Thursday, 16 June 2016

विटाळ, सोयर, सुतक ह्यांचे गौडबंगाल

विटाळ विशेषतः स्त्रियांचा विटाळ हा मोठा कळीचा मुद्दा झालेला आहे, पाळणारे व विरोधी दोन्ही बाजूचे लोक ह्याविषयी फार हिरहिरीने मते मांडत असतात. ह्या प्रथा कशा तयार झाल्या याचा आपण आता विचार करूयात, 
त्याआधी स्त्रिया पूर्वी म्हणजे सुमारे १०० वर्षापूर्वी घरातील कोणकोणती कामे करीत होत्या त्याची यादी बनवू. 
१) जात्यावर दिवसाला किमान २ ते ५ किलो धान्य दळणे, घरात सुमारे ५-१० मुले, नवरा त्याचे भाऊ, बहिणी असा मोठा परिवार असताना त्यांना दिवसाला किती धान्य लागत असेल याचा विचार इथे करावा. 
२) विहीर, नदीवरून पाणी ओढून काढून ते कमीतकमी  १ किमी अंतर वाहून आणणे. 
३) चुलीवर स्वयंपाक करणे. 
४) नदी, विहिरीवर जाऊन भांडी, धुणी धुणे. 
५) ५ ते १० मुले सांभाळणे. त्यांच्यावर लक्ष ठेवणे.  
६) घर झाडणे, साफ ठेवणे. महिन्यातून एकदा सारवून घेणे. 
७) गाई म्हशी ह्यांचे शेण काढणे, गौऱ्या थापणे. 
८) ताक हाटुन लोणी काढणे. 
९) सरपण गोळा करणे. 
१०) शेतकरी कुटुंब असेल व लहान शेती असेल तर बाहेरील मजूर परवडत नाहीत अशावेळी घरातील स्त्रीच शेतीची अनेक कामे करीत असे. 
अशी अनेक कष्टाची कामे स्त्रिया पूर्वी करीत होत्या. त्यात ती तरुण आणि नवविवाहित असेल तर नंदा, जावा ह्यातील राजकारण ह्यामुळे एकीलाच सगळे रांधा, उष्टी खरकटी काढा करायला लागायचे हे आपली आई आज्जी सहज संगून जातात. 
किंबहुना पुरुषापेक्षा स्त्रियाच अधिक कष्टाची कामे करीत होत्या हे स्पष्ट होते. आत्ताही स्त्रिया कामे करीत नाहीत असे नाही, पण आधुनिकतेमुळे कष्ट बरेच कमी झालेले आहेत. 

पूर्वी देव हाच सगळ्याचा करता करविता आहे हे तत्व सर्वमान्य होते. अमुक एक कृत्य केले तर तो कोप पावेल म्हणून अनेक नियम तयार केले गेले. नियम तयार करणार्यांना चांगली जाण होती पण नंतरच्या लोकांना ते नियम का तयार गेले याचाही विसर पडला असावा. त्यातलाच हा विटाळाचा नियम आहे असे म्हणावे लागेल. 
वर दिलेल्या यादीतील कष्टाची आणि दिवसरात्र करायची कामे जर एखादी स्त्रीला तिच्या पाळीच्या काळात करायला लावली तर तो किती क्रूरपणा ठरू शकतो! अनेकदा पाळीच्या काळात स्त्रीच्या ओटीपोटात दुखते. फार हालचाल केल्याने दुषित रक्त मूत्रमार्गात जाऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. शिवाय ह्या काळात संभोग करणे तर निषिद्ध मानले गेलेच आहे. 
स्त्रियांना हे चार दिवस असे बंदिस्त ठेवणे अयोग्य वाटते, पण प्रसूती झाल्यावर आई व मुलाला सव्वा महिना सोयर (विटाळ) का असतो ह्याचा विचार करताना कोणी दिसत नाही. प्रसुतीसारख्या प्रखर परीक्षेतून बाहेर पडल्यावर नक्कीच सव्वा महिना आराम मिळायला हवा असे आपले धर्मशास्त्र सांगते, तेही चूकच आहे का मग? तसेच बालकाला दुध पाजणे, त्याची अतिशय काळजी घेणे हे आवश्यक असतेच असते पण शरीराची झालेली झीज, प्रसुतीत झालेल्या जखमा, नंतर वाहणारे दुषित रक्त ह्या सगळ्यातून सावरण्यासाठी हा काळ आरामाचा ठरवला गेला आहे.  त्यावर बोलण्यास मात्र बरेच लोक तयार नसतात.

असे नियम नसते तर पाळीच्या काळात किवा प्रसुतीनंतर दुसऱ्याच दिवशी स्त्रीला कामाला जुंपले गेले असते. कदाचित फार पूर्वी असे झालेही असेल. त्यात अनेक स्त्रिया दगावल्या देखील असतील म्हणूनच तर हा नियम निर्माण केला गेला. 
घरात शिवता-शिवत नको म्हणून (कारण घरात देव-देव्हाराअसतो) स्त्रीला एका ठिकाणी बसवून ठेवणे हे आता गमतीचे वाटत असले तरी पूर्वीच्या जीवनशैलीचा विचार केला तर ते स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक होते. 
आता स्त्रिया नोकरी करतात. त्यांना असे महिन्याला चार दिवस सुट्टी असलेली नोकरी कोणी देणार नाही. स्वतंत्र कुटुंबात तिलाच घरातील कामे करावी लागतात. अशावेळी जे पूर्वीच्या प्रथा मानतात त्यांच्या मनात फार गोंधळाचे वातवरण निर्माण होते. असा गोंधळ होऊ देण्याची गरज नाही म्हणून हा लेखप्रपंच केला आहे. पण असे असले तरी स्त्रियांनी ह्या काळात कमी कष्टाची कामे करावीत. पतीनेही घरातील कामात पत्नीला मदत करावी हा संदेश ह्यामागे आहे. काळ बदलला आहे, आधुनिकतेमुळे जीवन बदलले आहे, पण स्त्री तीच आहे, कष्ट थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत पण कष्ट तर आहेतच. शिवाय मानसिक ताण वाढतो आहे. ह्या परिस्थितीत जुन्या प्रथांचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे. 
विटाळाचे नियम न पाळल्याने देवाचा/देवीचा कोप असे काही होत नसते, पण एका स्त्रीला त्या कठीण प्रसंगात अतिकष्टाच्या कामाला जुंपणे हेही अयोग्य आहे. संसाराच्या गोडीत भले ती कष्ट करायला तयार असली तरीही तिनेही स्वतःवर संयम ठेवायला हवा.
पुढे एखादी व्यक्ती मृत झाल्यावर जे सुतक पाळले जाते त्याविषयी आपण विचार करूया.









No comments:

Post a Comment