Wednesday, 20 July 2016

नियतीशी संवाद: म्हणजेच छापा-काटा

फलज्योतिष्य, प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्रश्नकुंडली हे अधिकाधिक गुंतागुंतीचे करून ठेवण्याचे उद्योग ९ ग्रह, १२ राशी आणि २७ नक्षत्रे ह्यांनी आधीच करून ठेवले असताना अनेक ज्योतिष्यकारांनी आपले अधिकाधिक गुंतागुंतीचे संशोधन त्यात घुसवून विषयाचा पूर्ण बट्ट्याबोळ करून ठेवलाय. 
कधीही गुगल करून ह्या विषयावर माहिती काढायचा प्रयत्न करा, डोके अगदी चक्रावून जाणारे लेख, प्रत्येकाचे वेगवेगळे आडाखे मिळतात. कशाला कशाचा ताळमेळ नाही. डोके अगदी भणाणून जाते. नक्की खरे काय आणि कोणाचे हेच कळत नाही. 
हे कसले शास्त्र? कोणाचे साधे सरळ नियम नाहीत, प्रत्येकाचे अनुभव तो आपले केस स्टडी म्हणून  विकायचा प्रयत्न करत असतो. त्यात ९ ग्रह, १२ राशी आणि २७ नक्षत्रे हे येथेच्छ धुमाकूळ घालत असतात. त्यात एकेक योगाचे अजब गजब नाव असते, कुठे काल,नाग,सर्प, कुठे गजांतलक्ष्मी तर कुठे कर्तरी. कशाला इतका गोंधळ घालायचा? तर फक्त पोटासाठी?
स्वतःचे पोट चालविण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे की काय अशी शंका नक्कीच येते. येत्या शे-दोनशे वर्षात तर हे शास्त्र अगदी धुवून काढले गेले आहे. कसे ते पहा आता,
नोकरी की धंदा?: ह्या अवघ्या विश्वात ३ प्रकारचे काम करणारे लोक आहेत. पाहिले नोकरी करणारे, दुसरे व्यवसाय करणारे व तिसरे काहीही काम न करणारे! हे तीनच प्रकारचे लोक जगात असताना नोकरी की व्यवसाय ह्या विषयावर लाखो वेगवेगळी मते ज्योतिषी वर्तवताना दिसतात. हे कसे काय बुवा? रस्त्यावर उभा असलेला साधा भिकारी सुद्धा मोठा व्यावसायिक असतो. कुठली जागा चांगली, कुठली वेळ चांगली हे जास्तीत जास्त त्यालाच माहीत असते. अधिकाधिक भिकारीपणा दाखवायचा प्रयत्न करून तो त्याची उत्तम जाहिरात करत असतो. दुसरीकडे नोकरी करणारे कोट्याधीश सीईओ कंपन्यात असतात. व्यवसायात जास्त पैसा की नोकरीत हा दुसरा प्रश्न यामागे दडलेला असतो. म्हणून तो प्रश्न आडपडदा ठेऊन विचारायची ती एक पद्धत असते. असो तो विषय आपण इथेच सोडू. 
पण एखादा माणूस व्यवसाय की नोकरी करणार हा फारच परिस्थिती सापेक्ष प्रश्न आहे. ते असे काही जन्मपत्रिका बघून ठाम सांगता येत नाही. एकेकाळी मोठा व्यावसाय करणारा कधीतरी नोकरी करायला लागतो, तर नोकरी करता करता भांडवल गोळा करून एखादा मनुष्य मोठा व्यवसाय करू लागतो. ह्यासाठी बाजारपेठ, भांडवल, जबाबदाऱ्या, मनुष्यबळ असे अनेक घटक कारणीभूत असतात ते जर प्राप्तच झाले नाहीत तर मोठा व्यावसायिक होण्याचे योग किंवा गुण असलेला माणूस आयुष्यभर नोकरी करीत बसतो किंवा याउलट होते. इथे आततायी ज्योतिषी नेहमी काहीतरी स्वतःचे नियम तयार करून ठोकून देतात आणि परत गोंधळ निर्माण होतो. 
असे एक ना अनेक प्रश्न मनात येत असतात आणि उत्तरे नेहमी निराशाजनक येतात. त्यातील काही प्रश्न असे,
विवाह केव्हा होईल?
संतती योग केव्हा आहे ?
शिक्षण काय होईल?
मृत्यू केव्हा होईल? हा भयंकर प्रश्न आहे बरका !!
"क्ष" मुलगी लग्नाला होकार देईल का?
असे अनेक प्रश्न!!

एकतर माणूस भयंकर आळशी आणि हवरट प्राणी आहे. त्यातले बरेच जण काहीही कष्ट न करता सगळे मिळावे अशी अपेक्षा करणारे असतात. त्यांनी काहीच एखाद्या विषयात परिश्रम घेतलेले नसतात पण एखादा ज्योतिषी समोर दिसला की आपली पत्रिका फेकून मला सरकारी नोकरीचा किंवा कायमस्वरूपी नोकरीचा योग आहे का हा प्रश्न विचारतात. सरकारी किंवा कायमस्वरूपी नोकरी खरेतर ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली एक गलिच्छ मानसिकता आहे. एकदा का सरकारी नोकरी मिळाली की  आरामच आराम करायचा, भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे हा एक जन्मसिद्ध हक्कच लोक समजतात. शिवाय असे करून ती नोकरी कायमस्वरूपी टिकावी हेही या लोकांना हवे असते!! ना एमपीएससी/यूपीएससी परीक्षा दिलीय, ना नोकरीचे प्रयत्न केलेत तरी नोकरी मात्र सरकारीच पाहिजे. 
मग पुढे ज्योतिषी सुद्धा आळशी व हवरट असतातच. ते मनोरंजन करून त्या त्या माणसाला अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवतात आणि आपली फी घेऊन मोकळे होतात. तर हे असे अव्याहत  चक्र चाललेले असते. इथे थोडक्यात इतकेच सांगतो की नोकरी ही माणसाच्या दशम स्थानावरून कळते तर व्यवसाय हा सप्तम स्थानावरून. ते कसे ते आपण इतरत्र पाहू,
तर मूळ मुद्दा पुढे असा येतो की असे भंपक प्रश्न विचारणारे लोक व त्यांना ज्योतिष्य सांगणारे ज्योतिषी हे एकमेकांचे निव्वळ मनोरंजन करीत असतात. पण ह्यामुळे ज्या व्यक्तीला खरेच गंभीर प्रश्न असतात तेही ह्या लोकांबरोबर भरडले जातात. 
गंभीर प्रश्न असलेले लोक म्हणजे काय तर ज्यानी परीक्षेचा गंभीरपणे अभ्यास केलाय व त्यांना परीक्षेत यश कसे मिळेल, विवाहासाठी प्रयत्न करतोय तर विवाह कधी होईल असे अनेक प्रकारचे प्रश्न असणारे लोक होत. एखादा खूप आजारी आहे त्याचे काय होईल, किंवा काहीही गुन्हा नसतात आरोपात गुंतलेल्याची सुटका होईल की नाही असेही काही प्रश्न असतात. 
अशा अडचणीच्या वेळी माणूस त्याच्या आतल्या मनातून प्रश्नाचे उत्तर विचारात असतो. ते उत्तर तो नियतीसारख्या एका अपरिचित शक्ती कडून मिळवत असतो. (ग्रह तारे नक्षत्र, परमेश्वर वगैरे जे काही असते त्याला आपण सध्या नियती म्हणूयात). तो माणूस गंभीर असेल, त्याला नक्कीच मार्गदर्शनाची गरज असेल तर नियतीही त्याला काहीतरी मार्गदर्शन करतेच. 
परंतु तेच मात्र नियतीची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न करणारा असेल, तसेच नोकरीच्या प्रश्नावरून लग्नाचा प्रश्न व पुढे संतती व मृत्यू पर्यंतचे सगळेच  विचारात असेल तर हाय देवा!! देवही उत्तरे न देता पळून जाईल. 
जसे जगण्याचा प्रत्येक सजीवाला हक्क आहे तसेच संकटाच्या प्रसंगी नियतीला योग्य मार्गदर्शन विचारण्याचा हक्कही त्याला आहे. विशेषतः असे प्रश्न हो/नाही या स्वरूपाचे किंवा ठोक प्रश्न असतील काम फारच सोपे होते. 
उदाहरणार्थ एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात चुकून अडकवली गेली आणि तिने तळमळीने प्रश्न विचारला तर उत्तर मिळते की साहेबाला खुश कर. मग सदर व्यक्ती नुसते शब्द वापरून किंवा नोटांचे वजन वापरून ते करू शकते पण त्यामुळे पुढे जेल, कोर्ट, तारखा, बेअब्रू  हे सगळे सोपस्कार वाचतात. 
नियतीशी संवाद: तुम्ही प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी गंभीर असाल व प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही स्वरूपात हवे असेल तर अगदी मन स्थिर करून व एखादे पैशाचे नाणे घेऊन छापा काटा करून प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता. इतके प्रश्नशास्त्र सोपे आहे. त्यासाठी आणखी एक अट महत्वाची आहे ती म्हणजे दोन्हीपैकी एक पर्यायावर अधिक जोर मनात नसावा. निरपेक्ष मानाने हे केले तर ज्या नियतीला पुढचे सगळे माहीत आहे ती नक्कीच स्पष्ट उत्तर देऊन मोकळी होते. 
ह्या नियतीशी संवाद साधण्यासाठी पुढे अनेक सोप्या पद्धती निर्माण करण्यात आल्यात. पण त्यात जेव्हा प्रश्न विचारणारी व्यक्ती अधिकाधिक प्रश्न विचारू लागले तसतसे उत्तरे चुकीची मिळू लागतात. जे प्रथम उत्तर आलेले असते त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेऊन त्याप्रमाणे कामाला लागणे हे अधिक सयुक्तिक असते. त्यावर आणखी उत्खनन करण्यात अर्थ नसतो. तसे करायचा प्रयत्न केला केल्यास परत ग्रहांचे, राशींचे आणि नक्षत्रांचे गुंते होत जातात आणि उत्तरे अधिक चुकीचीच मिळत जातात. 
थोडक्यात नियतीशी संवादाचा प्रकार आपण जितका सोपा आणि सरळ व मुद्द्याला धरून करतो तितके अचूक उत्तर मिळते. हा संवाद साधण्याचे अनेक सोपे ठोकताळे, कोष्टके आहेत त्यांचा विचार आपण पुढे कधीतरी करूया.
 

 





 

बाटली + मांस + बाई = बलात्कार?

बलात्काराच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. कडक कायदे करून व शिक्षा देऊनही हा प्रकार वाढतच चाललाय. प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या त्या मनाने फारच कमी असतात पण प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर असे गुन्हे करणारे लोक पकडले जातात. कारण बऱ्याचदा बलात्कारित स्त्री वाचते, पण जेव्हा तिचा क्रूर छळ करून खून केला जातो तेव्हा जनक्षोभ उसळतो. असे असले तरी या प्रकारात स्त्रीचे व्हायचे ते नुकसान झालेले असते. 
बलात्कार करणारे गुन्हेगारही बरेचदा दारूच्या नशेत कृत्य झाले म्हणून पश्चाताप करताना आढळतात. पण वेळ निघून गेलेली असते. बरेचदा न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत गुन्हेगार हे जेल किंवा पोलीस कस्टडीमध्ये बंद असतात तिथेही त्यांना पश्चाताप होत असतो. पण करता काय? म्हणजे परिणाम त्या स्त्रीला, ह्या तरुण मुलांना व दोघांच्या कुटुंबियांना भोगावे लागतात.
थोडक्यात बलात्कार करणे ही वृत्ती कमी करण्यासाठी कायकाय करावे लागेल ते जाणून घ्यावे लागेल, कायद्याने शिक्षा देऊ हे खरे झाले, पण असा गुन्हा करण्यापूर्वी तो आरोपी गुन्हेगार कसे त्याचे सर्वसामान्य जीवन कसे जगत असतो  तेही जाणून त्यात काही बलात्काराची करणे दडली आहेत का हे आपण पाहू. 
त्याआधी बाटली मग मांस मग बाई अशा माणसाच्या गरजा कशा वाढत जातात व नंतर तो आपोआपच बलात्काराच्या दलदलीत कसा अडकला जातो हे पाहू. 

बाटली: काही राज्ये सोडली तर भारतात मद्य सर्वत्र विकले जाते. हिंदू धर्मात मद्य वर्ज नाही त्यामुळे बराचसा समाज दारूच्या विळख्यात येत आहे. काही आठवड्यातून एकदा पिणारे असतात तर काही रोज पिणारेही असतात. किंबहुना आधी आठवड्यातून एकदा पिणारा पुढे रोज पिणारा बेवडा कसा बणून जातो हेच कळत नाही. आणि दारू हे एक व्यसन असल्याने त्याची गरज शरीराला अधिकाधिक हवीहवीशी वाटू लागते. 
मद्य पिण्याला भारतात धार्मिक बंधन नाही, कोणत्याही धर्माचा माणूस ते पिऊ शकतो. मद्य पिल्याने एकतर भूक लागते. शिवाय शरीर व तोंड बधिर झाल्याने माणूस त्या अवस्थेत जे समोर येईल ते खायला तयार होतो. विशेष मागणी मांसाहाराला असते. दारूमुळे वास व चव घेण्याची क्षमता कमी झालेली असते तेव्हा माणूस मांसाहाराचा आग्रह करतो, बरेच शाकाहारी लोकही मांसाहाराची चव व वास आवडत नसेल तरीही दारू पिल्यावर ते मिटक्या मारत खातात. 

मांस: मांस खाण्याबद्दलही आपल्या समाजात काही खास विधिनिषेध बाळगले जात नाहीत आजकाल सगळेच मांसाहार करतात. मांसाहाराचे काही शास्त्र आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.
काही लोक आपण अमुक जातीचे म्हणजे मांसाहार केलाच पाहिजे असा विचार करणारे असतात. 
काहींना जात्याच मांसाहाराची सवय असते. मांसाहारामुळे पुरुषाच्या सेक्स वृत्तीवर परिणाम होतो हे संशोधनाने सिद्ध होत आहे. कसे ते पुढे पाहू, 

बाई: ह्याची काही उत्क्रांतीशी संबंधित कारणे आहेत. शाकाहारी प्राण्यांचे जगणे मांसाहारी प्राण्यांपेक्षा सोपे असते. त्यामुळे त्यांची संख्या जास्त असते व निसर्गाला ती अबाधित ठेवायची असते. कोवळे भरपूर गवत नाही मिळाले तरी खुरट्या गवतावर काही प्राणी उत्क्रांत झालेले आपण पाहतो. तसेच मांसाहारी प्राणी हे केवळ शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असल्याने त्यांची संख्या कमी असते व त्यांना ती वाढवायची असते. यासाठी अधिक सेक्स करणे गरजेचे बनून जाते. उत्क्रांतीचा पुढचा नियम बघतीला तर बहुतेक शाकाहारी प्राण्यांना १-१ पिल्लू होते तर मांसाहारी प्राण्यांना एकावेळी ३-५ किंवा अधिक पिल्ले  होतात. ह्याचेही कारण मांसाहारी प्राण्याची संख्या वाढवण्याशी निगडित असते. 
शाकाहारी प्राणी सतत चरत असतो तरी त्याला भूक लागते. याउलट मांसाहारी प्राणी ४-८ दिवसातून एखादी शिकार करतात व आराम करत राहतात. कारण तितके दिवस लागणारी ऊर्जा (उष्णता) त्यांना मांसाहारातून मिळते. हाच नियम थंड हवामानातील लोकांना लावला तर त्यांनी रोज मांसाहार केला तरी त्यांची ती ऊर्जा बर्न होते. पण आपल्यासारख्या उष्ण हवामानात मांसाहाराने अतिरिक्त ऊर्जा निर्माण होते हे स्पष्ट होते. 

बलात्कार: तर वरील चक्रात मांसाहाराने सेक्सची भावना वाढते असे आपण पाहिले. नियमित मद्य आणि मांस घेणाऱ्या लोकांच्यात ती आधीच वाढलेली असते. डोक्यात धुंदी असते. काटा किर्रर्र असतो. शिवाय इंद्रिये सुद्धा प्रेम, प्रणय करायच्या भानगडीत पडत नाहीत. अशावेळी एखादी एकाकी असहाय मुलगी दिसली की पुरुषांच्या ताबा सुटतो. मेंदू अर्धवट शुद्धीत काम करत असतो. ह्याच वेळी एखाद्या मुलीने दिलेला दगा, किंवा धडा इत्यादी मनात आठवला की हे बलात्कारी पुरुष क्रौर्याची सीमा गाठतात. आणि वाट्टोळे होऊन जाते. मुलीचे तर होतेच होते पण ह्यांनाही पुढे पोलिसात नेल्यावर उतरलेली असते तेव्हा आपण काय केले हे आठवत नसते व पश्चाताप होत असतो. 

आपण म्हणतो की युरोप अमेरिकेत तर लोक भरपूर दारू ढोसतात आणि मांसाहार करतात. पण त्यांचा प्रदेश थंड असल्याने तेवढे मांस पचवले जाते. त्यातून अतिरिक्त ऊर्जा निर्माण होत नाही. तसेच वाळवंटी प्रदेशातही (विशेषतः मुस्लिम राष्ट्रात) लोक भरपूर मांसाहार करतात. पण तिथे पहा ह्या साखळीतील मद्य त्यांनी काढून टाकलेले आहे. तिथे धार्मिक नियमानुसार मुस्लिम व्यक्तीने मद्य पिणे अवैध व बेकायदेशीर आहे, तसे आढळल्यास शरिया कोर्टात शिक्षा दिली जाते. बार मध्ये जाताना  एक कार्ड (ज्यावर धर्म लिहिला आहे) ते दाखवावे लागते. शिवाय ते मांसाहार जास्त अंतराने करतात. असो. 
इतकेच काय इतर प्रकारच्या अनेक गुन्ह्यातील लोक हे मद्य पिलेले असतात, त्यावरून ह्या दुष्परिणामांची माहिती कळू शकते. तर अशा गुन्ह्यांना कडक कायदे आणि त्वरित शिक्षा तर झालीच पाहिजे. 
पण मुळात ज्यामुळे असे गुन्हे घडतात त्याची कारणे शोधणेही महत्वाचे आहे. बेरोजगारी मुले विवाह करण्याची ऐपत नसणे, मुलींची संख्या कमी असणे, भडक चित्रपट अशी इतरही अनेक कारणे आहेतच. त्यात वरील कारणे महत्वाची आहेत. मूलभूत कारणे दूर केली तर समाजाची नीतिमत्ता अधिक सुधृड होईल ना. 
दारू पिण्याबद्दल किंवा मांस खाण्याबद्दल माझा विरोध नाही. त्याचा अतिरेक करणे हे घातक आहे इतकेच म्हणायचे आहे.
















Thursday, 14 July 2016

वास्तुशास्त्र: आणखी काही गमती

आधीच्या लेखात आपण वास्तूचे दोष म्हणजे काय ह्याचा अभ्यास केला. आता वास्तूच्या त्याच संदर्भातील अनेक गमतीजमती जाणून घेऊ,
दोषयुक्त वास्तूतील अनुभव: दोषयुक्त वास्तूत एक दडपण सतत मनावर असते. तिथे एकप्रकारची भीती मनात कायम घर करून बसलेली असते. दक्षिणमुखी वास्तू (समोर मोठी इमारत पर्वत इत्यादी नसेल तर) किंवा आपण आधी पाहिलेले वास्तुदोष असलेली एखादी जागा पार लयास गेलेली  दिसते. तिथे कुठले दुकान चालत नाही. आहे ती जागा जीर्ण-शीर्ण होऊन जाते. भावाभावात पटत नाही. आजारपणे वाढत जातात. भाडेकरू ठेवला तर तोही टिकत नाही. कर्ज आणि कोर्टकज्जे वाढतात. 
याशिवाय जे इतर वास्तुदोष सांगितले जातात ते निव्वळ बकवास आहेत. स्वयंपाकघर आग्नेय दिशेलाच पाहिजे. बेडरूम नैऋत्येला पाहिजे इत्यादी व तसे नसेल तर तुमच्यावर संकटांची मालिका कोसळेल अशी भीती अनेकदा दाखवली जाते पण ते एक थोतांड आहे. तद्दन पैसे कमवायचा मार्ग आहे. 
विशेष म्हणजे माणसाच्या प्रवृत्तीनुसार व ग्रहदशेनुसार त्याला वास्तू मिळते. तसेच एखाद्या जागेत काही दोष असतील आणि तिथे तुम्ही राहत असाल तर तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करता. तसे इशारे व संदेश तुम्हाला नेहमी मिळत राहतात. 
पशु पक्षी यांचे वास्तुशोध: मूलतः माणूस हा एक प्राणी आहे, त्यामुळे तो स्वतःचे जीवित सुरक्षित ठेवण्याचा कायम आटोकाट प्रयत्न करत असतो. एखादा ससा किंवा हरीण त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या हालचालींचे कायम निरीक्षण करीत असतो, व प्रत्येक पाऊल फार विचारपूर्वक टाकत असतो. पक्षीही आपले घरटे अशा उंचीवर बांधतो की त्याला कसलाच धोका पोहोचू नये. त्याचवेळी आजूबाजूला मांजरी, साप हे त्याच्या अंड्यांना व पिल्लांना धोकादायक असणारे प्राणी नाहीत ना, याची खात्री करूनच घरट्याची जागा ठरवतो. 
अशावेळी एक थर्ड सेन्स माणसाचाच काय पशुपक्ष्यांचा सुद्धा कार्यरत असतो. त्याद्वारेच प्राणी आपले रक्षण करून घेत असतात.
 दोषयुक्त वास्तूतील विचित्र अनुभव: हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. दुबई शारजाहच्या सीमेवर आमचे घर होते. तिथे दुबई व शारजाह ह्या दोन प्रदेशांच्या राजांची फार पूर्वी अनेक युद्धे झालेली आहेत. त्या सीमेला लागूनच माझे घर होते. माझ्या पत्नीला एक जखमी माणूस पाठमोरा बसून विव्हळत असताना अनेकदा त्या घरात दिसला. मुलाला एकदा रात्री अचानक जाग आली तेव्हा आम्ही नवराबायको बेडरूम मध्ये होतो व तो त्याच्या बेडरूम मध्ये होता तेव्हा त्याला तिथे एक काळी आकृती दिसली ती पाहून त्याचे ओरडायचे अवसान सुद्धा गळून गेले. 
माझे कुटुंब शालेय सुट्टी असल्याने पुण्यात गेलेले होते, तेव्हा तर फारच विचित्र अनुभव आलेले मी त्याच घरात पाहिले. दरवाजाच्या पीपहोल मधून बघितले तर ५-६ महिला धुणे धूत की सुकवत होत्या. ४-५ मुले कॉरिडॉर मध्ये पळापळी करत होती. एकदोनदा दरवाजा वाजल्याचा भास झाला तेव्हा पीप होल मधून पहिले तर एक कुरूप वाकडा तिकडा माणूस दरवाज्यात उभा होता. मनाचा हिय्या करून दार उघडले तर बाहेर कोणीच नाही. दुबईमध्ये असे कॉमन कॉरिडॉर मध्ये धुणे धुने, सुकवणे अजिबात चालत नाही. नंतर आत मध्ये येऊन बसलो तर काचेच्या दरवाज्यात एक स्त्री व पुरुष वाद घालत असताना दिसले. नंतर जवळ जाऊन बघितले तर काचेच्या पलीकडे एक माणूस खुर्ची टाकून माझ्याकडे बघत असलेला दिसला. नंतर मी देवीच्या फोटोजवळ झोपायला गेलो. तर थोड्याच वेळात एक मांजर तिथे आली. तिचे डोळे एखाद्या बॅटरीसारखे चमकत होते, माझा फ्लॅट सर्व दरवाजे खिडक्या बंद असताना ही मांजर कुठून आली हे कळायला तयार नव्हते. नंतर भिंतीवर उंदीर पळू लागले. तिथे ५६ डिग्री तापमानात उंदीर अजिबात जगू शकत नाहीत. तरीही मी अट्टाहास करून झोपी गेलो तर अचानक माझ्या खांद्याला कोणीतरी हिसडा दिला. उठून बघतोय तर माझ्या अगदी जवळ पाठ उघडी असलेला एक तरुण बसला होता. मी तात्काळ उठून लाईट चालू केले. त्यावेळी तो गायब झाला होता. असे १-२ दिवस झाले. मग मी माझ्या गुजराती मित्राला माझ्याकडे बोलावून घेतले. विशेष म्हणजे मला जे दिसत होते ते त्याला अजिबात दिसत नव्हते. शिवाय मी जे त्याला दाखवायचा प्रयत्न करत होतो ते तो विशेष काळजीने पाहतच नव्हता. त्याने मला सांगितले की " सब वेहम हैं" मी गप्प बसलो. सगळे हे घडायचे ते रात्रीच घडायचे, आणि नेमकी अमावास्या लागून आलेली. तर हा गमतीशीर किस्सा ! 
अरबी लोक हे गडगंज श्रीमंत असल्याने त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्त्रिया, पुरुष पशु-पक्षी ह्यांना अतिशय भयंकर वागणूक देतात. चक्क ५ ते २० मजल्यावरून घरकाम करणाऱ्या स्त्रीला फेकून देण्याचे अनेक प्रकार इथे घडले आहेत. 
असो तर पुढे हा असला विचित्र अनुभव घेतल्यानंतर मी घाबरून भारतात आलो. २ आठवडे सुट्टीही मिळाली. आता परत त्या वास्तूत राहायचे नाही, राहिलेले २ महिने हॉटेलात काढू असा विचार करून मी तिथे पोचलो कारण घरातील सामान व माझा ताबा तसाच होता. शिवाय हॉटेलचा खर्च बघता तेच घर मला सोईस्कर होते म्हणून तिथे पोचलो. बिल्डिंग मॅनेजर भेटला. त्याने मला सांगितले की तुम्ही इथे राहू शकत नाही, कारण तिथे वार्षिक काँट्रॅकट असते. मी त्याला म्हणालो माझ्या घरातील सामान तरी मला घेऊ देत. त्यावर त्याने होकार दिला. मी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा एक भकासपणा जाणवत होता. शक्य तेव्हढे सामान हलवले, देशी पाठवले, विकले. पण मी हॉटेलात राहिलो. त्या मॅनेजरला काय सुबुद्धी झाली कोणास ठाऊक नाहीतर मला परत त्याच घरात तेच अनुभव घेत बसावे लागले असते. किंवा आणखी काहीतरी भयंकर घडले असते माझ्यासोबत!!
दुसरा अनुभव मला हडपसर येथे असलेल्या आमच्या फॅक्टरीत आला. ही वास्तू पूर्ण दक्षिणमुखी आहे, पूर्वी तीथे स्मशानभूमी होती. नंतर जनावरे गाडायची जागा बनली. तिथे तळमजल्यावर जिथे जिना सुरू होतो त्या जिन्याखाली एक जागा आहे. आमचा एक व्यापारी तिथे बरे वाटते म्हणून झोपला, आणि मध्यरात्री तो हलूच शकत नव्हता. तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्याला अजिबात हलता येऊ नये असे होत होते पण डोक्यात भयंकर भीती आणि पळून जायची त्याची इच्छा होती. असे त्याला वाटत होते. त्याच जागेवर मीही लहान असताना मातीत खेळत असे, तेव्हाही असेच अनुभव मला आलेले. तिथून हलायचे मनच होत नसे, भूक तहान विसरून मी तिथे चिकटलेला असायचो. शेवटी फटके मिळाले तरीही ती जागा मी सोडत नसे.  
एकदा एक मांत्रिकाला आम्ही बोलावले, त्याने त्या जिन्याखालील जागेपासून बिल्डिंगच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या टाकीपर्यंत माग काढला. नंतर तो मशीन रूम मध्ये गेला.  तिथे खोदले असता एक कबर मिळाली जी मशीनच्या अगदी खाली होती आणि म्हणूनच मशीन नीट चालत नाही असे त्या मांत्रिकाने सांगितले. ती एका स्त्रीची कबर होती. नंतर आम्ही तिथे दर अमावास्येला कोंबड आणि इतर पदार्थ यांचा नैवेद्य करत होतो. मग मशीन ठीक काम करायला लागले.   
जन्मकुंडलीत केंद्रात शुभग्रह असतील, तसेच मनुष्यगण असेल तर हे भुतांचे आणि वास्तुदोषांचे भास अनुभवायला मिळतात. मी त्यातीलच एक आहे म्हणून मला हे अनुभवता आले. असे अनेक पुण्यात्मे आहेत की ज्यांच्या जन्मकुंडलीत काही शुभग्रह त्यांना अशा शापित जागांचा सुगावा लागून देतात. इतकेच नाही तर एखाद्याला भूत-बाधा झाली असेल तर त्यावरही प्रभावी उपाय करता येतात. हे कसे साध्य होते हे एक अज्ञात गूढ आहे. मानसोपचारतज्ञ एकीकडे काम करतात तर बुवा-बाबा दुसरीकडे भुते काढतात. संत, महान योगी, हे अशा प्रकारचे लोक असू शकतात, शिवाय फसवे लोकही असतातच!
यावरून एकच स्पष्ट होते ही भूतबाधा ही एक मानसिक स्थिती असते. त्या त्या परिस्थितीत ती तुम्हाला काहीतरी सांगत असते. 
थोड्याच दिवसात आधुनिक विज्ञान ह्या भूतबाधा, दोषयुक्त वास्तूंची उकल करण्यात यशस्वी होईल असे वाटते.



















Monday, 4 July 2016

जातीयता: उत्तम बियाणे उमदे पीक?

जातीयतेची मुळे शोधताना बरेचदा आपण भरकटत जातो. सुरुवात वैदिक वर्णवादावरून होते, त्यात ब्राम्हण सर्वोच्च नंतर क्षत्रिय मग बाकीचे बलुते सांभाळणारे व सर्वात शेवटी दलित असा उतरता क्रम सर्वत्र दिसतो. 
पण अलीकडे विद्वान म्हणतात त्याप्रमाणे चार वर्ण हे वैदिक धर्माची देण आहेत तर जातीय विभागणी ही कृषक संस्कृतीची उपज आहे.  वैदिक वर्णवाद हा क्षत्रिय व वैश्य हे कलियुगात संपुष्टात आल्याची घोषणा (संदर्भ: परशुराम व नंद घराणे) केल्याने दोनच वर्ण म्हणजे ब्राम्हण आणि शूद्र  हेच आता शिल्लक आहेत असे म्हटले जाते. तूर्तास हे म्हणणे एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या आहेत हे विसरून सत्य आहे असे समजून पुढे जाऊ. कारण कृषक, बौद्ध, जैन ह्या धर्मांच्या स्पर्धेत वैदिक धर्म हा संख्येने फार लहान होता व त्यातील क्षत्रिय व वैश्य हे पूर्वी बाद केले गेले म्हणजे त्यांचा सध्याच्या जातीयतेवरील प्रभाव हा संख्येच्या दृष्टीने नगण्य आहे हे सिद्ध होते. 
आता कृषक संस्थेकडे वळू. कृषक हे शेती करणारे लोक. ही सर्वात जुनी संस्कृती आहे हे सिंधू नदीतील उत्खननातून सिद्ध होत आहे. त्यांची शस्त्रे-अस्त्रे, रथ, घोडे यांचे अजिबात पुरावे मिळालेले नाहीत, ह्याउलट उत्तम जातीचे बैल, धान्याची आगारे, वृक्ष-वेली, नागरी जीवन (जसे स्नानगृहे, रस्ते, इमारती, बाजारपेठ) ह्यांचे अगणित पुरावे मिळाले आहेत. ह्या कृषक समाजात क्षत्रिय ह्या वर्णाची गरजच नव्हती. कारण युद्धाचे प्रसंग येण्याचे कारणच नव्हते. सगळेजण आपापले शेती करून त्याचे उत्पन्न मिळवून आनंदाने जीवन जगत होते. विशेष म्हणजे मोठी सांस्कृतिक वाढ याच काळात होत गेली. लिपीचा शोध, व्यापाराची नाणी,  अनेक मुर्त्या, उत्तम घरबांधणी, हे सांस्कृतिक कळसाला पोचले होते. 
पण भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश हा फार पूर्वीपासून बाहेरील लोकांना सामावून घेत आलेला आहे. सिंधूचे लोक हे धनधान्य दृष्टीने मुबलक असे होते त्यामुळे कदाचित त्यांनी युद्धे करणे टाळले, व नवीन येणाऱ्या येणाऱ्या लोकांना आपल्यात सामावून घेतले  किंवा आक्रमकांना योग्य मोबदला देऊन परत मार्गी लावून दिले. कारण युद्धाचे कुठलेच पुरावे सिंधू इतिहासात सापडत नाहीत. स्त्री-पुरुष  ध्यानमग्न अवस्थेत असलेले दिसतात. फारतर रेडा किंवा मगर यांच्याशी दोन हात करताना दिसतात. बहुतेक सिंधू लोक हे वैदिकांनी कथन केलेले वैश्य लोक असावेत. हे भूकंप व पुरात नष्ट झाले. म्हणून कलियुगात वैश्य वर्ण शिल्लक नाही असे जे म्हटले जाते त्यात काहीतरी तथ्य असावे असे वाटते. असो. 
पुढे वैदिक लोक भारतात  वायव्येकडून आले. ते इराणियन अवेस्तन लोकांपासून काही ऐहिक कारणांमुळे विभक्त झाले होते. इराणियन वैदिक इराणमध्ये पश्चिमेला जात  राहिले.  त्यांच्यात देव-असुर वाद होता. इराणी हे सूर्यपूजक (अ-सूर= सूर्य) व सूर्यापासून उत्पन्न होणाऱ्या (उष्णता) अग्नीचे उपासक होते. तर देव हे पंचमहाभूते, सूर्य, चंद्र असे अनेक देव पूजत होते. त्यांच्यात गोधन, चराऊ जमिनी, स्त्रिया ह्यावरून वाद होते म्हणून हे दोन गट पृथक झाले असे म्हणता येईल. 
जो गट भारतात आला त्याने आपल्या वैदिक संस्कृतीचा प्रचार आरंभ केला. त्यांचे वर्ण त्यांना माहीत होते. वर्णातील क्षत्रिय वर्णाची खरी गरज रणभूमीवर होती. 
त्याआधी भारतदेशात सुमारे १ लाख ते ३० हजार वर्षांपासून मानवाची  स्थित्यंतरे होत होती. हे लोक इथलेच झाले होते. भारतातील निसर्ग हा बेभरवशाचा आहे. त्यामुळे पशुपालन तेही कमी गवतावर जगू शकणाऱ्या शेळ्या-मेंढ्या ह्याचे पालन सुरू झाले. बरा पाऊस असलेल्या ठिकाणी शेती सुरू झाली. सिंधू संस्कृती देशभर मोडकी-तोडकी का होईना पण पसरली. ह्यावेळी कृषक आणि बाकीचे बलुते हे एकमेकांना जेष्ठ-कनिष्ठ समजत नव्हते. कारण एकमेकांना एकमेकांची गरज होती. ते समाधानाने आपले काम करीत होते. 
पुढे राजेमहाराजे ह्यांची आपआपसात लहान लहान युद्धे व्हायला सुरुवात झाली. रामायण-महाभारत हे अशाच दर्जाचे युद्ध असावे. सर्वात प्रथम अलेक्झांडरने आक्रमण केले. शक हून ह्यांची आक्रमणे झाली. नेमकी इथेच क्षत्रिय समाजाची गरज भासू लागली. दक्षिण व मध्य भारतात उष्णतामान अधिक असल्याने इथले लोक कृष प्रकृतीचे असतात. याउलट पंजाब व उत्तर भारतात तगडे पैलवान लोक असतात. 
समोरासमोरील युद्धास सैनिक निर्माण करायचे म्हणजे ते तगडे, मजबूत असणे गरजेचे आहे. उत्तर भारतात नव्याने येणारे लोक हे असे उंचपुरे, तगडे असत. त्यांना ह्या युद्धखोर वातावरणात अधिक महत्व प्राप्त होऊ लागले.  शक-हून असे अनेक वंश उत्तर भारतात स्थायिक झाले. नंतर ते इथलेच म्हणून राहू लागले. पुढे परकीय आक्रमणाच्या काळात ते महाराष्ट्रात व इतर राज्यात राज्यात स्थलांतरित झाले. मराठा ९६ कुळे ह्यांचा विचार केला तर त्यांचे मूळ राजस्थानात राजस्थानात सापडते. 
तोपर्यंत वैदिक लोक हे समाजात आणि विशेषतः राजदरबारी व्यवस्थित पसरले होते. राजाला उत्तम सैन्याची गरज नेहमीच असते. तेव्हा हे खास लढाईसाठी उत्तम असलेले वंश राजाला सैनिकात घेण्यासाठी सांगण्याचे काम वैदिकांनी केले. इथपर्यंत त्यांनी ह्या सैनिकांना क्षत्रियवर्ण ही पदवी दिलेली नव्हती. फक्त राजाचे राज्य क्षेमकुशल चालावे म्हणून एक सल्ला दिला होता. 
जसजरे हे बाहेरून येणारे सैनिक इथे स्थायिक होऊ लागले तसे त्यांचे वैवाहिक संबंध देखील क्षेत्रीय लोकांशी होऊ लागले. मुलींचाच तुटवडा भासत असेल तर त्यांना तो संकर करणे भागच होते. 
तर अशाप्रकारे परकीय आणि एत्तद्देशीय ह्यांची सरमिसळ होत गेली. पण जे सैनिक म्हणून इथे आले, त्यांचे वंशज सैनिकी पेशाचेच काम करीत राहिले. तो हा मोठा वर्ग आहे ज्याला आपण आत्ताचे राजपूत, मराठे इत्यादी लढवैय्ये म्हणून मान्यता देत आलो. 
तर अशा प्रकारे मूळची कृषक व वैदिक संस्कृती ह्यांची सरमिसळ होऊन जाती बनल्या. 

आता जनुकीय संशोधने केली जातात, त्यावेळी जनुकांची भरपूर सरमिसळ झाली आहे असे सांगितले जाते. एकाच घरात एक मुलगा ६फूट उंचीचा असतो तर दुसरा ४ फूट. एक पैलवान तर एक अगदी अशक्त. असे एक ना अनेक नमुने पाहायला मिळतात. कारण पूर्वीचे वंश यांची सरमिसळ होण्याची प्रक्रिया सुमारे १०००० वर्षे चालू आहे. त्यामुळे मी एक अमुक वंशाचा आहे हे सांगणारा हवा आली तर उडून जाईल इतका हलका असू शकतो. 
वैदिक वर्णवादी ज्यात पूर्वी शूद्र शब्दच नव्हता तो कार्यविभाजनाशी संबंधित होता, त्यात ज्योतिष्यशास्त्राचे नियम लावून वर्ण ठरविला जात होता, पण पुढे एवढ्या मोठ्या कृषक संस्कृतीला सामावून घेताना वर्णवादाचा नियम प्रत्येकाला लावत बसने अशक्य होते म्हणून तो सरसकट वंशपरत्वे लावत गेले आणि जातिसंस्था मूळ धरू लागल्या. शिवाय नुसते तगडे, आणि बलवान असून राज्यकारभार करता येतो किंवा न्याय निवाडा करता येतोच असे नाही. तेव्हा हे जे लोक होते त्यांना फक्त सैनिक म्हणून वापरले गेले. राजा हा माध्यम होता आणि त्याला सल्ला देणारे वैदिक ब्राम्हण होते अशी ती राज्यपद्धती होती. 
यातून पुढे ब्राम्हण (हा आपल्या ठराविक कर्मे करण्याच्या कोशात अडकलेला), सैनिक, शेतकरी व सेवा देणारे बलुतेदार असे वर्ग निर्माण झाले. बलुतेदार किंवा दलित ह्यात काही वंशश्रेष्ठत्व, म्हणजे शक्ती, मोठे शरीर नव्हते म्हणून त्यांनी वर चाललेल्या उलाढालींकडे साफ दुर्लक्ष केले व आपले काम करीत राहिले.
अतिशय धावत्या क्रमाने जातीसंस्थेच्या उगमाचा उहापोह करायचा प्रयत्न इथे केला आहे, त्यात अनेक तर्क आहेत पण ते सुसंगत आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहे.











 

Friday, 1 July 2016

वास्तुशास्त्राच्या गमतीजमती

स्वतःचे घर घेणे हे आयुष्यातील मोठे दिव्य असते. एकतर मोठ्या पैशाची जमवाजमव करावी लागते, ते करीत असताना रस्ते, बस-रेल्वे स्टेशन, आजुबाजीची लोकॅलिटी, शाळा, दुकाने इत्यादी सर्व जवळ असणे गरजेचे असते. 
थोडक्यात योग्य घर मिळणे हे एक अग्निदिव्यच आहे असे म्हणावे लागेल. मोठा खर्च करून व वरील व्यवहार्य बाबी तपासून सुद्धा  जर राहत्या वास्तूत काही दोष आहे म्हणून कोणी सांगितले की काळजात चर्र होते, आणि इतके कष्ट करून घेतलेले घर नकोसे वाटू लागते. 
वास्तूत दोष असणे म्हणजे नक्की काय हे आधी पाहूया,
दक्षिणमुखी वास्तू: वस्तुतः हा वास्तुदोष म्हणता येणार नाही. भारतात बहुतेक ठिकाणी पाऊस हा दक्षिण किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. वास्तुशास्त्रात दक्षिणेपेक्षा नैऋत्यदिशा अधिक दोषकारक समजली गेली आहे. पूर्वीचे वाडे किंवा घरे पहिली तर सुरक्षेच्या दृष्टीने बाहरेच्या भिंतीत दरवाजाशिवाय कुठेलच मोठे ओपनिंग दिसत नाही. घराला खिडक्या असणे ही तर दूरची गोष्ट. ह्या मागील प्रमुख कारण हेच कि पाऊस व वारा ह्यापासून घराचे रक्षण व्हावे. 
यापुढे जाऊन घरासमोर मोठी वास्तू असेल तर दक्षिणमुखी वास्तूचा दोष आपोआप दूर होतो हे ही त्याच कारणास्तव होते. कारण घरात  थेट वारा पाऊस येत नाहीत. कित्येक ठिकाणी गावातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांची किंवा घरांची पूर्ण गल्ली ही दक्षिणमुखी असते ( उदा. पुण्यातील लक्ष्मी रोड) पण समोर पूर्ण तितक्याच उंच घरांची रांग असल्याने ह्या घरांचा दक्षिणमुखी हा दोष जातो, व तेथील लोक उत्तम प्रगती करताना दिसतात. 
आधुनिक काळात घर बांधणीची उत्तम साधने उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे हा मुद्दा इतका महत्वाचा राहिलेला नाही. 
दुसरे महत्वाचे कारण असे आहे की,  गेल्या १०००० वर्षात भारतात जे लोक वसाहत करून राहिले ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. असे नवीन येणारे अतिथी/आक्रमक यांच्याकडे पाठ करून घरात राहणे हे एक असुरक्षित मानसिकता निर्माण करणारे ठरते. पूर्वी घराला दरवाजा, त्यात एक टेहळणी करण्यासाठी खिडकी ठेवलेली असे, किंवा वर गच्ची किंवा टेहळणीची तत्सम साधने घरावर असत त्यामुळे नवीन येणारे आक्रमक ह्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे जात होते. 
घराच्या दरवाजात बाहेर कोण आले आहे हे पाहण्याची सोय नसेल तर त्याला वास्तुशास्त्रात अंधक दोष असे म्हणतात. त्यादृष्टीने दक्षिणद्वार असणे हे कसे दोषदायक असते हे समजून येते. 
ज्या जागेत आपण राहतो तिथे पाणी वाहून जाण्यासाठी जमिनीला आवश्यक उतार असणे गरजेचे असते. तसेच  घराचे जोते (प्लिंथ) हे आजूबाजूच्या जमिनीपेक्षा वर असावी  अन्यथा घरात पाणी शिरू शकते. 
जमिनीखाली पाणी असणे: घर नदीच्या अगदी जवळ किंवा पूरक्षेत्रात असू नये. नदी जवळ असेल तर जिवंत झरे घराखाली असण्याची शक्यता असते. असे घर कायम पुराची भीती असलेले असते. तसेच भिंतीच्या पायाला पाणी लागल्याने पायाची व तिथे आधार देणाऱ्या मातीची शक्ती (स्ट्रेंथ) ढासळते. म्हणून जिवंत  पाण्यावर असलेले घर हे अशुभ समजले गेलेले आहे. तसेच नदीच्या जवळ बऱ्याचदा गाळ साचलेला असल्याने पाया खूप खोलवर खणावा लागतो तेही भूकंपाच्या दृष्टीने धोकादायक ठरते. 
जमिनीखाली माणूस, प्राणी ह्यांची हाडे असणे: हा संबंध पूर्वी युद्धभूमीशी लावला जात असे. तसेच पूर, भूकंप अशा नैसर्गिक कारणांनी ज्या प्रदेशाला आधी झटके दिलेले आहेत तिथे घर बंधने हे दोषकारक समजले गेले आहे. सामान्यतः युद्धे, पूर, भूकंप, अतिवृष्टी इत्यादी कारणास्तव जमिनीखाली हाडे असण्याची शक्यता जास्त असते म्हणून हा दोष मान्यता पावला असे म्हणता येईल. 
तर अशा प्रकारे जे महत्वाचे वास्तुदोष आहेत त्यांचे तत्कालीन जीवनाशी असलेले तारतम्य आपण विचारात घेतले. याशिवाय अनेक वास्तुदोष सांगितले जातात पण त्यात फारसे काही तथ्य आढळत नाही. असे वास्तुदोष सांगून त्यावर उपाय करायला लावणे म्हणजे एक मानसिक कमकुवतपणा हेरून लुटण्याचाच प्रकार आहे.







 

पितृदोष, कालसर्प: खरे काय खोटे काय?

पितृदोष, कालसर्प दोष हे एकमेकांशी निगडित दोष आहेत त्यांची चर्चा आपण करूया, 
त्याआधी पितृदोष, किंवा पूर्वजन्मातील केलेली पापपुण्ये म्हणजे नक्की काय भानगड आहे ते समजून घेऊ. 
पितृदोष: सामान्यतः कुंडलीतील १२ व्या स्थानावरून पितृदोष सांगितला जातो, १२ व्या स्थानात जर पुरुष ग्रह (रवी, मंगळ, गुरु) अथवा स्त्री ग्रह (चंद्र, शुक्र) असे ग्रह असतील तर त्याप्रमाणे सपिंड (वडिलांकडील रक्ताच्या नात्याचे पूर्वज) पुरुष अथवा स्त्री यांचा पितृदोष आहे असे सांगितले जाते. जर ग्रह त्या त्या राशीचे स्वगृह अथवा उच्च असतील तर हे पूर्वज त्याच गुणधर्माचे असतात, उदाहरणार्थ सिंह/मेष राशीचा रवी हा एक प्रतिष्ठित व राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्ती हा आपला पूर्वज असतो. तर मेष/वृश्चिक/मकर राशीचा मंगळ हा थोडा रागीट, स्वतःच्या बळाचा वापर करणारा पूर्वज दर्शवितो. धनु/मीन अथवा कर्क राशीचा गुरु हा पापभिरू, देवभक्त असा पूर्वज दर्शवितो. ह्यात रवी, मंगळ आणि गुरु हे सर्व सांसारिक सुखे भोगून मृत झालेले पूर्वज असतात. हेच ग्रह जर शतृगृही अथवा निचीचे असतील तर तेच पूर्वज त्या त्या क्षेत्रात कुचकामी ठरलेले असतात. 

त्याचप्रमाणे १२ व्या स्थानात जर स्त्री ग्रह असतील व जर ते स्वगृह व उच्चीचे असतील तर स्त्री पूर्वज ह्या शालीन, सौभाग्यवती अशा असतात. तसेच निचीचे चंद्र शुक्र हे आजारी, दरिद्री, विधवा असे स्त्री पूर्वज दर्शवितात.

याहीपुढे बुध, शनी, राहू केतू (हे नंपुसक) ग्रह जर १२ व्या स्थानात असतील तर तो पुरुष विधुर अथवा ब्रह्मचारी अथवा विधवांचा दर्शक असतो. 

असो हे झाले ठोकताळे, हे  सगळे विज्ञानाच्या कसोटीवर घासून-पुसून पाहिले तर काय हाती लागते?
 एकदा का पित्रे  मेली की सगळे संपते, त्यांचे नश्वर देह घेऊन आपण अंत्यविधी उरकतो, त्यानंतर ती पित्रे वेगवेगळ्या प्रेतयोनीत वर्षभर भटकत असतात. वार्षिक श्राद्धे व वर्षश्राद्ध केल्याने ती या चक्रा तून बाहेर पडतात. जर ही श्राद्धे केली नाहीत तर पितृदोष उत्पन्न होतो असे समजले जाते. 
पण इथे बऱ्याच शंका मनात उपस्थित होतात. जसे एखाद्याचा जन्म झाल्यावर जर श्राद्धे केली नाहीत तर तो दोष पत्रिकेत कसा दिसत नाही. जन्माच्या आधीचेच का दिसते? 
मुळात ज्योतिष्यशास्त्र ह्या विषयात पाप-पुण्य, आत्मा, इहलोक, परलोक इतकेच काय परमेश्वर ह्याचाही कारक म्हणून कोठेही उल्लेख नाही. 
ग्रह हेच अंतिम कर्ते-करविते आहेत. पाप-पुण्य, इहलोक, परलोक हे लोकांनी नीतिमान जीवन जगण्यासाठी घातलेली भीती असावे असे वाटते, पण त्याचे दर्शन जन्मपत्रिकेत होत नाही. ज्योतिष्यशास्त्र व अध्यात्माचा संबंध हा पूर्णतः बादरायण संबंध आहे. ज्योतिष्यशास्त्रात ग्रह परिस्थितीसापेक्ष मानवी जीवनाचा अभ्यास केला जातो तर अध्यात्मात माणूस आयुष्यात काहीही झाले तरी ईश्वरनिष्ठ व पुण्य  करणारा असाच अपेक्षित असतो. ह्या संकल्पना काळसापेक्ष बदलत आहेत. 
निदान आधुनिक ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यासकांनी ज्योतिष्यशास्त्र आणि अध्यात्म ह्यांची गल्लत व गुंता करू नये हीच अपेक्षा हे सांगण्यामागे आहे. 
तर वरील विषयाच्या अनुषंगाने १२ व्या स्थानात काय काय येते ते आधी पाहू, परदेशगमन (किंवा देशातून हाकलपट्टी) खर्च, कर्ज, नुकसान, तुरुंगवास, पायाची पावले, आजार, संन्यास, उपभोग, व्यसन, आत्महत्या व निद्रा या संबंधी बाबींचे स्थान आहे.
आपल्या पूर्वपिढीचा आपल्या जीवनावर जो परिणाम होतो, तो थोडक्यात १२ व्या स्थानातून समजतो. 

 ज्याच्या पूर्वजांनी घर, इमारती बांधल्या आहेत, मोठा व्यवसाय किंवा भांडवल जमा करून ठेवले आहे त्याला पर्याय नसल्याने परदेशी जावे लागणे, खर्च, कर्ज, नुकसान हे संभवतच नाही. थोडक्यात अशा व्यक्तीच्या १२ व्या स्थानात कुठलेच ग्रह नसतात. पुढे आजार, पायाची  पावले (ह्याची दुर्दशा हे ढोर मेहनतीचे प्रतीक आहे तसेच  काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे पायाचे गंभीर आजार होतात) हे बऱ्याचदा अनुवांशिक प्रकारचे असतात. तसेच  संन्यास, उपभोग, व्यसन, आत्महत्या व निद्रा हे व्यक्तीच्या मानसिक स्थितीशी संबंधित आहेत. तीही पुढे पर्यायाने अनुवांशिकतेकडे निर्देश करते. 
थोडक्यात १२ व्या स्थानावरून आपल्या पूर्वजांचे ज्ञान होते पण ते अध्यात्मिक बाबतीत होत नाही तर त्यांचे आनुवंशिक गुण-दोष, आर्थिक स्थिती,  चांगल्या-वाईट प्रवृत्ती (इतरांना लुटणे किंवा दानधर्म करणे इत्यादी) ह्यांच्या बाबतीत होते. तसेच १२ व्या स्थानावरून वडिलांचे भाऊ, आजोबा, त्यांचे भाऊ यांचाही अभ्यास होतो हे आणखी एक विशेष!  कारण दशमस्थान हे पितृस्थान (म्हणजे पित्याचे) स्थान आहे त्यापासून तिसरे स्थान हे पित्याच्या भावांचे स्थान असते.
एखाद्या व्यक्तीच्या अध्यात्मिक वृत्तीचा अभ्यास हा ९ व्या स्थानावरून होतो, त्यात भाग्य, धर्म, अध्यात्मिक प्रगती, तीर्थयात्रा,  वहिनी, मेव्हणे, मेव्हण्या,  तत्वज्ञान, बुद्धिमत्ता, गुरु नावलौकिक, योग, साक्षात्कार,  पायाच्या मांड्या, द्विभार्या योग ह्यांचा अभ्यास होतो.  त्यात पितरांचा असा स्पष्ट उल्लेख येत नाही. तसेच अध्यात्मिक विचार म्हणजे ते आत्म्याला न मानणारे विचारही असू शकतात. अध्यात्म हा शब्द अधि: व आत्म असा बनला आहे, म्हणजे स्वतःला जाणून घेणे इतकाच त्याचा अर्थ आहे. 

आता  थोडे ग्रह दशेबद्दल बोलू , विंशोत्तरी दशा ही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी तशीच पुढे चालू असते असे सांगण्यात येते. पण जर आत्म्याचा विचार केला तर तो एक वर्ष प्रेतयोनीत राहतो किंवा जर धर्मश्राद्धे केलीच नाहीत तर तो तसाच प्रेतयोनीत अडकून पडतो असे सांगितले जाते. जर असे  असेल तर मग तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्मानुसार दुसरा जन्म घेतो ह्या विधानाला अर्थ राहत नाही. म्हणजे पुढचा जन्म कुठला मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मानुसार ठरत नसून त्याचा मुलाबाळांच्या  हातात ते असते असा अर्थ होतो. कारण त्यांनी श्राद्ध केले नाही तर त्या व्यक्तीने जन्मात कितीही पुण्य केले तरी ती व्यक्ती प्रेतयोनीत अडकून पडणार असा दुसरा अर्थ निघतो.
 तर सांगायचा मुद्दा हाच असे काही नसून श्राद्धे इत्यादी पूर्वजांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. आपणही अनेक कृत्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो. मेलेल्या व्यक्तीच्या संबंधी मृत्यूची कारणे, त्यांचे जीवन, ह्यांच्या आठवणी काढतो व त्यातून धडा घेऊन आपले जीवन अधिक चांगल्या  प्रकारे कसे जगता येईल याचा प्रयत्न करतो. इतकेच. 
 कालसर्प योग: हा योग बरेचदा राहू केतूच्या एकाच बाजूला सगळे ग्रह असल्यावर सांगितला जातो. खरेतर ह्याला कर्तरी योग म्हणायला हवे. कर्तरी म्हणजे कात्री. राहू-केतूच्या  कात्रीत सगळे ग्रह सापडले म्हणून हा कात्री योग. पण मग पुढे प्रश्न येतो की ही कात्री  तयार करणारे राहू-केतू १२ व्या स्थानात आहेत का? मग हा पितृदोष कसा? जर हा पितृदोष नसेल तर नदीवर श्राद्ध का घालावे लागते? 
मग पुढे सांगितले जाते की पूर्वजन्माच्या पापांमुळे हा दोष लागतो. पण पूर्वजन्म कुंडलीतील कुठल्या स्थानावरून ठरतो? पूर्वजन्म दर्शविणारे एकही स्थान कुंडलीत नसते. असल्यास  दाखवून द्यावे.
तर अशा प्रकारे बऱ्याचदा ज्योतिषशास्त्र व आपले तथाकथित अध्यात्म ह्यांची घालघुसड केली गेली व जात असते. त्यासाठी वेगवेगळ्या शांती, कर्मकांड हे सांगितले जाते. ते करून खरेच हे दोष दूर होतात का?
त्यापेक्षा आपल्या पूर्वजांची जीवनपद्धती, त्यांनी केलेली चांगली-वाईट कामे, त्यांच्या सवई, त्यांची व्यसने, त्यांची त्या-त्या परिस्थितीतील मानसिकता कशी तयार झाली ह्याचा अभ्यास करून आपण त्यांच्या  गुणांचे अनुकरण करणे आणि दुर्गुण, शारीरिक व मानसिक कमतरतांवर मात करत आपले जीवन अधिक सुखकर बनवावे हे योग्य वाटते हेच पितृस्थानाचे म्हणजे १२व्या स्थानाचे महत्व आहे असे म्हणता येईल.