Saturday, 27 May 2017

शेलीब्रीटी व सामान्य लोक्स

नक्षत्र हा ज्योतिष्यातील फार महत्वाचा भाग आहे. बरेचदा ज्योतिष्य पाहताना बहुतेक सर्व ज्योतिषी डायरेक्ट जन्मकुंडलीवर उडी मारतात. साडेसाती, ग्रहदशा उच्च नीच, वक्री, मार्गी अमुक-तमुक बघून फलादेश करतात. कितीही भारी भारी सांगितले तरी सामान्य माणूस हा अचानक असामान्य किवा सेलेब्रिटी होत नाही. त्यामुळे साधी जन्मकुंडली पाहून सर्व ठीक आहे इथपर्यंत भविष्य सांगणे ठीक आहे पण त्यापुढील उत्कर्ष कसा होतो हे सांगणे अवघड आहे. कोण व कधी "खास माणूस" कसा बनतो हे जाणून घेणे मनोरंजक आहे. त्यासाठी हा लेख लिहिला आहे. 

जसे ग्रह उच्च, नीच, स्वगृह असतात तसेच ते काही ठराविक नक्षत्रात असतात. त्या नक्षत्रांचा प्रभाव ग्रहांवर होत असतो. तो कसा होतो हे दाखविण्यासाठी काही केस स्टडीज खाली दिलेले आहेत. 
विशेष म्हणजे जे ग्रह उच्च किवा स्वगृह असतात व नवमांश कुंडलीतही उच्च किवा स्वगृही असतात ते ग्रह विशेष फलदायी असतात असे दिसते.
विविध क्षेत्रातील खास व्यक्ती यासाठी निवडल्या आहेत. तर बघा कशी गम्मत असते ते.

सुरुवात आपण आपले लाडके केजरीवाल यांच्यापासून करू, 
 

केजरीवाल साहेबांची जन्मकुंडली पहा, स्वगृह रवी म्हणजे चांगली सरकारी नोकरी, लग्नी उच्च चंद्र म्हणजे बोलण्यात हुशार, आदर्शवादी व कल्पक माणूस. याशिवाय जे ग्रह आहेत ते नीचीचे म्हणजे विपरीत फळेच देणारे असे आहेत. 
पण नवमांश कुंडलीत बुध व रवी हे उच्च ग्रह आहेत. मंगळ स्वगृह दशमात आहे. 
  बुध अंतर्दशेत २०११ ला राजकारणात प्रवेश, मग रवी अंतर्दशेत २०१५ ला मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे.


मुकेश साहेबांच्या जन्मकुंडलीत सप्तमस्थानात उच्च सूर्य ह्याशिवाय दुसरे काही नाही. या सूर्याचे फलित हेच कि व्यावसायिक सुरुवात ही मोठ्या चर्चेने झाली. त्याव्यतिरिक्त शनी गुरु राहू केतू सारखे कर्ते ग्रह निव्वळ निष्प्रभ आहेत.हाड-हूड करून कोणी ज्योतिषी ह्यांना हाकलून देईल इतके.

मग असे काय पत्रिकेत आहे कि साहेब जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत? त्यासाठी त्यांची नक्षत्राधारित नवमांश कुंडली पाहणे गरजेचे आहे. 
राहू-केतू हे त्यांच्या उच्चीच्या नक्षत्रात पडले आहेत. त्यात केतू शत्रूस्थानी व राहू व्ययात. खर्चावर नियंत्रण हा काटकसरीचा गुण त्यांच्यात आहे. षष्ठ स्थानात स्वगृह गुरु आहे तसेच शनी सप्तमात स्वगृह हे इतके ग्रह असामान्य व्यक्ती बनण्यास पुरेसे आहेत. 



कयामत से कयामत हा चित्रपट काय आला आणि अमीर खान सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला. तसे पहिले तर अमीर खान म्हणजे अशी काही बच्चन सारखे व्यक्तिमत्व नाही. सामान्य उंची फारतर गोरा नाजूक चेहरा इतकेच.
जन्मकुंडलीत शनी अस्तात आहे. राहू-केतू उच्च आहेत म्हणून आई-वडील यांच्या कृपेने लहानपणीच चित्रपटात काम मिळाले. तशी बाकी खासियत अशी काही नाही. 

पण आता नवमांश कुंडली बघूया, शनी स्वगृही होता आणि नवमांशातसुद्धा स्वगृही आहे. हे विलक्षण महत्वाचे आहे. गुरु दशमात म्हणजे कर्मस्थानात स्वगृह झालाय. त्यामुळे सामाजिक विषयात आदर्श निर्माण करणे, सामाजिक संदेश देणे असे मोठे कर्म स्वतःला चिकटवून घेणे हा एक पैलू अमीर खानला जोडला गेला. त्यात भाग्यस्थानात स्वराशीचा मंगळ भाग्योदय करणारा ठरला. ह्या मंगळाने त्याला पुरुषी देखणेपणा दिला. ५२ वर्षात माणूस जख्खड म्हातारा दिसतो पण अमीर अजूनही तरुण भूमिकेत चित्रपट हिट करतो. हे विशेष. 


अल्बर्ट आईनस्टाईन हे अजब-गजब बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व!!  जन्मपत्रिकेत शनी अस्तात आहे. चंद्र नीच राशीला. मंगळ अष्टम स्थानात म्हणजे कधी कोणात न मिसळणारा व अशक्त प्रकृती असलेला हा माणूस. बुध हा महत्वाचा ग्रह साहेबांच्या नीच राशीला म्हणजे बुद्धिवादी असणे निव्वळ अशक्य. 

आता साहेबांची नवमांश कुंडली पहा. उच्च शनीने भाग्यस्थान उजळले. बुध उच्च ग्रहाच्या बरोबर आल्याने सगळे आयाम बदलले. दशमात गुरु, लग्नी शुक्र. पण खरा भाग्योदय शनीनेच केला.
केतू दशेत ज्यू असल्याने जर्मन जाचाला सामोरेजावे लागले व १८९६ ला त्यांनी जर्मनी सोडले.
१९०९ साली शुक्र-शनी दशा असताना सापेक्षता वादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. सूर्य दशेत व शनी अंतर्दशेत (१९१९ ते १९२१) त्यांच्या सिद्धांताला जागतिक कीर्ती मिळाली.




ओसामा बिन लादेन, गर्भ श्रीमंत असलेला एखादा माणूस, काही विशेष ध्येय घेऊन डोंगर दऱ्यात लपून जीवन जगताना पहिला तर अजबच म्हणावे लागेल ना!! जन्मपत्रिकेत फक्त शुक्र ग्रह काय तो सप्तमात स्वगृह स्थानी. त्यामुळे बाबाने स्त्रीसुख भरपूर घेतले.  सूर्य उच्च पण २९ अंशावर वृद्ध झालेला. बाकीचे सगळे ग्रह अगदी सामान्य. 

आणि आता नवमांश कुंडली बघा..तब्बल ६ ग्रह उच्च राशीला!! 
याची उंची ६ फुट ५ इंच, याला पाच बायका होत्या (सप्तमात चंद्र उच्चीचा) . तर २० ते २६ अपत्ये होती (पंचमात उच्चीचा शुक्र). 





बुध-बुध दशेत याने अल-कायदाची स्थापना केली. बुध-मंगळ दशेत लादेन भूमिगत झाला. मंगळ हा उच्च राशीला आहे त्यात तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानात आहे. लढाऊ वृत्ती म्हणजे काय याचा प्रत्यय इथे येतो. अमेरिकेसारख्या महासत्तेशी लढा देत याने १७ वर्षे काढली. केतू दशेत आरोप वाढत गेले आणि केतूत बुध दशा असताना ओसामा मारला गेला.

योगी आदित्यनाथ हे नाव माहित होते ते कट्टरवादी विचारांमुळे. लोकसभा खासदार असणे हेही विशेष वाटले नव्हते. पण देशातील सर्वात मोठी व विविध धर्माची लोकसंख्या असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर योगी हे काहीतरी  खास व्यक्तिमत्व आहे हे लक्षात आले.
यांच्या जन्मपत्रिकेत अष्टमात (पिडास्थानात) स्वगृह गुरुशिवाय काहीही खास नाही. पण नवमांश पत्रिकेत गुरु उच्च राशीला परावर्तीत होतो. मंगळ स्वगृह राशीला जातो. आणि चित्र पालटून जाते. यात उच्च राशीला असलेला गुरु हा विलक्षण फळे देणारा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 
२४/३/९८ ते ३/५/९९ मध्ये मंगळ अंतर्दशेत ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले.
बुध महादशेत गुरु अंतर्दशा (गुरु नवमांशात उच्च असल्याने) ४/८/१६ ते १०/१/१९ हा काळ  योगींसाठी खास ठरला आहे हे आपण जाणतोच.


हे झाले सेलेब्रिटी लोकांचे. आता आपण काही सामान्य जातकांच्या पत्रिका पुढच्या लेखात बघूया.





Thursday, 20 April 2017

मंदीचे ग्रहमान - तेजी कधी?

आला दिवस जात असतो, पण मनातील उद्दिष्ट साध्य होईल अशी परिस्थिती दिसत नसते. एक रटाळपणा आलेला जाणवतो. हा रटाळपणा जसा मार्केटमध्ये मंदीच्या स्वरुपात जाणवतो तसाच प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत असा रटाळपणा व मरगळ आलेली असते. ही कशामुळे आलेली असते ते आपण या लेखात पाहू, 
 
त्याआधी वर्षफल नावाचा एक ज्योतिष्य प्रकार आहे त्याबद्दल थोडे बोलू. वर्षफल म्हणजे एखादे वर्ष ज्यावेळी सुरु होते त्यावेळी जे ग्रहमान असते त्याप्रमाणे दिलेला फलादेश. हे वर्षफल मोठ्या गमतीशीर वाक्यांनी भरलेले असते जसे "खरीपाचा स्वामी हा बुध असल्याने पर्जन्यमान मध्यम राहील", "रसांचा अधिपती मंगल असल्याने गुळ, तूप, मध कमी मिळेल", "यावर्षी हेममाली नावाचा नाग आहे म्हणून पाऊस भरपूर पडेल" (ही काय ती हेमामालिनी नाही, हा नाग आहे तो कुठे असतो ते मला विचारू नका) काय वाट्टेल ते  लिहिलेले असते त्यामुळे त्याचा अर्थ काय आणि कुणासाठी उपयोगी हे कळत नाही.  बऱ्याचदा वर्षफल हे फसलेले सिद्ध होते. 
वर्षफल सर्व भविष्यवेत्त्यांनी एकाच निकषावर सांगावे असा काही नियम नसल्याने प्रत्येकजण आपापले हेमामालीनी? नाग?? प्रकारचे वर्षफल छापून मोकळा होतो. हे छापणारे लोक  यांच्याकडे जे साहित्य वंशपरंपरेने आलेले होते तेच आजही वापरत आहेत.या साहित्यात किती घालघुसड केली गेली असेल किवा वर्षानुवर्षे एकाकडून दुसर्याकडे हस्तांतरित होत असताना काय काय  बदल झालेत यात न शिरता आपण आत्ताचे वर्षफल कसे काय असू शकते हे जाणून घेऊ. 

हे वर्षफल म्हणजेच; माझा सध्याचा काळ व येणारा पुढील १ वर्षातील येणारा काळ कसा आहे हे आपण आपल्या सोप्या पद्धतीने जाणून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत. 
त्यासाठी ९ ग्रह व १२ राशी अशी सोपी मांडणी आहे. सध्या कुठले ग्रह कुठे (कुठल्या राशीत) आहेत यावरून आपण हा अभ्यास करणार आहोत. 
शनी: शनी हा ग्रह सध्या धनु राशीला आहे, धनु हि गुरूची मूळत्रिकोण राशी आहे. शनी व गुरु हे सम ग्रह आहेत. शनी व गुरु सम ग्रह असल्याने त्यांचा न्याय व सत्याशी जवळचा संबंध आहे. उदा. आपल्याकडे नोटबंदी केली गेली. यात चोर सापडलेच जातील हा गुरूचा विचार होता, पण शनी गुरु गृही असल्याने बरेच काळे पैसेवाले सुटले. कारण ते रंगेहाथ पकडले गेले नाहीत. हीच जर शनीच्या स्वगृहात शनी असताना नोटबंदी झाली असती तर बरेच चोर रंगेहाथ मोठमोठे व्यवहार करताना सापडले असते. असो,शनी६ महिने मंगळाच्या वृश्चिक राशीला जाऊन सप्टेंबर २०१७ ला परत गुरूच्या धनु राशीला येतो. तोवर हीच स्थिती राहणार. नन्तर मग पुढे २० जाने २०२० ला शनी स्वराशीला म्हणजेच मकर राशीला येतो. तो काळ एकदम झकास असणार. न्यायदान, खटले, मोठ्या कालावधीची नोकरी यासंबंधी तेव्हा तो शुभफळे देणार हे नक्की. आत्ता अजिबात अपेक्षा करू नका.
गुरु: गुरु सध्या बुधाच्या राशीला आहे, बुध-गुरु मित्र नाहीत. बुध जरी गुरूशी सम ग्रह असला तरी गुरु बुधाशी सम अथवा मैत्र नाही. ह्या काळात प्रत्येक व्यवहार खूप चिकित्सा करून, त्यावर वादविवाद करून केला जाणार. त्यात वेळ खर्च होणार. गुरु पुढे शुक्राच्या तुला राशीला जाणार तेव्हा तर गुरूला महत्व फार कमी राहणार, आत्ता मुहूर्त आहे म्हणून लोक लग्न उरकून घेणार, उंची वस्त्रे, विवाहातील खर्च, सर्वसामान्य डामडौल यासाठी लोक आपल्या कुवतीपेक्षा पैसे खर्च करणार.
राहू: राहू सध्या सिंह ह्या त्याचा अतोनात दुश्मन असलेल्या रवीच्या राशीला आहे. पुढे सरकून तो सप्टेंबर मध्यास मकर राशीला येतो. विशेष म्हणजे मकर हि राहूची मूळ त्रिकोण राशी आहे.राहू हा जे जे गूढ आणि लपवलेले गेले आहे त्याचा कारक आहे,त्यामुळे भ्रष्टाचाराची मोठमोठाली प्रकारणे उजेडात येऊन निकाली निघतील.टेबलाखालून पैसे घेणारेजागोजागी सापडतील.भ्रष्टाचार लपवून चाललेले उद्योग संकटात येतील.
तर हे आहे माझे वर्षफल.  
बाकी राहिलेले, रवी शुक्र, मंगल, बुध हे ग्रह १-१ महिना राशीत असतात ते वर्षफल फारसे प्रभावित करीत नाहीत. फक्त शुक्र आत्ता बरेच काळ वक्री चालला आहे व तोही मीन ह्या उच्च राशीला.त्यामुळे काही महत्वाचे खर्च करावेच लागतील, ते वाया जाणार नाहीत.  
























Saturday, 11 February 2017

तुमची कुंडली आणि कुलदैवत

एखाद्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास गंभीर असलेल्या जातकांसाठी प्रश्नकुंडली हे अचाट तंत्र आहे. एखाद्या विशिष्ट समस्येने पीडित असलेल्या व्यक्तीची इत्यंभूत माहिती प्रश्नकुंडलीतून मिळते. बऱ्याचदा व्यक्तीच्या समस्यांचे कारण हे त्यांच्या कुलदैवतासंबंधी असलेल्या अनास्था व अज्ञान ह्यात  दडलेले असते. यापूर्वीच्या लेखात आपण कुलदैवत उपासना कशी करावी, कुलधर्म-कुलाचार म्हणजे नक्की काय याविषयी जाणून घेतले.  ती  लिंक खाली देत आहे. 

कुलधर्म-कुलाचार

http://avinashpataskar.blogspot.in/2016/04/blog-post_30.html

आधी कुलदैवत म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजावून घेऊ. त्यासाठी साधारणतः १०० ते ५०० वर्षांपूर्वीचे  लोकजीवन कसे असेल याचा पुसटसा अंदाज घ्यावा लागतो. त्यावेळी मेडिकल सायन्स हे नव्हतेच. नवस करून मुले  होतात तर नवऱ्याची गरज काय असे आपले एक संतश्रेष्ठ म्हणून गेलेत, पण नवरा असूनही मुले होत नाहीत तेव्हा शेवटी लोक नवस करतात हेही मनोरंजक सत्य आहे.
 
तर सांगायचा मुद्दा हाच कि तत्कालीन लोकजीवनात कुलदैवत उपासना मेडिकल सायन्स इतकीच किंबहुना अधिक सर्वव्यापी होती. प्रत्येक कुलदैवत क्षेत्राबद्दल असंख्य कथा प्रसिद्ध आहेत,  तसेच कुलदैवताची निस्सीम भक्ती करणारे लोक हे त्या त्या गावात पंचक्रोशीत आजही ह्या कथांच्या रूपाने जिवंत आहेत. त्याकाळात लोकांना आपल्यापेक्षा अधिक समस्यांना तोंड द्यावे लागायचे असे म्हटले तर बऱ्याच वाचकांना ते पटणार नाही, पण अगदी वरवर नजर टाकली तरी तत्कालीन समस्यांची एक मोठी यादीच तयार होते,
१) सत्ताबदल,
२) परकीय आक्रमण,
३) दुष्काळ, दुषित अन्न व पिण्याचे पाणी,
४) साथीचे आजार, अनुवांशिक आजार,
५) विवाह, संतती न होणे, जातीजातीतील द्वेष,
६) चोऱ्या, दरोडे, लुट. 
७) कर्जबाजारीपणा, व्यवसाय नष्ट होते. पिढीजात व्यवसाय नष्ट होते ई. 
८) संपर्क व प्रवासाची अपुरी साधने.
अशा अनेक अडचणीतून आपले पूर्वज त्यावेळी जीवन जगत होते म्हणून आपण ह्या भूतलावर आज आहोत.
कुलदैवत ह्या सर्व समस्यांवर सर्वात स्वस्त व हमखास गुण येणारा उपाय होता. तसेच कुलदैवत उपासना करण्यास उच्च-नीच जातधर्म यांचे बंधन नव्हते.आजही कित्येक इतरधर्मीय लोक परंपरेने हिंदू कुलदैवत असलेल्या मंदिरात उपासना करताना दिसतात. 
 
कुलदैवत उपासना हि अतिशय सोपी उपासना आहे. हेही आधीच्या लेखात मी स्पष्ट केले आहे. कुलदैवत उपासनेसाठी अवघड मंत्र म्हणावे लागत नाहीत. मन हे अतिशय चंचल असते तेही एकाग्र ( हे कसे करतात हे मलाही माहित नाही) करावे लागते असे नाही. मनात भाव असला कि सगळे सोपे होऊन जाते. साधा नैवेद्य दाखवण्याचा विधी आपण करतो पण तोच मनातील भाव व्यक्त करून केला तर फरक पडतो. त्यासाठी खालील लेख वाचा.
 
आत्ता आपण एका मोठ्या बदलातून जात आहोत. वर यादीत नमूद केलेल्या अनेक समस्या आता कालबाह्य झाल्यात, पण समस्या संपल्या नाहीत. त्या दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने तोंड वर काढून आपल्यासमोर उभ्या आहेतच. आपण सुखी झालो आहोत असे वाटत असले तरी आपले पूर्वज आपल्यापेक्षा सुखी होते हे नीट विचार केल्यावर लक्षात येते. त्यावर मी वेगळे लिहिणार आहेच. 
 ह्या अशा अनेक समस्या, त्रास, पीडा आधी लाभ मग नुकसान, सुख-दुःख हे चक्र अव्याहतपणे चालूच असते. ज्यावेळी एखादा जातक असा पीडाप्रश्न घेऊन येतो तेव्हा प्रश्नकुंडली मांडून त्याचे नक्की काय चालले आहे हे कळते.  कधीकधी जातक हे कट्टर नास्तिक असतात, पण  त्यांच्याच आधीच्या २-३ पिढ्यातील लोक हे निस्सीम भक्त वगैरे प्रकारचे असतात व त्या पिढीने मोठी ऐहिक प्रगती साधून घेतलेली असते, कधीकधी जातक हे फक्त बुद्धिवादी व ग्रहांचा माणसावर काहीतरी परिणाम होतो इतकेच मानणारे म्हणून फक्त ग्रहांचे बोला देवाचे सांगू नका अशी मागणी करणारे असतात. 
तिसरे लोक हे विसराळू असतात, ते कुलदैवताचे बोललेले नवस, वार्षिक विधी विसरलेले असतात. 
 
चौथे लोक हे लबाड असतात, त्यातही दोनतीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारचे लोक हे देवाचीच परीक्षा घ्यायचा उद्योग करतात ते सांगतात "मी नवस बोललो पण फळ मिळालेच नाही" खरेतर हे वेगळ्या कार्यासाठी नवस बोललेले असतात ते पूर्णही होऊन जाते पण नवस अर्धवट राहिल्याने दुसरीच समस्या निर्माण झालेली असते . त्यातले दुसऱ्या प्रकारचे लोक हे चारपाच देवांना एकदम साकडे घालतात कारण त्यांचा एकावर विश्वास नसतो. तिसरे लबाड लोक असे असतात कि ते उधारी चुकवणारे लोक जसे वागतात तसे देवाशी वागतात. काम तर झालेले असते पण देवाचे कार्य करायला हातातून पैसा सुटत नाही. 
पण हे जे जे काही उद्योग लोक करत असतात ते प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून बाहेर पडते. 
बरेच लोक असे सांगतात, कि आमच्याकडे आम्ही कुलदैवताचे काहीच पुजत नाही. तरीही आम्हाला कुलदैवत का त्रास देते? याची वेगवेगळी कारणे आहेत .
पहिले कारण म्हणजे हि जी पिढी असा प्रतिवाद करते ती बरेचदा आधीच्या पिढ्यांनी कुलदैवत उपासना करून सधनता प्राप्त करून घेतलेली आहे ती उपभोगत असते वर म्हणत असते कि आम्ही काहीच करत नाही तरीही त्रास का? 
दुसरे असेही लोक आहेत कि ज्यांचे जन्म नवससायास करून झालेले असतात पण ते काहीच मानत नसतात. 
तिसरे लोक हे दुटप्पी असतात, ते एकीकडे आम्ही देव मानत नाही असेही म्हणतात व दुसरीकडे पेचप्रसंग आला कि नाही-नाही ते उपाय करतात. 

बरेचदा असेही होते कि कुलदैवत संबंधित अतिशय साध्या-सध्या चुका किवा अनास्था लोक करीत असतात. घरात नवीन जन्म होणे किवा एखादी व्यक्ती मृत झाल्यावर जे कुलधर्म कुलाचार करायला हवेत त्याबद्दल लोक निरुत्साही असतात व समस्यांची मालिका सुरु होते.  तसेच नवस अर्धवट राहिले कि केलेली उपासना निष्फळ ठरू लागते.
स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात देवांना अजिबात शिवू नये त्यामुळे कोप होतो अशा गैरसमजामुळे बरेच लोक कुलदैवत उपासना करायचे टाळतात.   बायकोच नसेल तर काय करायचे कुलदैवत ही भीती बाकी काय !!
चुकून शिवले गेले तर काही आकाश कोसळत नाही. मुद्दाम परीक्षा बघायच्या हेतूने शिवले तर बहुतेक कुलदैवते कडक आहेत. दुष्परिणाम होतातच.
खालील लेख वाचा,

 विटाळ, सोयर, सुतक ह्यांचे गौडबंगाल 
 

प्रश्नकुंडलीनुसार पत्रिकेतील अष्टमस्थान हे पिडास्थान आहे, त्या स्थानात असलेले ग्रह हे संबंधित व्यक्तीला असलेल्या पिडा दर्शवितात. ह्या पिडा बरेचदा व्यक्तीच्या स्वतःच्या चुकांमुळे किवा आई, भाऊ, वडील चुलते ह्यांनी केलेल्या चुकांमुळे उद्भवतात. ते प्रश्नकुंडलीत स्पष्ट दिसते. अशावेळी त्या व्यक्तीचे आकाशस्थ ग्रहमान अतिशय चांगले असते पण बिचारा यशस्वी होत नसतो. कारण वेगळेच असते. ते बऱ्याचदा कुलदैवताशी संबंधित असते. कसे ते पुढील लेखात पाहू.









 

Sunday, 22 January 2017

बलात्कार आणि अनुवंशिकता

बलात्कार विनयभंग व स्त्रियांची प्रतारणा हा विषय ऐरणीवरचा आहे, पण इथे मला काहीतरी वेगळे सांगायचे आहे. 
अनेक नेते, तज्ञ यांनी मजेशीर निष्कर्ष काढलेत पण सुसंगत आणि मनाला पटणारे काहीच हाती लागत नाही. 

- मुली तोडके कपडे घालतात म्हणून अशा दुर्घटना होतात. 
- मुली रात्री अपरात्री फिरतात, पार्ट्या करतात म्हणून!!

कायच्या काय तर्कट लावले जातात. अशी विधाने करणारे लोक इतका झापडबंद विचार करतात कि त्यांना आपला देश, संस्कृती, इतिहास, भूगोल काहीच माहित नाही कि काय अशी शंका येते. ह्या महाभागांच्या डोळ्यावर झापड कोण लावते ते आपण इतरत्र बघू. 
आपल्या समाजातील मोठा भाग हा कित्येक वर्षे शेतात माळरानात निवारा करून राहत होता. त्यामुळे ७ च्या आत घरातला काहीच अर्थ नाही हेही मठात राहणारे गुरुजी विसरतात. असो तर आपण ह्या सगळ्या प्रकरणाचा वेगळ्या अंगाने विचार करू. 

१) आनुवंशिक जडणघडणीत घडलेले स्त्री-पुरुष: प्राणी किंवा मानव वंश पुढे चालू राहण्यात पुरुषाचा (नराचा) वाटा क्षणिक आहे. स्त्रीला मात्र फार संयमाने मुलांना जन्म द्यावा लागतो व एका ठराविक वयापर्यंत मोठे करावे लागते. त्यामुळेच नर हा आधीपासून आक्रमक राहिला आहे व स्त्री ही आक्रमक बनायचे टाळते. त्यातही माणूस व इतर प्राण्यात एक भेद आहे. तो महत्वाचा आहे. मानव बुद्धिवान असल्याने त्याने टोळ्या सर्वात प्रथम बनवल्या. फार कमी प्राण्यात टोळ्या आढळून येतात. मानवाशी बुद्धिमत्तेने अधिक जवळचा प्राणी म्हणजे माकड हा काही प्रमाणात टोळ्या बनवतो. इतर प्राणी त्यात विशेषतः नर हे एकटेच राहतात. 
ह्या टोळ्यांचा आनुवंशिक जडघडणीवर बराच प्रभाव पडतो. एकटे फिरणारे नर एखाद्या संघर्षात कामी येतात आणि दुसरा नर राजा बनतो. पण टोळीजीवनात असे होत नाही. एक टोळी हि अनेक नरांची बनलेली असल्यामुळे एक नर मेला तरी टोळी संपत नाही. 
ह्या सगळ्या प्रकरणामुळे स्त्री (मादी) समोरील अस्थिरता आणि धोका यात दोन परिस्थितीत तफावत निर्माण होते. एकच नर असेल तर मादी त्याचा अनुनय करून आपली पिल्ले मोठी करू शकते. तिला घाबरायचे काही कारण नसते. पण टोळीजीवनात जी टोळी अधिक बलवान तिचा दबाव कायम राहतो. अशा टोळीच्या शक्तीचे विस्फोट होत राहतात तसेच शक्ती कमी अधिक होत राहते व त्यामुळे स्त्री (मादी) कायम अस्थिर व दबावाच्या स्तिथीत राहते. नंतर मग ती तिची सवयच बनून जाते. एखादी टोळी अधिक बलवान होण्याची काही भौगोलिक कारणे आहेत. नदीच्या जवळच्या प्रदेशात सुपीक जागी टोळ्या ह्या निरंतर मूळ धरून जिवंत राहतात. भले त्यांची शक्ती कमी-अधिक होत राहते. 
पुरुष (नर) हा आपले प्रजननाचे कार्य संपले कि स्वतःचा घात करून घ्यायला मागेपुढे पाहत नाही. कित्येक शेतकरी आत्महत्या करतात. लोक व्यसने करतात व स्वतःचा अंत करून घेतात पण अशा स्थितीत स्त्री मात्र असे आततायी पाऊल उचलताना दिसत नाही. ह्याला स्त्रीचा उत्क्रांतीतील रोल कारणीभूत आहे.

जितके अस्थिर समाजिक व राजकीय जीवन तितक्या स्त्रिया जास्त सोशिक!! आपला सामाजिक व राजकीय इतिहास बघितला तर एक सुपीक व उत्तम हवामान असलेला प्रदेश असल्याने इथे लोक पूर्वीपासून येत गेले हे सत्य आहे.  वेगवेगळी आक्रमणे हि टोळीयुद्धाचाच भाग होता. टोळी एका विशिष्ट गरजेपायी ( अन्न, स्त्रिया, सुपीक जमीन) ह्यासाठी आक्रमण करीत होत्या. ज्याला आपण या देशाचा इतिहास म्हणतो तो म्हणजे टोळीयुद्धेच होती. युरोप अमेरिकेत माणूस फार उशिरा पोचला. तिथे अशी राजकीय आणि सामाजिक उलथापालथ होत नव्हती. सगळे कसे संथ-संथ चालले होते. ह्या कारणास्तव आपल्याकडे विशेषतः स्त्रिया ह्या वयक्तिक स्वातंत्र्य इत्यादी संकल्पनेपासून दूरच राहिल्या तर तिकडे स्त्रिया स्वातंत्र्य इत्यादींबद्दल अधिक सजग उत्क्रांत झाल्या. 
तर थोडक्यात काय कि आपल्या उपखंडातील स्त्रिया ह्या सोशिक व सहनशील आहेत आणि उत्क्रांतीनेच त्यांना असे बनवले. हेच मुळात सगळ्यात महत्वाचे कारण सगळे अत्याचार सहन करण्यात आहे. 
पण आता पूर्वीसारखी मध्ययुगीन स्थिती नाही. मग तरीही स्त्रियांची मानसिकता का बदलत नाही? वरवर दिसायला जरी सगळे गार-गार समता, स्वातंत्र्य सामान संधी, सुरक्षितता असे दिसत असले तरी ते समाजाच्या सर्व थरात पोचेल आहे का? स्त्रीच्या  मनातील भीती घालवण्यात आपण यशस्वी झालो का? तर उत्तर नाही हेच आहे. 
समजा दोन शेजाऱ्याच्यात (पुरुष) हाडवैर आहे, त्याची "क्ष" काही कारणे आहेत. तरीही त्यांच्या घरातील स्त्रिया एकमेकींशी गोडीने राहायचा प्रयत्न करतात. कारण संघर्ष टाळणे स्त्रीला मिळालेली आनुवंशिक देण आहे. 
तसेच बरेचदा घरातील आईवडील मुलींना सल्ला देताना सबुरीचा देत असतात. शाळा कॉलेजात एखादा मुलगा मुलीच्या मागे लागला असेल किंवा त्रास देत असेल तर मुलीला आपण दुर्लक्ष करायला सांगतो. आपण आपल्या असंख्य व्यापात अडकलेले असतो. ह्या व्यापांमुळे आपली आक्रमकता संपलेली असते. त्यामुळे त्या मुलाला समज देण्याच्या प्रयत्नात आणखी एक व्याप वाढवून ठेवायची आपली तयारी नसते. अशा वृत्तीचा आपल्या मुलीच्या मनावर दूरगामी परिणाम होत असतो. 
अर्थात इथे शाळा-कॉलेजात मुला-मुलींनी एकमेकांशी अजिबात बोलू नये किंवा कसलाच  संपर्क ठेऊ नये अशा कट्टर विचारांचा सल्ला मी कधीच देणार नाही. 
मुला-मुलींचे मनमोकळे बोलणे व विचारांची देवाण-घेवाण व्हायलाच हवी. मुलीलाही मुलाचे चांगले गुण समजून घेण्याचा हक्क आहेच. पण त्यात थिल्लरपणा, कुत्सित चेष्टा करणारी मुले आणि मुलीही असतातच. त्यांना मात्र नो-एंट्री असली पाहिजे. 
सध्या आपण मोठ्या सामाजिक व राजकीय बदलातून जात आहोत. ज्या ऐतिहासिक काळात आपण उत्क्रांत झालो त्याच्या खुणा अजूनही आपल्यात घट्ट रुजलेल्या आहेत. काही पुरुष अजूनही टोळीजीवनातील माकडे बनून वागत आहेत आणि स्त्रिया संयमी बनून सहन करीत आहेत. 

जे राजकीय नेते, धर्मपंडित "मुली तोडके कपडे घालतात म्हणून अशा दुर्घटना होतात"
"रात्री अपरात्री फिरतात, पार्ट्या करतात म्हणून....."

असे प्रतिवाद करतात तेच ह्या राजकीय किंवा धार्मिक टोळ्या चालवत असतात. कुठला तरी नेता-साहेब ह्यांचा वरद हस्त आपल्या डोक्यावर आहे असे उगाचच वाटून अशा घटना करणारे करतात. न्यायव्यवस्था पुरावा मागते तो नेमका शोधून न्यायालयात जायला अनेक अडसर आहेत. एकतर पुरावा म्हणजे पंचनामा, जबाब यापलीकडे काही असते हेही आपल्याला माहित नाही व कधीकधी आपली व्यवस्था मुद्दाम माहित करून घेत नाही कारण मग तोडपाणी होत नाही.
शेवटी काय टोळीजीवन अजून संपलेले नाही!!


पुढे सांगायचे राहिलेच कि न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी स्त्री असो कि पुरुष अंगभूत आक्रमकता निर्माण होण्यास काही ग्रह कारणीभूत असतात, ते सर्वांच्या अंगी येवोत आणि थिजलेले टोळीजीवनातील संस्कार गळून पडोत.























 

Saturday, 7 January 2017

फलज्योतिष्य: गणिताचा फॉर्म्युला नं. १

नमनाला घडाभर तेल घालवण्यापेक्षा सरळ विषयालाच हात घालतो.
घटना घडण्याची कारणे: यासाठी अनेक पत्रिका पाहाव्या लागतात व त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. आपली स्वतःची जन्म तारीख वेळ पक्की माहित असेल तर हे स्वतःबद्दल करणे अधिक अचूक सिद्ध होते. मी पत्रिकांचा असा अभ्यास आधी वीर सावरकर व नरेंद्र मोदी ह्यांचा  करायचा प्रयत्न केला पण सगळे उलटसुलट चित्र दिसायला लागले. वीर सावरकर ह्यांची जन्मतारीख बरोबर आहे असे वाटते पण वेळ नक्कीच चुकीची आहे असे मला ठाम वाटते त्यामुळे सगळा कालनिर्णय (भूततकाळातील भविष्यकथन) चुकीचे ठरते. मोदींच्या तर दोन-दोन जन्मतारखा मिळतात त्यामुळे तोही नाद सोडून मी दिला. वीर सावरकरांची पत्रिका खाली दिलेली आहे. एका विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे म्हणून पत्रिकेची निवड केलेली नाही तर व्यक्तीच्या जीवनातील झंझावाती घटना असलेली व्यक्ती अभ्यासायला घेतली. मी विशिष्ट जात धर्म तसले उद्योग करीत नाही. माणूस बघतो त्याची पत्रिका बघतो. असो. 
पहिला  गणितीय नियम असा कि एखाद्या व्यक्तीचे जीवनमान हे ग्रहांच्या दशा, अंतर्दशा  यावर अवलंबुन असते. एखाद्याचे जीवनमान (उदा. शेतकरी) खडतर असेल तर ते साधारणतः ७ ते २० वर्ष इतक्या मोठ्या काळासाठी खडतरच राहते. एखादी अंतर्दशेची झुळूक मध्ये येऊन जाते तेव्हा पाऊस चांगला होतो. घरात चांगले कार्य होते इत्यादी इत्यादी.  दशा बदलली कि मोठे धारण होते पाण्याचा प्रश्न सुटून तो शेतकरी मालदार होतो. नोकरीला असलेला माणूस नोकरीच करत असतो, महादशा बदलली कि मगच व्यवसाय करायची संधी येते. शहरात राहणार शहरातच राहतो. परदेशात राहणार परदेशात राहतो. सुखवस्तू असनारा सुखवस्तूच राहतो. हे सगळे दशेप्रमाणे ठरते.

सावरकरांनां काळ्या पाण्याची शिक्षा हि १९१० ते १९२१ ह्या काळात झाली. तो काळ त्यांची जन्मतारीख-वेळ २१.५. १८८३ -२१.२५ (नासिक) गृहीत धरून बघितली असता गुरुदशेचा काळ येतो. गुरु सप्तम ह्या पत्नीच्या स्थानात आहे. गुरूसारखा महान लोभस व परोपकारी ग्रह आणि फळ काय देतोय तर काळ्या पाण्याची शिक्षा! अशक्य आहे. अशाने येड्यात काढतील मला सगळे. आता थोडा युक्तिवाद करू. काळ्या पाण्याची शिक्षा कशासाठी मिळाली तर स्वातंत्र्य ह्या मागणीसाठी. आमच्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर आहेत. कारण स्वातंत्र्य म्हणजे काय ह्याची व्याख्या त्यांनीच केली. बीज त्यांनींच रोवले. आज त्याचा वटवृक्ष झाला. पण आले का कोण त्यांच्याबरोबर शिक्षा भोगायला, कि शिक्षेला विरोध करायला. शेवटी त्यांनी जे केले तो प्रवाहाविरुद्ध पोहायचाच प्रयत्न होता. त्रास हा होणारच होता. पण त्यावेळी मात्र कुणाला त्यांच्या गुरुदशेचे काही पडले नव्हते. कोणी पुढे आले नाही. भित्रे लोक्स. आणि फळ म्हणजे हालअपेष्टा आणि तुरुंगवास ! म्हणून मला हि सावरकरांची जन्मवेळ अजिबात पटली नाही. 

आता काही ज्योतिषी असा युक्तिवाद करतात कि भविष्य हे आजूबाजूचे स्थळ-काळ-देश-सत्ता बघून करायचे असते. म्हणजे ब्रिटिशांची सत्ता होती म्हणून ते जरी चांगले काम करीत होते  तरी ब्रिटिशांच्या दृष्टीने ते वाईट होते म्हणून त्यांना वाईट फळे मिळाली. हि म्हणजे ओढूनताणून भविष्य घडवून आणायची हाईट झाली. हे असले नाय  पटत आपल्याला. छोड दो. काढिव भविष्य आपल्याला नकोच. 
तर आपण पुढे जाऊ. महापुरुषांचा नाद नाय करायचा. तोंडावर पडायचे नाही ना आपल्याला. आपली आपल्या आजुबाजीची साधी माणसेच बरी. 

आता हि सध्या माणसाची (बाईही असू शकते) पत्रिका बघा. 

वरील चित्रात ह्या व्यक्तीची राहू महादशा चालू आहे. राहू हा चतुर्थ स्थानाचा स्वामी (ज्यात हृदय, आई, स्थावर, राहते घर, मित्र ह्यांचा समावेश होतो) हा अष्टम ह्या पीडास्थानात आहे. बऱ्याच महाशयांना राहू कुठल्या राशीचा स्वामी हेही माहित नसते.असो. राहू हा कन्या (६) ह्या राशीचा स्वामी आहे. आता ह्या महादशेची दशेची फळे काय मिळाली ते बघा. ह्या व्यक्तीने २००१ ला नुकताच एक प्लॉट घेतला होता पण तो अजिबात डेव्हलप झालेला नव्हता. तरीही त्याने तिथे बांधकाम केले. त्याला घरातून विरोध झाला आईवडील वेगळे झाले. नंतर नोकरीत बदल्यांचे सत्र सुरु झाले,  त्यामुळे वास्तुसुख असे मिळालेच नाही. दरवेळी बिर्हाड पाठीवर घेऊनच फिरत राहिला. मित्र राहिले नाहीत. आणि विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी रक्तदाब सुरु झाला. तर असा हा मुख्य दशेचा परिणाम. तो आजतागायत चालू आहे. आता ह्या मुख्य दशेच्या अंतर्दशेत काय झाले ते पाहू. त्यासाठी खालील चित्र पहा. 
१.४.२००१ ते १२.१२.२००३ ह्या राहू महादाशेच्या व त्या अंतर्गत राहू अंतर्दशेच्या काळातच आई वडील वेगळे झाले. मोडकेतोडके घर झाले. रक्तदाब सुरु झाला. महादशेत त्याच ग्रहाची अंतर्दशा त्या त्या ग्रहाची तीव्र फळे देतो त्याचे हे उदाहरण. मग १२.१२.२००३ ते ७.५.२००६ हा गुरु ह्या लोभस ग्रहाची दशा सुरु झाली. गुरु सप्तम स्थानात स्वगृह सप्तमेश आणि दशमेश आहे. गुरु पुरुष ग्रह आहे. गुरूच्या अंतर्दशेत आल्या-आल्या जाने २००४ ला पुत्रसंततीचा लाभ झाला. मग पुढे पगार तिप्पट वाढून बदली झाली. हि झाली गुरूच्या वाऱ्याची झुळूक ! सगळे कसे गारगार झाले. २०१६ पर्यंत उत्पन्न वाढत गेले. पण बदल्या होत राहिल्या राहू प्रभाव होताच. रक्तदाब होताच आईवडीलही दूरच होते. 

हे सगळे ग्रहदशेप्रमाणे होत असताना काही गोचर ग्रह कार्यरत असतात, त्यांचे उद्योग जाणून घेणेही मनोरंजक असते. इंधन व ऑक्सिजन हे असले तरी आग पेटायला ठिणगीची गरज असते, गोचर ग्रह हे ठिणगीचे काम करतात. कसे ते पाहू. 
ठिणगीचे काम करणारा वरील व्यक्तीच्या कुंडलीत प्रभावी ग्रह आहे तो रवी. तो लाभस्थानात उच्चीचा आहे. (तो परम उच्च नाही हे दुर्दैव-नाहीतर वेगळेच चित्र असले असते). वरील व्यक्तीच्या चंद्रराशीप्रमाणे दरवर्षी रवी हा फेब्रु ते मार्च ह्या काळात ३ ऱ्या स्थानात येतो. ३ रा रवी लग्नकुंडलीच्या ६ व्या स्थानात असतो. दोन्ही स्थाने रवीला अनुकूल असल्याने ह्याच काळात हा व्यक्तीला बदली व पगारवाढीचा नोकरी मिळत आलेली आहे. हीच ती ठिणगी !
पुढे ह्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत व्ययस्थानात वृषभ राशीचा शनी आहे. तो शुक्राच्या वृषभ राशीला आहे. शुक्र आणि शनी हे मित्र असल्याने हा शनी व्ययस्थानातील चांगली फळे देतो. 
नेमका नोव्हे २०११ ते मे २०१३ ह्या काळात शनी तुळ ह्या त्याच्या उच्च राशीला होता. मूळ पत्रिकेत शनी वृषभेला आणि त्याचे तुळेतून भ्रमण चाललेल. म्हणजे व्ययाच्या व्ययातून भ्रमण चाललेले. व्यय स्थान हे खर्च व बचतीशी संबंधित आहे. ह्या काळात सदर व्यक्तीचे मोठी पगारवाढ मिळवून चांगली बचत करून ठेवली. तेही परदेशात. कारण व्ययस्थान हे परदेशाशी निगडित आहे.
तर गणिताचा फॉर्मुला लक्षात आला असेलच. आधी ग्रहदशेचे इंधन आणि ऑक्सिजन हे उपलब्ध असावे लागतात. त्यात गोचरीच्या ग्रहाची एक ठिणगी आवश्यक असते. ती पडली कि घटना घडून येतात. असे आपण ताळे-पडताळे घेत गेलो कि ग्रहांचे उद्योग काय ते समजून येते. 
इथे रवीचे त्रितिय स्थान, शनीचे व्ययाचे व्ययस्थान हे जरा अवघड शब्द आहेत. सामान्य अभ्यासकांना ते डोक्यावरून जात असतील. रवीचे लाभच (११) का नाही? ९ १० हि स्थाने सुद्धा रवीला अनुकूल असतात. शनीचे १२ स्थान का, १२ चे १२ वे का? तर हे केस स्टडीवर व गेलेल्या काळाचे सिंहावलोकन केल्यावर कळणारे सिक्रेट आहे. ते शोधावं लागत. 
पुढे आणखी २-४ केस स्टडी आपण बघूया. तिथे वेगळेच काहीतरी घडले आहे ते कसे व कुठल्या ग्रहांमुळे ते थोड्याच वेळात...










Wednesday, 4 January 2017

फलज्योतिष्य- बे दुणे चार नव्हे पाच !

मी हस्तरेषेवर काही लेख लिहिले, हस्तरेषेचे अनेक जिज्ञासू मला संपर्क करीत असतात, पण लोकांना हस्तरेषेबद्दल तितकासा विश्वास निर्माण झालेला नाही हा माझा खास अनुभव आहे. म्हणून मी आता हस्तरेषेवरून परत कुंडली ज्योतिष्याकडे उडी मारत आहे. काय करणार कोणी जातकच भेटला नाही तर उद्या कुणाच्या हस्तरेशांचा अभ्यास करणार? 

हस्तरेषा लोकांना न आवडण्याची काही गमतीशीर कारणे आहेत. 

गणिताचा बागुलबुवा: कुंडलीशास्त्रात अंकांची आकडेमोड १२ राशी, ९ ग्रह व त्यांचे अचूक अंश म्हणजे हे शास्त्र गणितावर आधारित आहे असा एक सर्वसामान्य लोकांचा समज असतो. त्यामुळे येणारे उत्तर अगदी अणे-पैत अचूक असणार असे सगळ्यांना वाटते. पण तसे काही नसते. इथे एक गणित व एक फॉर्म्युला असा नसतो कि त्यात आकडे टाकले कि धपकन उत्तर खाली पडते. इथे अनेक गणिते तर असतातच पण सगळ्यात जास्त असते ते तर्कशास्त्र, संबंधित प्रकारचे प्रश्न असेलेल्या कुंडल्यांचा अभ्यास व तत्सम अनेक बाबी. फलज्योतिष्य म्हणजेच भविष्यकथन ते कशाच्या आधारे केले जाते हेच कित्येकांना माहित नसते तिथे कसले आकडे टाकता आणि कसली उत्तरे शोधता? थोडक्यात गणिताच्या अवाजवी आकर्षणापाई माणूस (बाईमाणूस - स्त्री पुरुष समानतेचे युग आहे ब्वा म्हून) एखाद्या भविष्यकाराच्या हाती आपली कुंडली देतो आणि स्वतःची फसवणूक करवून घेतो. असो. तर पुढे आपण फलज्योतिष्य आणि भविष्यकथन याचे काही साधे सरळ ठोकताळे समजावून घेऊ. 

मात्र ह्या ठोकताळे उर्फ गणिताच्या फॉर्म्युलाचा मालक मी (आणि एकटा मीच) आहे हे विसरू नका. 

हाताचा आकार: आपल्या हाताचा आकार इतका लहान असतो कि त्यात इतके सगळे भविष्य कसे काय लिहिले असेल ब्वा? अशी एक शंका काढून बरेच लोक हाताचा नाद सोडून देतात.  तसेच बहुतेक सर्व बाया-माणसांचे हात म्हणजे काही मुख्य रेषा, बोटे इत्यादी सारखेच असतात मग प्रत्येकाचे इतके वेगवेगळे भविष्य कसे काय ब्वा.. ? त्यात काही लोकांचे (स्वतःचाच) हात बघून डोके गरगरायला लागते, कारण त्यांना ह्या विषयाची काहीच माहिती नसते पण काहीतरी चुकीचे तर्कट करून ते स्वतःला आणि आपल्या मेंदूला त्रास देत असतात. 

आजकल लाईफ फास्ट हो गया है. प्रकरण घाईला आलेले असले कि जसे इमर्जन्सीला जाते तसे घाईची प्रकरणे नेमकी कुठल्या तरी कुडमुड्या बाबाकडे जाऊन पडतात आणि मग आणखी गम्मत जम्मत सुरु होते. त्यात पंचांगावरून जन्मकुंडली मांडणारे, टीव्हीवर भल्या सकाळी फुकट १२ राशींचे भविष्य सांगणारे हे असतातच. ते सावज हेरून जवळ आणत असतात. 

तर सांगायचा मुद्दा हाच आहे कि लोकांमध्ये काही अशी विचारसरणी पसरली आहे कि ज्यामुळे लोक आपोआप फसतात. आयते गिऱ्हाईक बनतात. फलज्योतिष्यात दरवेळी बे दुणे चारच असते असे नाही तर ते कधी-कधी तीन, पाच दहा काहीही असू शकते. कसे ते पुढच्या लेखात सोप्पे करून देत आहे.