Saturday, 25 June 2016

ग्रहांच्या दुश्मन्या: शुक्र-मंगळ

बागेतील फुले जशी रंगबेरंगी आणि सुंदर असतात तसेच आकाशातील ग्रह हे रंगबेरंगी व सुंदर असतात. गुलाबासारखे काटे-कोरंटीला हाताने कुस्करता येत नाही तसेच हे आपले मित्र ग्रह आहेत. फरक इतकाच की फुले बघायला आपल्याला वेळ नसतो आणि ग्रह इतके दूर आहेत की ते बघायला आपल्याला इतकी लांबची दृष्टी नाही.
काही ग्रह एकमेकांना पाण्यात पाहतात त्यातली शुक्र मंगळ ही जोडी आहे. सगळ्यात आधी शुक्र आणि मंगळ हे कशाचे कारक ग्रह आहेत हे आपण पाहू.
शुक्र: शुक्र ग्रह हा नाजूकपणा, सौंदर्य, कलागुण, कवित्व, हळवेपणा ह्यांचा कारक आहे. कारक म्हणजे वरील गुण शुक्राच्या कृपेने प्राप्त होतात. शुक्र १,२,४,५,७,९,१०,११ आणि १२ ह्या सर्व स्थानात अनुकूल असतो, शुक्र हा एक शुभ ग्रह आहे. तो चांगल्या गोष्टी घडवतो. फक्त ३,६,८ ह्या स्थानात शुक्र अशुभ समजला जातो. शुक्र म्हणजे शुभ्र पांढरा रंग आहे. लग्नी शुक्र असणारे लोक हमखास गोरे असतात. अर्थात शुक्राबरोबर मंगळ असल्यावर असे होत नाही. 
त्याचे रत्न हे हिरा (किंवा पर्यायी रत्न झिरकॉन) हे आहे. शुक्र हा स्त्रीतत्त्वाचा ग्रह आहे.
गम्मत म्हणजे पुरुषत्वाला किंवा पुरुषाच्या वीर्यातील कणांना शुक्रजंतू (sperm) म्हणतात. (त्यांना जंतू म्हणतात हे एक दुर्दैव आहेच आहे) पण स्त्रीवाचक ग्रहाचे नाव मात्र पुरुषातील प्रजनन करणाऱ्या कणांना दिले जाते हे आश्चर्यकारक वाटते. 
शुक्र जरी स्त्रीवाचक असला तरी त्याचे गुण असलेले पुरुष स्त्रियांना आवडतात, त्यांना भुरळ घालतात म्हणून  शुक्र प्रभावी असणारे लोक प्रेम, प्रणय ह्यात अधिक यशस्वी होतात. शुक्रजंतू अमाप असूनही ते योग्य ठिकाणी म्हणजे स्त्रीबीजापर्यंत पोचलेच नाहीत तर पुढची पिढी कशी निर्माण होणार? शुक्रजंतू प्रभावी असणे हे पुरुषत्वाचे महत्व आहे म्हणून ते शुक्राचे महत्व आहे. शुक्र हा शांतताप्रिय ग्रह आहे. तो स्त्रीच्या कलाकलाने घेणारा आहे. तो जोर-जबरदस्ती करीत नाही. वृषभ आणि तूळ राशीचा शुक्र हा स्वगृही व बलवान असतो, मीन ह्या बाराव्या राशीचा शुक्र उच्चीचा असतो. कन्या राशीचा शुक्र हा निचीचा असतो. (कन्या ही बुधाची रास शुक्रालाही आवडत नाही). 
तरीही बुध, राहू, शनी हे शुक्राचे मित्र आहेत हे विशेष. त्यातील शनीशी शुक्राचे सख्य म्हणजे शनीचा मंदपणा, अंधार (सामान्यतः स्त्रीला लज्जा ह्या कारणास्तव प्रणयाचे वेळी अंधार आवडतो), न्यायवृत्ती ह्यांच्याशी निगडित आहे.
शुक्राची स्वगृह तूळ रास ही शनीची उच्च रास आहे. आता मंगळ ह्या महाभागाचा विचार करूयात,

मंगळ: मंगळ म्हणजे पवित्र हा कशा अर्थाने हे शेवटी पाहू, पण मंगळाचे गुण आधी पाहुयात, मंगळ म्हणजे, राऊडी, धसमुसळा, घाईवर आलेला, अधीर, पिच्छा न सोडणारा, शीघ्र, तापट, शीघ्रकोपी, अपमान सहन न करणारा, स्वतःच्या हक्कासाठी दोन हात करणारा, संयम नसलेला, अंगात घुमणारा, पछाडून टाकणारा, न्याय्य अन्याय्य ह्यापेक्षा समोर काय योग्य वाटते ते बघून लढणारा लढवैय्या.
मंगळ ३,६,१० आणि ११ ह्या घरात अनुकूल असतो, मंगळ हा एक पापग्रह आहे. तो युद्धखोर आहे. त्याचा रंग लाल आहे. हा रक्ताचा ग्रह आहे. स्त्रीबीज हे रक्तातून बनते आणि त्याची वाढ रक्तातून होते म्हणून स्त्रीच्या दृष्टीने मंगळाचे महत्व अधिक आहे. मंगळाचे हेही गणित शुक्रासारखेच अगदी विरुद्ध आहे, कारण मंगळ हा पुरुष ग्रह आहे तरीही तो स्त्रीतत्वाच्या अधिक जवळचा आहे. कारण निसर्गतः स्त्रीला पाळी येणे, बाळंतपण ह्यात जे रक्त खर्ची घालावे लागते ते पुरुषाला घालावे लागत नाही. रक्ताची ओळख स्त्रीलाच आधी होते. ज्यावेळी पुरुषांच्यात जबर स्पर्धा असते तेव्हा त्यातील यशस्वी पुरुषालाच स्त्री निवडते, हे उत्क्रांतीचे तत्व मंगळी लोकांच्या बाबत लागू पडते. 

शुक्राची प्रेमप्रकरणात महती, आणि स्पर्धेत मंगळाची महती हे दोन अगदी वेगवेगळ्या स्थित्या दर्शवितात. हे दोन ग्रह प्रबळ असलेले लोक आपापल्या आवडीप्रमाणे (प्रबळ ग्रहाप्रमाणे) जोडीदाराची निवड करतात. त्यात त्यांची पत्रिका म्हणजेच सर्वांगीण पार्श्वभूमी कारणीभूत असते. कारण एका कष्ट करणाऱ्या घरातील मुलगा मुली कशा जोडीदाराची निवड करतात हे त्यांच्या आयुष्यावर अवलांबून असते. अर्थात तो पूर्ण वेगळा आणि मोठा विषय आहे म्हणून त्यावर इतरत्र चर्चा करूयात.

मंगळ ग्रह भोळा आहे, त्याचा राग हा त्याच्या तात्कालिक हक्कांची अवहेलना झाल्याने उत्पन्न होतो. तो भोळेपणाने लढणारा वीर आहे. त्याला कसलीच पर्वा नसते. तो अगदी बेपर्वा असतो. बेभान. तो क्षणभर जगतो पण जगुण जातो, मोठ्या ऐटीत. 
आता हा अन्योन्य क्रम बघा, मंगळ स्त्रीच्या बाजूचा, आणि शुक्र पुरुषाच्या बाजूचा, पण हे ग्रह अगदी विरुद्ध वागतात. मंगळ जोरजबरदस्ती करणारा आणि शुक्र गोड-गोड बोलून काम साधून घेणारा, (मला तर ह्या शुक्राचा राग येतोय). 
बलात्कार हा आजकाल मोठा ऐरणीवरचा मुद्दा आहे, शुक्र आणि मंगळ ह्या दोन ग्रहांचा एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक शक्तीशी जवळचा संबंध असल्याने फसवून विवाह करणे, बलात्कार करणे, मर्जीविरुद्ध विवाह करणे यांचा या दोन ग्रहांशी संबंध आहे. तो आपण पुढे पाहूयात. 
मंगळाचा एक चांगला गुण म्हणजे मंगळ चांगला असलेल्या व्यक्ती ह्या भरपूर उर्जा असलेल्या असतात, स्वस्थ बसत नाहीत, दिर्घोद्योगी असतात. त्यामुळे त्या सतत बदल घडवत असतात. लक्ष्मी अर्थात संपत्ती त्यांच्यामागे येते. म्हणून मंगळाला मंगळ म्हणजे शुभ मानले गेले आहे. 
तूर्तास इतकेच...











Thursday, 16 June 2016

विटाळ, सोयर, सुतक ह्यांचे गौडबंगाल

विटाळ विशेषतः स्त्रियांचा विटाळ हा मोठा कळीचा मुद्दा झालेला आहे, पाळणारे व विरोधी दोन्ही बाजूचे लोक ह्याविषयी फार हिरहिरीने मते मांडत असतात. ह्या प्रथा कशा तयार झाल्या याचा आपण आता विचार करूयात, 
त्याआधी स्त्रिया पूर्वी म्हणजे सुमारे १०० वर्षापूर्वी घरातील कोणकोणती कामे करीत होत्या त्याची यादी बनवू. 
१) जात्यावर दिवसाला किमान २ ते ५ किलो धान्य दळणे, घरात सुमारे ५-१० मुले, नवरा त्याचे भाऊ, बहिणी असा मोठा परिवार असताना त्यांना दिवसाला किती धान्य लागत असेल याचा विचार इथे करावा. 
२) विहीर, नदीवरून पाणी ओढून काढून ते कमीतकमी  १ किमी अंतर वाहून आणणे. 
३) चुलीवर स्वयंपाक करणे. 
४) नदी, विहिरीवर जाऊन भांडी, धुणी धुणे. 
५) ५ ते १० मुले सांभाळणे. त्यांच्यावर लक्ष ठेवणे.  
६) घर झाडणे, साफ ठेवणे. महिन्यातून एकदा सारवून घेणे. 
७) गाई म्हशी ह्यांचे शेण काढणे, गौऱ्या थापणे. 
८) ताक हाटुन लोणी काढणे. 
९) सरपण गोळा करणे. 
१०) शेतकरी कुटुंब असेल व लहान शेती असेल तर बाहेरील मजूर परवडत नाहीत अशावेळी घरातील स्त्रीच शेतीची अनेक कामे करीत असे. 
अशी अनेक कष्टाची कामे स्त्रिया पूर्वी करीत होत्या. त्यात ती तरुण आणि नवविवाहित असेल तर नंदा, जावा ह्यातील राजकारण ह्यामुळे एकीलाच सगळे रांधा, उष्टी खरकटी काढा करायला लागायचे हे आपली आई आज्जी सहज संगून जातात. 
किंबहुना पुरुषापेक्षा स्त्रियाच अधिक कष्टाची कामे करीत होत्या हे स्पष्ट होते. आत्ताही स्त्रिया कामे करीत नाहीत असे नाही, पण आधुनिकतेमुळे कष्ट बरेच कमी झालेले आहेत. 

पूर्वी देव हाच सगळ्याचा करता करविता आहे हे तत्व सर्वमान्य होते. अमुक एक कृत्य केले तर तो कोप पावेल म्हणून अनेक नियम तयार केले गेले. नियम तयार करणार्यांना चांगली जाण होती पण नंतरच्या लोकांना ते नियम का तयार गेले याचाही विसर पडला असावा. त्यातलाच हा विटाळाचा नियम आहे असे म्हणावे लागेल. 
वर दिलेल्या यादीतील कष्टाची आणि दिवसरात्र करायची कामे जर एखादी स्त्रीला तिच्या पाळीच्या काळात करायला लावली तर तो किती क्रूरपणा ठरू शकतो! अनेकदा पाळीच्या काळात स्त्रीच्या ओटीपोटात दुखते. फार हालचाल केल्याने दुषित रक्त मूत्रमार्गात जाऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. शिवाय ह्या काळात संभोग करणे तर निषिद्ध मानले गेलेच आहे. 
स्त्रियांना हे चार दिवस असे बंदिस्त ठेवणे अयोग्य वाटते, पण प्रसूती झाल्यावर आई व मुलाला सव्वा महिना सोयर (विटाळ) का असतो ह्याचा विचार करताना कोणी दिसत नाही. प्रसुतीसारख्या प्रखर परीक्षेतून बाहेर पडल्यावर नक्कीच सव्वा महिना आराम मिळायला हवा असे आपले धर्मशास्त्र सांगते, तेही चूकच आहे का मग? तसेच बालकाला दुध पाजणे, त्याची अतिशय काळजी घेणे हे आवश्यक असतेच असते पण शरीराची झालेली झीज, प्रसुतीत झालेल्या जखमा, नंतर वाहणारे दुषित रक्त ह्या सगळ्यातून सावरण्यासाठी हा काळ आरामाचा ठरवला गेला आहे.  त्यावर बोलण्यास मात्र बरेच लोक तयार नसतात.

असे नियम नसते तर पाळीच्या काळात किवा प्रसुतीनंतर दुसऱ्याच दिवशी स्त्रीला कामाला जुंपले गेले असते. कदाचित फार पूर्वी असे झालेही असेल. त्यात अनेक स्त्रिया दगावल्या देखील असतील म्हणूनच तर हा नियम निर्माण केला गेला. 
घरात शिवता-शिवत नको म्हणून (कारण घरात देव-देव्हाराअसतो) स्त्रीला एका ठिकाणी बसवून ठेवणे हे आता गमतीचे वाटत असले तरी पूर्वीच्या जीवनशैलीचा विचार केला तर ते स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक होते. 
आता स्त्रिया नोकरी करतात. त्यांना असे महिन्याला चार दिवस सुट्टी असलेली नोकरी कोणी देणार नाही. स्वतंत्र कुटुंबात तिलाच घरातील कामे करावी लागतात. अशावेळी जे पूर्वीच्या प्रथा मानतात त्यांच्या मनात फार गोंधळाचे वातवरण निर्माण होते. असा गोंधळ होऊ देण्याची गरज नाही म्हणून हा लेखप्रपंच केला आहे. पण असे असले तरी स्त्रियांनी ह्या काळात कमी कष्टाची कामे करावीत. पतीनेही घरातील कामात पत्नीला मदत करावी हा संदेश ह्यामागे आहे. काळ बदलला आहे, आधुनिकतेमुळे जीवन बदलले आहे, पण स्त्री तीच आहे, कष्ट थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत पण कष्ट तर आहेतच. शिवाय मानसिक ताण वाढतो आहे. ह्या परिस्थितीत जुन्या प्रथांचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे. 
विटाळाचे नियम न पाळल्याने देवाचा/देवीचा कोप असे काही होत नसते, पण एका स्त्रीला त्या कठीण प्रसंगात अतिकष्टाच्या कामाला जुंपणे हेही अयोग्य आहे. संसाराच्या गोडीत भले ती कष्ट करायला तयार असली तरीही तिनेही स्वतःवर संयम ठेवायला हवा.
पुढे एखादी व्यक्ती मृत झाल्यावर जे सुतक पाळले जाते त्याविषयी आपण विचार करूया.









Saturday, 4 June 2016

कुंडलीतील मंगळ

कुंडलीत मंगळ असणे म्हणजे काय? मंगळ हा ग्रह अगतिकता (घाई), संघर्ष, युद्ध यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या जन्म कुंडलीत मंगळ १,४,७,८ किवा १२ व्या स्थानात असेल तर त्या व्यक्तीस मंगळ आहे असे समजले जाते. 
त्यात मंगळाला चौथी, सातवी व आठवी दृष्टी असते. म्हणजे पहिल्या स्थानात असलेला मंगळ चौथ्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर दृष्टी टाकतो. अशाप्रकारे वरील १,४,७,८ किवा १२ व्या स्थानात असलेला मंगळ हा केंद्रातील महत्वाच्या (१,४,७,१०) ह्या स्थानावर दृष्टी टाकतो व तसे प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनशैलीत दिसतात. 
मंगळ असलेल्या व्यक्तीला मांगलिक वगैरे म्हणतात. अधीरपणा व घाई हे ह्यांचे स्वभाव वैशिष्ठ्य असते. शरीर मजबूत असते. डोक्यात आलेली कल्पना लवकरात लवकर कशी अमलात आणता येईल याची ह्यांना फार घाई असते. हेच लहानपणी हट्ट करणारे एखादे मुल असेल तर त्यालाही लागू पडते. एखादी वस्तू लगेचच पाहिजे हे लगेच तिथे दिसून येते. 
मांगलिक लोकांची सहनशक्ती फार कमी असते. त्यातल्या त्यात पहिल्या स्थानात मंगळ असलेले लोक जरा जास्तच मंगळाच्या प्रभावाखाली येतात. त्यामानाने इतर ठिकाणी (४,७,८ किवा १२) मंगळ असलेले लोक ह्या बाबतीत बरेच सौम्य असतात. 
वरील स्थानात मंगळ असता तो ज्या राशीला आहे त्याप्रमाणे त्याचा प्रभाव कमीअधिक होतो. उदाहरणार्थ लग्नी निचीचा (कर्क राशीचा) किवा शत्रुगृही म्हणजे कन्या किवा मिथुन ह्या बुधाच्या राशीला (मंगळ व बुध हे एकमेकांचे शत्रू समजले जातात) मंगळ असता माणूस जरी लढाऊ, आक्रमक असला तरी त्याला पुरेसे पाठबळ नसते.
तेच जर इथला मंगळ स्वराशीचा (मेष किवा वृश्चिक राशीचा) किवा उच्चीचा (मकर राशीचा) असेल तर असा माणूस आक्रमक, लढाऊ तर असतोच पण त्याला पाठबळही उत्तम असते. 
ह्या वरील दोन प्रकारांमुळे मंगळ असलेल्या माणसाच्या प्रवृत्तींना खतपाणी मिळते किवा मिळत नाही व त्याप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. 
हे जरी सगळे खरे असले तरी मंगळासारखे ग्रह हे स्थानबलानुसार फार प्रभाव टाकतात. म्हणजे मंगळ कुठल्याही राशीचा असला तरी काही मुलभुत गुण देतोच देतो. ते गुण म्हणजे अधीरता, आक्रमकपणा हे असतात. 
मंगळाचा दुसरा संबंध माणसाच्या लैंगिक गरजांशी आहे. मंगळ असलेल्या व्यक्तीच्या लैंगिक गरजा ह्या प्रबळ असतात. शरीर अधिक काटक व मजबूत असते. म्हणजे अशी व्यक्ती बळकट आक्रमक, अधीर व लैंगिकदृष्ट्या अधिक उत्सुक असते. हे एक विचित्र मानसिक कडबोळे तयार झालेली अशी मांगलिक व्यक्ती असते. 
जसे स्थानबलाचे आपण पहिले तसेच मंगळावर पडणाऱ्या इतर ग्रहांच्या दृष्टीचे आहे. बरेचदा शनि, गुरु किवा राहू-केतू ह्यांची मंगळावर दृष्टी आहे म्हणून व्यक्तीच्या काही स्वभावगुणांकडे दुर्लक्ष केले जाते पण ते चुकीचे आहे. मंगळ हा प्रकार शारीरिक आणि मानसिक स्तरावर समजून घेण्याचा विषय आहे. त्याला नुसते जन्मपत्रिकेत समजून घेणे योग्य होत नाही. तसे झाले नाही तर आजूबाजूच्या व विशेषतः जोडीदाराकडून मंगळ असलेल्या व्यक्तीचा कोंडमारा होण्याची शक्यता अधिक असते. 
एखाद्या कृतीत होणारी घाई किवा लैंगिक व्यवहारात अतिउत्साह त्यात वेगवेगळे प्रयोग करणे हे मांगलिक लोकांचे वैशिष्ठ्य इतर लोकांना जुळवून घेणे अवघड जाते. पण म्हणून एखाद्याला मंगळ आहे म्हणून त्याला वळीत टाकणेही चुकीचेच आहे.
ज्योतिष्यशास्त्राचे विचारही बदलत आहेत. विवाह गुणमेलन किवा मंगळ असणे ह्याविषयी पूर्वी असणारे कडक नियम आणि अंध कल्पना ह्याही बदलत आहेत. विवाह गुणमेलन कोष्टकही वेळोवेळी अधिक शिथिल केले जात आहे. 
मंगळ दोष आहे म्हणजे जोडीदाराचा मृत्यू होणार ह्या खुळचट कल्पना पूर्वी होत्या त्या आता आपण विसरत आहोत. एकेकाळी अशी भीती दाखवून काही गोष्टी साध्य केल्या जात होत्या त्या आता वेगळ्या पद्धतीने आपण समजून घ्यायला हव्यात. 
विवाह कुंडलीप्रमाणे जुळवताना, सगळ्यात आधी गुणमेलन, नंतर मुलगा मुलगी ह्यांच्या ग्रहांचे परस्पर योग आणि मग मंगळ ह्या अग्निदिव्यातून बाहेर पडून विवाह जुळवणे जिकीरीचे काम होऊन बसते. ह्यासाठी गुणमेलन, एकनाडी, ग्रहांचे योग, मंगळ असणे नसणे इत्यादी बाबींचा पूर्णतः वेगळ्या पद्धतीने अभ्यास होण्याची गरज आहे.