प्रामुख्याने तीन प्रकारचे पंथ आपल्या महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आढळतात.
१) वाघ्या-मुरळी:
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे:
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे:
१) वाघ्या-मुरळी: हे खंडोबा देवाचे भक्त होत. पूर्वी बरेच प्रयत्न करून ज्यांना संतान सुख मिळत नाही असे लोक खंडोबाला नवस बोलत आणि नवसाच्या पूर्ततेसाठी होणारे पहिले मुल, वाघ्या किवा मुरळी हे देवाला अर्पण करीत. देवाची कृपाच म्हणा कि ह्या मार्गाने अनेकांना मुले झालेली आहेत आणि ही प्रथा टिकून आहे. ह्या वाघ्या-मुरळीने आयुष्यभर ब्रम्हचारी राहून देवाची सेवा करणे अपेक्षित होते. देवाची स्तुतीपर गाणी गाऊन, तसेच जागरण गोंधळाचे कार्यक्रम करून आपला चरितार्थ चालवले आणि देवाच्या कार्याचा इतिहास लोकगीतांच्या माध्यमातून प्रवाहित ठेवणे असे दोन उद्देश ह्यामागे आहेत.
खंडोबा जरी लगेच प्रसन्न होणारा देव असला तरी त्याचे नवस फार कडक आहेत, त्याचे प्रकार म्हणजे पायी वारी करणे (दर सोमवती अमावस्या, खंडोबाचे घट यांच्यावेळी आपल्या घरापासून पायी खंडोबाला जाणे), पाठीला लंगर (एक हुक) अडकवून देवाची प्रदक्षिणा करणे, अगीवरून चालणे, किवा वाघ्या-मुरळी सोडणे असे नवसाचे प्रकार आहेत. आत्ताच्या वैज्ञानिक युगात हे प्रकार अतिशय भयानक वाटतात पण आपल्या पूर्वजांना हे करण्याशिवाय पर्याय नव्हते हेही तितकेच खरे आहे. सर्वात जास्त सामाजिक परिणाम वाघ्या-मुरळी प्रथेचे आहेत. बळजबरीने ब्रम्हचारी व्हायला लागल्याने वाघ्याच्या जीवनातील अर्थ नष्ट झाल्यासारखा वाटतो, तर अविवाहित राहिलेली मुरळी म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असा एक समज एकेकाळी झालेला होता. त्यात दोन्ही बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. एकतर एकटी स्त्री म्हणजे आपली भोगवस्तू अशी समाजातील सबळ घटकांची प्रवृत्ती असते. तसेच स्त्रीलाही काही शारीरिक गरजा असतात हा दुसरा भाग.
त्यातील पहिला भाग जो आहे तो आपणच सामाजिक प्रबोधनाने टाळू शकतो. आधी आपण हे समजून घ्यायला हवे कि ती स्त्री एक स्वतंत्र नागरिक आहे, ती एकटी आहे आणि आपण आर्थिक, सामाजिक दृष्ट्या बलवान आहोत म्हणून तिला उपभोगुन सोडून देणे कितपत योग्य आहे.
दुसरे असे कि वाघ्याचा घरवाघ्या नावाचा प्रकार असतो, तो घरात राहून संसारी जीवन जगतो, विवाह करू शकतो पण एकदा वारीस जाणे देवाची स्तुती करणे ही कामे करणे गरजेचे असते. तसेच मुरळीला का असू नये?
मुळात वाघ्या-मुरळी ह्यांचा उद्देश देवाची स्तुती करण्यासाठी आहे हे समजून घेतले तर पुढचे प्रश्न आपोआपच सुटतात. मुरळीही घरात राहून देवाची सेवा करू शकते. स्तुती गाऊ शकते. एका पुरुषास किवा स्त्रीस आपल्या देवाचा कोप न ओढवून घेता, सामाजिक अवहेलानेच्या दरीत लोटण्यापेक्षा हा मार्ग योग्य आणि समर्पक आहे.
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे: बर्याच घरात वंशपरंपरेने माळ परडी, पोत इत्यादी चालत आलेले असते. ते टाकून कसे द्यायचे असा प्रश्न पुढे उभा राहतो. तसेच घरात माळ परडी असणे म्हणजे ते कडक नियम पाळायचे हे आलेच.
छत्रपति शिवाजी महाराज हे कुलदैवत तुळजाभवानीचे परम भक्त होते. ते स्वतः गळ्यात कवड्यांची माळ घालून हातात परडी घेऊन देवीचा
जोगवा मागत असत असे सांगितले जाते. जोगवा शब्द हा जोग-योग म्हणजेच योगी (वैराग्य) ह्या
शब्दावरून साधला आहे. वैराग्याशिवाय योग साधणे अवघड आहे. योगी जे मागतो तो
योगवा अर्थात जोगवा. ह्यामागे शिवाजींच्या व्यक्तिमत्वाची दोन वैशिष्ठ्ये
स्पष्ट होतात.
१) संसारी जीवनात राहूनही ते योगीत्वात (वैराग्य) गेले होते.
२) जोगवा अर्थात भिक्षा मागणे ह्यामागे स्वतःला गर्व न होऊ देणे हा उद्देश आहे.
१) संसारी जीवनात राहूनही ते योगीत्वात (वैराग्य) गेले होते.
२) जोगवा अर्थात भिक्षा मागणे ह्यामागे स्वतःला गर्व न होऊ देणे हा उद्देश आहे.
तर सांगायचा उद्देश हाच कि तुळजाभवानी देवीचा जोगवा मागणे म्हणजे लाजिरवाणे असे काही नाही. त्यासाठी अराधीच असायला हवे असेही काही नाही. जोगवा मागणारे सगळेच भिकारी आहेत असा दृष्टीकोन ठेवणे हेही चुकीचे आहे. माळ परडी असणारे लाखो भक्त तुळजापूरला आढळतात, ते त्यांचे संसारी जीवन व्यवस्थित जगतात. नियम पाळायचे म्हणाल तर थोडा संयम व हट्टीपणा सोडला तर सगळे सुरळीत होते.
पुढे बर्याचदा ज्यांच्या घरात माळ परडी आहे त्यांचा अंगात येते असाही समज आहे. हे थोडेफार खरे आहे असे म्हणावे लागेल. माझा असा अनुभव आहे कि माळ परडी असलेल्या घरात एक किवा अधिक संततीला मंगळ असतो, डोके तापट असते. संसारात अडचणी उत्पन्न होतात. पटत नाही. अशावेळी एक साधा उपाय करावा. आपल्याला अंगात आल्यासारखे वाटत असेल तर तुळजापूर देवीच्या मंदिरात जाऊन सरळ देवीला निवेदन करावे कि मला प्रापंचिक कारणांमुळे हे देवी तुझा हा संचार करवून घेणे सध्या शक्य नाही तेव्हा मला क्षमा कर. मी तुझी नित्यनेमाने सेवा करील. विशेष म्हणजे हे मला एका जेष्ठ पुजार्याच्या ८१ वर्षीय आईने सांगितले आणि हा खरेच परिणामकारक उपाय आहे.
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे: इथे मात्र गंभीर प्रश्न आहेत, स्त्रीची जट (म्हणजे केसांचा गुंता) झाला कि तिला जोगतीण म्हणून सोडून द्यायचे, तसेच लैंगिकदृष्ट्या असमर्थ, लघवीतून रक्त जाणे इत्यादी कारणास्तव पुरुषास सोडून द्यायचे अशी ही प्रथा आहे.नवसाचा हि प्रकार इथे असतोच. आत्ता झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या काळात वरील कारणे उपाय करून दूर करता येतात. पण आपल्या समाजात अजून दूर खेड्यात प्रगती पोचलेली नाही. गरिबीमुळे मुले सोडून देणार लोकही आहेत. तर असो.
मूळ उद्देश इथेही देवीचे भक्त बनून तिची स्तुती करणे हेच आहे. एखाद्या जोगत्याचा अनैसर्गिक लैंगिक छळ करणे हे चुकीचे आहे. आपल्या धर्माला समलिंगी संबंध मान्य नाहीत म्हणून आपण हिरहिरीने सांगतो पण आपल्याच समाजात ह्या आराधी लोकांबरोबर बीभत्स वागणारे लोक आहेत त्यावर आपण मुग गिळून गप्प बसतो हे चुकीचेच आहे. तसेच जोगतीण हिलाही देवीची सेवा करत असताना संसारी जीवन जगण्यात काहीच गैर नाही. कारण तसेही तिचा उपभोग समाज घेतो तो स्वार्थी उद्देशाने घेत असतो. तिथे जी शरीर क्रिया होणार आहे तीच संसारी जीवनात तिची नवऱ्याबरोबर होणार आहे. तसेच असा विचार करा की योगायोगाने समजा मोकळ्या समाजात फक्त एकच पुरुष तिला भेटला आणि त्याच्याबरोबरच संभोगाची क्रिया घडली तर ती वाईट का? आणि अनेकांबरोबर घडली तर चांगली? म्हणून जोगतीनीने संसारच करू नये हे म्हणणे चुकीचेच आहे.
एखादा आराधी ज्या हिडीसपणे वागत असतो त्याला समाजाने दिलेल्या अवहेलनेचे कारण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे, तोही एक माणूस आहे त्यालाही जगण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे. शारीरिक सुख हे थोडा काळ अस्तित्वात असते नंतर सामाजिक प्रतिष्ठा गरजेची असते हे मुले मोठी करताना आपल्यासारख्या संसारी स्त्री- पुरुषांना वयाच्या चाळीशीत समजते.
एखादा आराधी ज्या हिडीसपणे वागत असतो त्याला समाजाने दिलेल्या अवहेलनेचे कारण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे, तोही एक माणूस आहे त्यालाही जगण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे. शारीरिक सुख हे थोडा काळ अस्तित्वात असते नंतर सामाजिक प्रतिष्ठा गरजेची असते हे मुले मोठी करताना आपल्यासारख्या संसारी स्त्री- पुरुषांना वयाच्या चाळीशीत समजते.
शेवटी सगळे प्रश्न पोटाकडे येउन थांबतात, एकेकाळी पोट भरण्याची साधने तुटपुंजी असताना व जन्माधारित व्यवसाय असताना वरील पंथ हे पोट भरून उपजीविका करण्यास बनवले गेले असे म्हटले तर वावगे ठरू नये. नंतर काही सामाजिक विकृती त्यात घुसल्या हेही स्पष्ट दिसते. अन्यथा ह्या संस्थेचा मूळ उद्देश पवित्र आहे, गीत संगीताची उपासना करून एक लोककलेचा वारसा जपणारा हा पंथ आहे. तो एक संस्कृती म्हणून आपण जपणे त्यातील चुकीच्या आणि विकृत प्रथा छाटून टाकून हा वृक्ष जोपासणे नक्कीच आनंददाई आहे.
No comments:
Post a Comment