारतज्ञ, उद्धारक (मोटीव्हेटर) वगैरे मानतात. कुतुहूल म्हणून मी नेहमी त्यांचे लेख वाचतो. अंकाशास्त्रीय नियम स्वतःलाही लावून बघतो. प्रत्येक शास्त्रात काहीतरी गूढ दडलेले आहे ही माझी खुळी आशा. तर त्यांचा लेख त्यांचे नाव न देता इथे देत आहे. त्यानंतर त्यांचा व माझा संवाद झाला तोही इथे देत आहे, मग शेवटी आपण पाहूया की लबाड्या कशा केल्या जातात ते. 
.
.
छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून
© त्यांचे नाव
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९ ,
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.
19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो.

अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.
अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच भाग्यांकाला (Life Path Number) देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.
जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).
आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची एक अंकी बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:
(कंसातले अंक त्या त्या तारखेची/महिन्याची/सालाची अंकातली किम्मत).

जन्म: 19 (1) फेब्रुवारी 1630 (1)
जावळी ताब्यात घेतली: 15 (6) जानेवारी (1) 1656 (9)
रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)
अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
प्रतापगडचे युद्ध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 (1) डिसेंबर (3) 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3 फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 (6) नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 (3) मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 (1) ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 (6) फेब्रुवारी 1670
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 (6) मार्च (3) 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 (6) मार्च (3) 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून (6) 1674 (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 (6) सप्टेंबर (9) 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 (9) जून (6) 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680 (6)

विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 (9) मार्च (3) तर आई जिजाउंची जन्मतारीख 12 (3) जानेवारी (1) ही होती.
याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:
पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=19=1+9=10=1+0=1
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3

हेही वाचा:
शक्तिशाली मास्टर नंबर्स
मी: सर माफ करा पटत नाही, हे 28-2-1630 ह्या तारखेला बेरीज 10=1 व 22 येते. मूळ सिद्धंत चुकिचा ठरतो.
मी: जन्मांक (Birth Number) =1 व भाग्यांक (Life Path Number)=22, 28-2-1630 रोजीही येतात.
अंकशास्त्री: Yeu det kii mag. There are many other factors.
अंकशास्त्री: You have to study all thw basics of numerology before opposing it.
मी: Sorry. U felt it bad. I was just asking query.
अंकशास्त्री: That is not query because you did not asked it as a knowledge seeker.
 अंकशास्त्री:Doubts should be asked only at the end, not at start point. And you gave your conclusion that it is false.A true seeker will think why there is too much repeatation of the specific numbers. Without considering it you concluded.
नंतर एकमेकांना शिव्या देण्याचा मोठा कार्यक्रम झाला. ते असो. 
पण एक फसवी व्यापारी वृत्ती असते त्यात तो व्यापारी/माल-विक्या आंब्याची पेटी विकत असतो, पेटीच्या वरच्या भागात चार आंबे ठेवलेले असतात व खाली पेंढा भरलेला असतो. पण वर बसवलेले चार आंबेच जेव्हा नासके निघतात तेव्हा कोण मूर्ख यांची पेटी घ्यायला जाईल? पण आपल्याकडे लोक आयुष्याला इतके वैतागले आहेत कि ते खरेच काहीही विचार न करता अशा लोकांकडे जातात. आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. 
ह्या अंकशास्त्रींनी जी तारीख दिली ती मी एमएस एक्सेलमध्ये टाकली गणित तयार केले तर ह्याच तारखेशी जुळणाऱ्या असंख्य तारखा मला मिळाल्या. इतकेच काय १९ फेब्रु १६३० ची सर्वात जवळची तारीख २८ फ्रेब्रू १६३० ही सापडली. मग ह्या प्रत्येक तारखेला शिवाजी का जन्माला आले नाहीत? आकाशातील ग्रह स्थिती तर १९ आणि २८ ला फारशी बदलत नाही. 
आणि पुढची गम्मत बघा अंकशास्त्री जे म्हणतात ना कि तुमचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी पुढच्या तारखा ज्या दिल्यात त्या मोठ्या गमतीशीर आहेत. जावळी जिंकली 15 (6) जानेवारी (1), 1656 (9) रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9), अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3), सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664, ह्या तारखा अंक शास्त्रींना कुठून मिळाल्या हे माहित नाही. कारण शिवजन्माच्या तारखेचाच वाद बरेच दिवस चालू होता. पण वरील तारखांवर नमूद केलेल्या घटना ह्या एकाच दिवसात घडणाऱ्या घटना नाहीत. सुरतेच लुट म्हणजे शिवाजी व त्यांचे सैन्य गेले सकाळी १० वाजता व सगळी लुट करून दुपारी ४ वाजेपर्यंत परत आले असे होणे अशक्य आहे. तिथे लुट केलेल्या संपत्तीने अखंड स्वराज्य सावरले गेले. जावळी म्हणजे ट्रेकिंगचा एक डोंगर नाही कि तो एका दिवसात तुम्ही सर करताय. त्या काळात  जावळी सर करणे म्हणजे नक्कीच एका दिवसाचे काम नव्हते. 
असो तर मूळ मुद्दा हा आहे कि असे हे अंकशास्त्री अश्या प्रकारचे ज्ञान आणि गैरसमज समाजात पसरवून काय साधतात? काही नाही फक्त आपल्या पोटाची व्यवस्था करतात. जो खरा अडचणीत असतो तो बिचारा तसाच मरतो. तुम्ही जेव्हा ज्ञानाची उपासना करता तेव्हा भलेही इकडचे तिकडचे उचला. त्यात काही वाईट नाही. पण आधी ते पडताळून तरी पहा कि खरेच हे बरोबर आहे कि झूट? नाहीतर आंब्याच्या पेटीचे उदाहरण तर आहेच