Tuesday, 6 December 2016

फसलेला जयमल्हार

 आपल्या जगात जो जो कोणी ज्या ज्या नशेत असतो त्याच नशेच्या प्रभावाखाली जग पाहत असतो, महेश कोठारे यांनी "जय मल्हार" सुरु केला पण एक टुकार कार्यक्रम याशिवाय त्यांच्या व प्रेक्षकांच्या हाती काहीच आले नाही, 
एखाद्या व्यक्तीला देव बनवायची घाई आपल्याकडे फार  जास्त असते, शिवाजीराजांप्रमाणे  खंडोबाला देव बनवून त्याचे आगाऊ पुरोहित जे  स्वतःच्या गल्ल्याचा हिशेब करत आहेत तो  पूर्ण फसला आहे हे हि "जय मल्हार"  सिरीयल बघून वाटून जाते. तशाही सगळ्याच मराठी सिरीयल ह्या टुकार वर्गातील व तुम्हाला दुसरे आत्ता काही मिळत नाही म्हणून हे पहा अशाच वर्गातील आहेत. लोक, विशेषतः स्त्रिया जे आहे ते आपले निमूटपणे बघत बसतात, शेवटी आकलन काहीच होत नाही. आकलन होण्यासाठी काहीतरी स्टोरीची गरज असते ती ह्या सिरियल्सची स्टोरीच इतकी गमतीशीर आहे कि ह्या लेखात त्यावर न बोललेले बरे, सगळ्या प्रसंगात फक्त स्वतः खंडोबा, म्हाळसा, बानू किंवा प्रधान हे  नेहमीच स्मित हास्य करीत असतात, ते बघून आता उबळ यायला लागली आहे. किती दिवस असे स्मित हास्य करीत राहणार ? आज  चंपाषष्ठी उलटली, देवाने ५ दिवसात राक्षस धुळीला मिळवले पण ह्यांची सिरीयल २ वर्षे पुढे सरकत नाही. म्हणून पटकथा हा विषय वेगळाच आपण बाकीचेच झोल बघूया पटकथा खंडोबाची लहानच आहे पण खूप मस्त फुलवता अली असती.. असो. 

एकवेळ म्हाळसा, लक्ष्मी ह्या फुल  मेकअप मध्ये दाखवल्या असत्या तर परवडले असते, पण बानुबाई धनगरीण तिलाही फुल्ल मेकअप लावून पाठवतात.. बर तिचे झोपडे अगदी स्वच्छ सरावलेले!! धनगरांना झोपडे असते का इथून प्रश्न मनात सुरु होतो, पण निर्माता दिग्दर्शक काय काय करतील काही सांगता येत नाही,  निदान सुम्बरान चित्रपट निर्माता दिग्दर्शकाने बघायला हवा होता.
तिचे झोपडे अगदी टुमदार, कोणीही लगेच लट्टू व्हावा असे.. अगदी फिल्मी स्टाईल.. 
जेजुरीच्या किल्ल्याची तर अगदीच वाट लावून ठेवलीय, खरा किल्ला त्यातील खोल्या किती  व दाखवलेल्या खोल्या भव्य प्रासाद किती, सैनिकांचा ड्रेसकोड अगदी अमेरिकन मिल्ट्रीपेक्षा भारी साधलाय.. कदाचित अमेरिकन मिल्ट्री थोड्या ड्रेसकोडच्या चुका करत असते पण जय मल्हार निर्माते मात्र एकदम कडक. 
खंडोबाची स्टाईल अगदी बॉलिवुडी झाली आहे, तो धनगरांचा आंधळा वेन्धळा राजा नसून साक्षात देवेंद्र  (किंवा त्यापेक्षा भारी) आहे असेच दाखवले जातेय. 

म्हाळसेच्या हातचे लाडू खाताना गणपतीला बघून खंडोबाला भरीत भाकरीचा  नैवेद्य का  दाखवतात हा प्रश्न पडतो. म्हणजे लाडक्या लेकाला लाडू आणि बानूच्या नादाला लागलेल्या खंडोबाला भरीत भाकरी (जो  सर्वसामान्य लोकांचा व राजे महाराज्यांचा आहार त्याकाळी होता) तो कधीच त्याच्या तोंडी दाखवला नाही, दाखवणार कसे? एवढ्या भव्य दिव्य महालात खंडोबाला भाकरीचे तुकडे तोडताना दाखवून टीआरपी कोसळला असता ना, म्हणून भरीत भाकरी तोडणाऱ्या धनगर राजाच्या जागी शुद्ध मराठी बोलणारा १०बीएचके मध्ये राहणार खंडोबा दाखवला. 
चालू द्या चालू द्या.. वास्तवातील माणूस आणि त्याचे दैवतीकरण यांची यादी मोठी आहे, पण ती टी आरपी आणि गल्ले भरण्यासाठी होतेय हे वाईट.. शिवाय खऱ्या इतिहासाची वाट लागते ते वेगळेच. खरा देव आगर महापुरुष कसा होता हे कळतच नसेल तर आम्ही हि सिरीयल एक ३ तासाचा बॉलिवूड चित्रपट आहे असे समजून पैसे घालवल्याचा पश्चाताप करून का सोडून देऊ नये?
आज चंपाषष्ठी म्हणून जरा वाटले कि लिहावे इतकेच..