Sunday, 28 May 2017

मी ज्योतिष्यशास्त्रात का घुसलो?

काळ झपाट्याने बदलत आहे, शिक्षणाने  समाजाचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढत आहे. मी लहानाचा मोठा १९७० ते ९० च्या काळात झालो. त्याकाळी खेडोपाडी लाईट नुकतीच आली होती. इंटरनेट कम्प्युटर हे नव्हतेच,आत्ताचा सोशल मिडिया म्हणजे त्यावेळच्या पारावरच्या गप्पा!! पण तेही मोठी माणसे गप्पा मारत. आम्ही बच्चे कंपनी दिवस मावळला कि नाय नाय त्या विषयावर तारे तोडायचा प्रयत्न करत असू. तो बैलगाडीचा ग्रामीण समाज, कट्टर जाति-समाजव्यवस्था  ह्यामुळे त्यापूर्वी सुमारे ३००-४०० वर्षे लोक कसे असतील याचा साधारण अंदाज यायचा. शाळेत शिकवलेले विज्ञान हे रट्टा लावून शिकले जायचे. तकलादू इतिहास आणि देव-देवस्की, पुराण, आपला धर्म, भूत, प्रेत, चमत्कार यावरच चर्चेत जास्त वेळ जायचा. 
घराच्या बाहेर असताना मस्त चालायचे पण घरात आल्यावर काहीतरी गंभीर प्रकरण असल्याचा भास व्हायचा. व्यवसाय निट चालत नाही, कोणीतरी करणी केलेली असणार, मुलींची लग्ने जमत नाहीत म्हणजे काहीतरी बाहेरचा त्रास असणार. क्वचित वास्तुशास्त्र इत्यादीबाबत चर्चा चालू असायची. 
माझा गाव सासवड, एक तालुक्याचे गाव. एखाद्याच्या घरात काहीतरी अडचण आहे म्हटल्यावर गावातील लोक तोंड लपवत (कारण काही अडचण आहे हे सांगायची मोठ्या लोकांना लाज वाटते म्हणून) गावातील मांत्रिक, एखादा गुरु, अध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेला बाबा, किवा ब्राम्हण गुरुजी यांच्या घरी अमावस्या पौर्णिमेला, गुरुवारी असे काही ठराविक दिवस हजेरी लावत. 
थोडी चांगली आर्थिक स्थिती असलेले लोक जिल्ह्याच्या ठिकाणी, किवा कोकणात, असे कुठे कुठे जात.
भूत-प्रेत बाधा याविषयी मी जे अनुभव घेतले ते पुढे कधीतरी विस्ताराने. आधी बाबा, गुरु आणि ब्राम्हण गुरुजींना निपटू. 
बाबा बरोबरच बाया सुद्धा असायच्या. अंगात येणे हा आपल्याकडील खास प्रकार. विशेषतः पौर्णिमेला अंगात येण्याच्या अनेक घटना मी प्रत्यक्ष पहिल्या आहेत. त्यानंतर अनेक लोक त्यांचे प्रश्न अंगात आलेल्या व्यक्तीला विचारतात. अशावेळी ती व्यक्ती वेगवेगळी उत्तरे देते. बहुतेक उत्तरे ज्या देवाशी-देवीशी संबंधित व्यक्तीच्या अंगात आले आहे त्याच्याशीच असतात.

अंगात आलेली व्यक्ती बरेचदा स्वतःचा मानसिक कंट्रोल विसरलेली असते व ती एका संमोहित अवस्थेत असते. प्रश्न विचारला असता जसे प्रश्न कुंडलीत उत्तरे मिळतात तशीच उत्तरे अंगात आलेली व्यक्ती देत असते. बरेचदा उत्तरांची भाषा सांकेतिक असते व ज्या व्यक्तीसंदर्भात उत्तरे दिली जातात त्यालाच त्यातील गुप्त बाबी माहित असतात. अंगात येणाऱ्या व्यक्ती ह्या खऱ्या व लबाडसुद्धा असू शकतात. अंगात येते हे दाखवल्यावर आपले महत्व वाढते असे वाटून बळेच अंगात आणणारे लोक भोंदू असतात. 
दिवसभर रांधा-उष्टी खरकटी काढा असे काम करणारी एखादी स्त्री जेव्हा तिच्या अंगात येऊन घुमू लागते तेव्हा तिचा त्यात काय स्वार्थ असू शकतो? 
सासवड येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात एक साधू आहेत. ते भिक्षा मागून पोट भरतात. पण विजयादशमीला जो भैरवनाथाचा उत्सव असतो त्यावेळी त्यांच्या अंगात येते. त्यानंतर ते तेथील दीड सेंटीमीटर जाडी असलेला लंगर (लोखंडी साखळी) एक किवा दोन झटक्यात तोडतात. त्यांचे हे अंगात येणे फक्त ५ ते १० मिनिटाचे असते. घुमने, लोकांची उत्तरे देणे असा प्रकार अद्याप झालेला नाही.
 
दुसरा प्रकार म्हणजे साधू, बाबा इत्यादी. हे लोक बरेच उपक्रम तुम्हाला करायला सांगतात. फलनिष्पत्ती काय हे त्या त्या काळानुसार ठरते. पण कोणी लक्षाधीश झाल्याचे आठवत नाही. तात्पुरते संकट दूर होते का हेही अनुभवास आलेले नाही. साधू बाबांचे महत्वाचे हे असते कि काही काळ ते खूप फिरत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे लोकांना काय काय अनुभव आलेत व काय तोडगे सांगितले गेले याचा ते अभ्यास करतात. ते असे जे शिकेलेले असतात त्याचा उपयोग करून आपल्या भक्तांना मार्गी लावतात. 
बाबा, साधू हे साधारणतः मोठमोठी तीर्थे, कुलदैवताची पीठे अशा ठिकाणी फिरून येतात. एकतर  तिथे पोटाची सोय होते व ज्ञानंही मिळते. बहुतेक बाबा, साधू लोक त्यामुळे मुख्यता कुलदैवत, जादूटोणा, कारणी, भूतबाधा, पितृदोष, वास्तुदोष पैकी काहीतरी एक दोष आहेत हे सांगून मोकळे होतात. 
यातील कुलदैवत उपासनेकडे प्रवृत्त करणे हा एक चांगला उपक्रम आहे. अपघाती हा होईना तो हे बाबा/साधू सांगतात आणि बरीचशी संकटे दूर होतात. भूतबाधा/नजर लागणे हा विषय पुन्हा कधीतरी घेऊ. एखादा उतारा टाकून गरिबाचे किवा प्राणिमात्राचे पोट भरत असेल तर असा उतारा टाकून स्वतःची सुटका करून घेण्यात वाईट काहीच नाही. फेसबुकवर तुम्ही पंचपक्वान्न भरलेल्या ताटाचे फोटो टाकले तर कितीही श्रीमंत असलेल्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटतेच. त्यामुळे एखादे सुंदर मुल, जेवणाचे पदार्थ बाहेर खाणे इत्यादींना नजर लागू शकते.
 
तिसरा प्रकार म्हणजे गुरुजी. हा सर्वात महागडा आणि अवघड प्रकार आहे.समोर पत्रिका घेऊन ते बसलेले असतात. त्यातील अं-कि-ठं आपल्याला कळत नसतो. गुरुजींची गाडी ही एक्स्प्रेस-वे ला लागलेली असते. तिचे स्पीड १००-१२० चे असते. चंद्र-रास बघितली कि साडेसाती आहे का हे सर्वात प्रथम बघितले जाते. तिथे जर तुम्ही सापडलात तर तुमची रवानगी डायरेक्ट शनी मंदिरात तेही साडेसात वर्षांसाठी. काळे वस्त्र घाला, शनीला उडीद, लोह दान करा. मद्यपान, मांसाहार करू नका. चांगले कर्म करा वाईट काही करू नका.  च्यामारी... मग करू काय, कि काहीच करू नको कि काय? 

विवाह जमत/नोकरी लागत नसेल तर अमुक नक्षत्र/अमावस्या ई. ई. दोष आहे शांती करा. मग शांतीचा खर्च सुमारे ५००० व पुढे!!
 तुमचे सगळेच ग्रह बिघडले आहेत, सरळ नवग्रह शांती करून टाका. खर्च सुमारे १०००० व पुढे. गुरुजींची गाडी अफाट वेगाने सुटलेली असते. नको नको म्हणत तुम्ही खाली उतरायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट वरती जाल हे लक्षात ठेवा. 

समोरची पार्टी जर दांडगी असेल तर मग असे साधेसुधे उपाय करून चालत नाहीत. तिथे शत/सहस्त्र/लक्ष/कोटी चंडी/रुद्र याग करावा लागतो. खर्चसुद्धा दांडगा असतो. लाखभर रुपये खर्च करून चांगले होत असेल तर काय वाईट आहे हो?

ह्यात काहीतरी चुकतंय अस कुणालाच वाटत का नाही? श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. 

डोळसपणे कधी पाहणार आपण? जुनी पोथी-पुराणे ह्यांना किती दिवस चिकटून राहणार? पोथ्या पुराणात जे दिलय, ते का दिलय हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारणार? ते किती कालबाह्य आहे हे आपण पाहणार कि नाही? कि बळेच सगळ्यांना एकच-एक नियम लाऊन ठोके घालणार?

वर्षफल/ क्षयदिन/करिदिन अनिष्ट दिवस, प्रतिकूल दिवस, शांती नक्षत्रे, शेतात नांगर धरण्यास मुहूर्त. साडेसाती, ग्रह कोणत्या पादाने आलाय, विषारी नक्षत्रे, गुरुबळ असणे नसणे, सोयर सुतक याशिवाय शास्त्रात बरेच काही आहे. पंचांग लिहिणारे नवीन काही बघणार आहेत कि नाही?

ज्योतिष्याची पुस्तके तर अफलातून असतात. जन्मकुंडलीत ग्रहांचे अंश न देता, गजकेसरी, लक्ष्मी चंद्र, चक्रवर्ती योग असे भारी योग असलेले लोक सायकलवर बिस्कीट विकत असतात. 
शनी-मंगळ अपघातयोग, गुरु-राहू चांडाळ योग असलेले लोक खरेतर मरण्याच्या लायकीचे असतात तरीही जगतात कसे बुवा? डॉक्टर लोक हे ना सगळ्या ढवळाढवळी करून लोकांना वाचवतात आणि आमचे शास्त्र फोल ठरवतात. हे बरोबर नाय. 

आम्ही अजिबात बदलणार नाही. जुने ते सोने. इंटरनेटवर आज सामान्य व मोठमोठ्या लोकांच्या कुंडल्या असतात त्यांचा संग्रह करून आम्ही अभ्यास करणार नाही. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी कधी व का झाल्या हे आम्ही लिहून ठेवणार नाही. जातक आला कि आमच्या मशीनमध्ये त्याला कोंबणार आणि सरळ करूनच बाहेर काढणार!! गोचर-एके गोचरचा पाढा आम्ही रट्टा लाऊन पाठ करणार!! 
त्यात प्रश्नकुंडली नावाचे एक हत्यार घेऊन बसलेले काही बाबाजी असतात. आला जातक कि मांड प्रश्नकुंडली. लग्नेश दशमेश योग जेव्हा होणार तेव्हा तुला नक्की नोकरी लागणार असे सांगून ते त्याला पाठवून देतात. अमेरिकेत आज बेरोजगार असलेला इंजिनिअर पेट्रोल पंपावर काम करतो, नोकरी मिळते सुद्धा. पण ती पेट्रोल पंपावरची!! तो जातक काही का करेना. माझी प्रश्नकुंडली तर बरोबर ठरली ना. ह्याचेच समाधान माणणारे महाभाग आपल्यात आहेत.  

परदेशात ग्रहगोल माणसावर काय परिणाम करतात याचा अभ्यास करण्याची जिज्ञासा आज उत्पन्न झालेली आहेच. माणसाचे जीवन संथ नसते. त्यात घडामोडी घडत असतात. म्हणजे त्याची काही कारणे आहेत हे आधी मान्य करायला हवे. अनेक प्रकारे माहिती जमवणे, ती व्यवस्थित प्रोसेस करणे आज सोपे झाले आहे. त्यावर निरीक्षणे करून नियम सिद्ध करणे हे कामही परदेशात चालू आहे. 
आपण विज्ञान क्षेत्रात असे संशोधन करत नाही तर ज्योतिष्य ह्या कर्मठ विषयात कधी संशोधन करणार? 
त्यातले त्यात श्री कृष्णमुर्ती  ह्यांनी नक्षत्र आधारित ज्योतिष्यावर  त्यांची पद्धत विकसित केली हे विशेष आहे. 
दुसरा एक गैरसमज असाही आहे कि ज्योतिष्यशास्त्र हे भारतीय सनातन बनावटीचे आहे, त्यामुळे ते इतर कर्मठ शास्त्राप्रमाणे कालबाह्य, थोतांड व जुनाट आहे. हा समज चुकीचा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पहिले तर पुरातन भारताचा ग्रीक  संस्कृतीशी जवळचा संबंध होता. सुमारे २००० ते २२०० वर्षापूर्वी  ग्रीक अलेक्झांडर भारतावर आक्रमण करून आला होता. त्यापूर्वी बरेच आधी हे शास्त्र आपल्याकडे ग्रीकांकडून आले. नंतर ते आमचेच अशी  मखलाशी आपण केली हा भाग पुढे येतोच. 
इतकेच काय इंडो-युरोपियन भाषा गट म्हणजे ग्रीक, लाटिन व संस्कृत ह्यात जे साम्य आहे तेही ह्याच सांस्कृतिक देवाण घेवाणीशी संबंधित आहे. त्यावर इतरत्र लेखन नक्कीच करेल. तूर्तास इतकेच!! 
तर असे हे आपले एक जागतिक दर्जाचे व पुरातन शास्त्र आहे, त्याच्या अभ्यासाची उत्कंठा निर्माण झाली आणि मी इकडे घुसलो. 


Saturday, 27 May 2017

आता सामान्य लोक

मागील लेखात आपण सेलिब्रिटी लोकांच्या कुंडल्या तपासल्या. सगळे ज्योतिषी अनेक कुंडल्या गोळा करून हेच करत असतात. "ये बहुत नाइंसाफी है" सामान्य जणांना काही किंमतच नाही मेली. म्हणून आता मी दोन सामान्य जातकांच्या कुंडल्या तुमच्यासमोर उघडणार आहे. 
हे करायचे खरे तर मी टाळणार होतो कारण बरेच लोक मग आपली स्वतःची कुंडली काढणार. आजकाल कुंडलीचे गणित मांडणे खूप सोप्पे झाले आहे. अनेक apps फ्री मध्ये मोबाईल मध्ये लोड करता येतात. अगदी राजे-महाराजेंच्या निघत नव्हत्या त्या षडवर्ग कुंडल्या आज एका क्लिकवर काढता येतात. विंशोत्तरी, योगिनी, चर, चक्र दशा काय पायजे ते सेकंदात मिळते आहे. 
आज बरीच मोठी माहिती अंतर्जालावर उपलब्ध होत आहे. मग एखादा जातक स्वतःची कुंडली मांडून अनेक तर्क करू लागतो आणि स्वतःची कुंडली अगदी टुकार प्रकारची आहे असे त्याला वाटू लागते. आणि त्यापुढे तो प्रयत्न करणे सोडून देऊ शकतो. हे सर्वात वाईट आहे. 
आपण जेव्हा सेलिब्रिटी कुंडल्या तपासल्या तेव्हा काही मोजके ग्रह चांगले असल्याने ते लोक कसे खास बनले हे आपल्या लक्षात आलेच असेल. आज जगात प्रत्येक सेकंदाला कित्येक बालके जन्माला येतात पण सगळ्यांचे प्रारब्ध सारखेच असते असे नाही हेही विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे  गणितात जसे अचूक उत्तर मिळते तसे ग्रह तारे भविष्य हे अचूक उत्तर देतात हे आधी डोक्यातून काढून टाकले पाहिजे. 
उदाहरण द्यायचे झाले तर, समजा जोराचे वादळ-वारे सुटले आहे, त्यात जे उंच वृक्ष आहेत ते कोसळून पडतात पण लहान झाडे तग धरून राहतात. तसेच ग्रह तारे यांचे परिणाम मोठ-मोठ्या व्यक्तिंवर अधिक होतात, पण सामान्य लोक अशा स्थितीत तग धरून राहू शकतात. 

दुसरे महत्वाचे असे कि, ग्रह ताऱ्यांचा प्रभाव हा सर्वत्र असतो.  एखाद्या कढईत शेंगदाणे भाजायला टाकले तर काही शेंगदाणे खास आहेत म्हणून त्यांना कमी धग लागते असे होत नाही.नियतीचा मारा सगळ्यांना सहन करावा लागतो.

त्यामुळे ज्योतिष्य हे अचूक गणित नाही. ते फक्त एक शक्याशक्यता दर्शविणारे शास्त्र आहे. जो विश्वास ठेवतो त्याला काही चांगले वाईट संकेत नक्की मिळतात. ज्योतिष्य हे राजाला (नेतृत्व करणारा) विशेष महत्वाचे असते. शेतकरी, कष्टकरी ह्या लोकांना ज्योतिष्य महत्वाचे नाही असा एक प्रवाद केला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे. चांगले वाईट संकेत, शकून अपशकून हा एक स्वतंत्र विषय आहे त्यावर आपण एका वेगळ्या लेखात चर्चा करू.

तूर्तास खाली दिलेल्या दोन पत्रिका पहा. 


 जातक क्रमांक -१ ह्याची जन्मकुंडली असामान्य दर्जाची आहे. चक्क ३ ग्रह उच्च राशीला आहेत. वयाची अडतीशी याने ओलांडली आहे. घर, गाडी संसार सगळे व्यवस्थित आहे. वास्तविक पाहता फक्त जन्मकुंडली पाहून हा कोणीतरी खास सेलिब्रिटी असावा असा भास कोणाही ज्योतिष्यास होऊ शकतो. 
पण वस्तूस्थिती तशी नाही. याचे नोकऱ्या बदलणे सारखे चालूच असते. व्यवसाय की नोकरी ह्या तिढ्यात हा अजून अडकलेला आहे. हे असे का होते आहे हे जाणून घेण्यास ह्या जातकाची नवमांश कुंडली पाहणे महत्वाचे आहे. 
वर जातकाची नवमांश कुंडली दिलेली आहे. ह्यात एकही ग्रह उच्च नाही. जो शुक्र जन्मकुंडलीत उच्च आहे तो नवमांश कुंडलीत नीच क्षेत्री गेलेला आहे. 
याचे अगदी फसवणारे ग्रह आहेत. हे आपल्या सहजासहजी लक्षात येणार नाही.
पुढे आणखी महत्वाचे हे आहे कि, जे ग्रह ह्या जातकाला चांगली फळे देणार असे वाटते नेमके तेच ग्रह ती फळे देत नाहीत.
याउलट जे ग्रह अजिबात चांगले दिसत नाहीत तेच ग्रह ह्याचे भले करत आहेत. असा हा अजब प्रकार पाहायला मिळतो.



 जातक क्रमांक -२ ह्याच्या जन्मकुंडलीत दोन ग्रह उच्च आहेत. म्हणजे ह्याला सेलिब्रिटी पत्रिका म्हणणे योग्य आहे. पण नवमांश कुंडलीत गुरु हा ग्रह अचानक उच्च बनला आहे. गुरु लग्नेश व दशमेश आहे हे विशेष. जातकाचे वय फक्त ३२ आहे. गुरु लग्नेश असल्याने तो जातकाचे व्यक्तिमत्व अजून घडवत आहे. दशमेश असल्याने जातकाने अजून तरी एखाद्या महान कार्याला झोकून दिलेले नाही. पण भविष्यात नक्कीच तसे होऊ शकते.  
पुढे हा जातक चांगली नोकरी मिळवू शकतो. 

वरील दोन जातक हे सेलिब्रिटी नाहीत. तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक आहेत. रोजचा स्ट्रगल करत जगत आहेत. सेलिब्रिटी होण्यासाठी काही ठसठशीत चांगले ग्रह असणे जसे आवश्यक असते तसे त्या ग्रहांच्या दशा आयुष्यात येणेही आवश्यक असते. बरेचदा असेही होते कि पत्रिकेत खूप चांगले ग्रह असतात पण त्यांच्या दशा वयाच्या ७० ते ८० व्या वर्षी येतात किवा व्यक्ती "उपरवाले के पास" गेल्यावर येतात.ते काही कामाचे नाही.

त्यामुळे समय से पहले और भाग्य से अधिक.......................... हा नियम मनी चिंतावा...
  













शेलीब्रीटी व सामान्य लोक्स

नक्षत्र हा ज्योतिष्यातील फार महत्वाचा भाग आहे. बरेचदा ज्योतिष्य पाहताना बहुतेक सर्व ज्योतिषी डायरेक्ट जन्मकुंडलीवर उडी मारतात. साडेसाती, ग्रहदशा उच्च नीच, वक्री, मार्गी अमुक-तमुक बघून फलादेश करतात. कितीही भारी भारी सांगितले तरी सामान्य माणूस हा अचानक असामान्य किवा सेलेब्रिटी होत नाही. त्यामुळे साधी जन्मकुंडली पाहून सर्व ठीक आहे इथपर्यंत भविष्य सांगणे ठीक आहे पण त्यापुढील उत्कर्ष कसा होतो हे सांगणे अवघड आहे. कोण व कधी "खास माणूस" कसा बनतो हे जाणून घेणे मनोरंजक आहे. त्यासाठी हा लेख लिहिला आहे. 

जसे ग्रह उच्च, नीच, स्वगृह असतात तसेच ते काही ठराविक नक्षत्रात असतात. त्या नक्षत्रांचा प्रभाव ग्रहांवर होत असतो. तो कसा होतो हे दाखविण्यासाठी काही केस स्टडीज खाली दिलेले आहेत. 
विशेष म्हणजे जे ग्रह उच्च किवा स्वगृह असतात व नवमांश कुंडलीतही उच्च किवा स्वगृही असतात ते ग्रह विशेष फलदायी असतात असे दिसते.
विविध क्षेत्रातील खास व्यक्ती यासाठी निवडल्या आहेत. तर बघा कशी गम्मत असते ते.

सुरुवात आपण आपले लाडके केजरीवाल यांच्यापासून करू, 
 

केजरीवाल साहेबांची जन्मकुंडली पहा, स्वगृह रवी म्हणजे चांगली सरकारी नोकरी, लग्नी उच्च चंद्र म्हणजे बोलण्यात हुशार, आदर्शवादी व कल्पक माणूस. याशिवाय जे ग्रह आहेत ते नीचीचे म्हणजे विपरीत फळेच देणारे असे आहेत. 
पण नवमांश कुंडलीत बुध व रवी हे उच्च ग्रह आहेत. मंगळ स्वगृह दशमात आहे. 
  बुध अंतर्दशेत २०११ ला राजकारणात प्रवेश, मग रवी अंतर्दशेत २०१५ ला मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे.


मुकेश साहेबांच्या जन्मकुंडलीत सप्तमस्थानात उच्च सूर्य ह्याशिवाय दुसरे काही नाही. या सूर्याचे फलित हेच कि व्यावसायिक सुरुवात ही मोठ्या चर्चेने झाली. त्याव्यतिरिक्त शनी गुरु राहू केतू सारखे कर्ते ग्रह निव्वळ निष्प्रभ आहेत.हाड-हूड करून कोणी ज्योतिषी ह्यांना हाकलून देईल इतके.

मग असे काय पत्रिकेत आहे कि साहेब जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत? त्यासाठी त्यांची नक्षत्राधारित नवमांश कुंडली पाहणे गरजेचे आहे. 
राहू-केतू हे त्यांच्या उच्चीच्या नक्षत्रात पडले आहेत. त्यात केतू शत्रूस्थानी व राहू व्ययात. खर्चावर नियंत्रण हा काटकसरीचा गुण त्यांच्यात आहे. षष्ठ स्थानात स्वगृह गुरु आहे तसेच शनी सप्तमात स्वगृह हे इतके ग्रह असामान्य व्यक्ती बनण्यास पुरेसे आहेत. 



कयामत से कयामत हा चित्रपट काय आला आणि अमीर खान सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला. तसे पहिले तर अमीर खान म्हणजे अशी काही बच्चन सारखे व्यक्तिमत्व नाही. सामान्य उंची फारतर गोरा नाजूक चेहरा इतकेच.
जन्मकुंडलीत शनी अस्तात आहे. राहू-केतू उच्च आहेत म्हणून आई-वडील यांच्या कृपेने लहानपणीच चित्रपटात काम मिळाले. तशी बाकी खासियत अशी काही नाही. 

पण आता नवमांश कुंडली बघूया, शनी स्वगृही होता आणि नवमांशातसुद्धा स्वगृही आहे. हे विलक्षण महत्वाचे आहे. गुरु दशमात म्हणजे कर्मस्थानात स्वगृह झालाय. त्यामुळे सामाजिक विषयात आदर्श निर्माण करणे, सामाजिक संदेश देणे असे मोठे कर्म स्वतःला चिकटवून घेणे हा एक पैलू अमीर खानला जोडला गेला. त्यात भाग्यस्थानात स्वराशीचा मंगळ भाग्योदय करणारा ठरला. ह्या मंगळाने त्याला पुरुषी देखणेपणा दिला. ५२ वर्षात माणूस जख्खड म्हातारा दिसतो पण अमीर अजूनही तरुण भूमिकेत चित्रपट हिट करतो. हे विशेष. 


अल्बर्ट आईनस्टाईन हे अजब-गजब बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व!!  जन्मपत्रिकेत शनी अस्तात आहे. चंद्र नीच राशीला. मंगळ अष्टम स्थानात म्हणजे कधी कोणात न मिसळणारा व अशक्त प्रकृती असलेला हा माणूस. बुध हा महत्वाचा ग्रह साहेबांच्या नीच राशीला म्हणजे बुद्धिवादी असणे निव्वळ अशक्य. 

आता साहेबांची नवमांश कुंडली पहा. उच्च शनीने भाग्यस्थान उजळले. बुध उच्च ग्रहाच्या बरोबर आल्याने सगळे आयाम बदलले. दशमात गुरु, लग्नी शुक्र. पण खरा भाग्योदय शनीनेच केला.
केतू दशेत ज्यू असल्याने जर्मन जाचाला सामोरेजावे लागले व १८९६ ला त्यांनी जर्मनी सोडले.
१९०९ साली शुक्र-शनी दशा असताना सापेक्षता वादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. सूर्य दशेत व शनी अंतर्दशेत (१९१९ ते १९२१) त्यांच्या सिद्धांताला जागतिक कीर्ती मिळाली.




ओसामा बिन लादेन, गर्भ श्रीमंत असलेला एखादा माणूस, काही विशेष ध्येय घेऊन डोंगर दऱ्यात लपून जीवन जगताना पहिला तर अजबच म्हणावे लागेल ना!! जन्मपत्रिकेत फक्त शुक्र ग्रह काय तो सप्तमात स्वगृह स्थानी. त्यामुळे बाबाने स्त्रीसुख भरपूर घेतले.  सूर्य उच्च पण २९ अंशावर वृद्ध झालेला. बाकीचे सगळे ग्रह अगदी सामान्य. 

आणि आता नवमांश कुंडली बघा..तब्बल ६ ग्रह उच्च राशीला!! 
याची उंची ६ फुट ५ इंच, याला पाच बायका होत्या (सप्तमात चंद्र उच्चीचा) . तर २० ते २६ अपत्ये होती (पंचमात उच्चीचा शुक्र). 





बुध-बुध दशेत याने अल-कायदाची स्थापना केली. बुध-मंगळ दशेत लादेन भूमिगत झाला. मंगळ हा उच्च राशीला आहे त्यात तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानात आहे. लढाऊ वृत्ती म्हणजे काय याचा प्रत्यय इथे येतो. अमेरिकेसारख्या महासत्तेशी लढा देत याने १७ वर्षे काढली. केतू दशेत आरोप वाढत गेले आणि केतूत बुध दशा असताना ओसामा मारला गेला.

योगी आदित्यनाथ हे नाव माहित होते ते कट्टरवादी विचारांमुळे. लोकसभा खासदार असणे हेही विशेष वाटले नव्हते. पण देशातील सर्वात मोठी व विविध धर्माची लोकसंख्या असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर योगी हे काहीतरी  खास व्यक्तिमत्व आहे हे लक्षात आले.
यांच्या जन्मपत्रिकेत अष्टमात (पिडास्थानात) स्वगृह गुरुशिवाय काहीही खास नाही. पण नवमांश पत्रिकेत गुरु उच्च राशीला परावर्तीत होतो. मंगळ स्वगृह राशीला जातो. आणि चित्र पालटून जाते. यात उच्च राशीला असलेला गुरु हा विलक्षण फळे देणारा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 
२४/३/९८ ते ३/५/९९ मध्ये मंगळ अंतर्दशेत ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले.
बुध महादशेत गुरु अंतर्दशा (गुरु नवमांशात उच्च असल्याने) ४/८/१६ ते १०/१/१९ हा काळ  योगींसाठी खास ठरला आहे हे आपण जाणतोच.


हे झाले सेलेब्रिटी लोकांचे. आता आपण काही सामान्य जातकांच्या पत्रिका पुढच्या लेखात बघूया.